संक्रांतीच्या शुभेच्छा! (Happy Sankranti)
तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते.

मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. तेव्हा आपण आपल्या वाड-वडिलांकडून कळालेल्या काही पैलुंना येथे मांडू यात का?

आमच्या आजोबांनी तसेच आईने सहजपणे सांगितलेल्या तर निरिक्षणातून लक्षात आलेल्या या काही बाबी...




संक्रांतीपासून दिवस मोठा व्हायला लागतो. म्हणजेच उन्हाळ्याची चाहूल लागू लागते. हा काळ म्हणजे रबीच्या पिकांच्या काढणीचा, पारंपारिक फळांच्या बहराचा. शेतात ओंब्या, हुरडा अन टहाळ चापायचा, पेरुच्या बागांमधून हुंदडायचे, बोरा-चिंचा-कवट असा रानमेवा खुश्शाला गिळायचा... अन रात्रीच्या थंडीत शेकोटीच्या उबीने शाल पांघरुन गप्पा-टप्पा करत आंथरुन जवळ करायचे. अशा या आनंदाच्या काळात आपल्या पूर्वजांनी हा सण व त्यात करायच्या गेष्टी फार विचार करून नेमल्या.





या काळात आपल्याकडे हवा मंद वाहत असते. पाऊस नसतो तशी उघड्यावर उभे राहिल्याने उन्हाने अंगाची होरपळही होत नसते. म्हणूनच पतंग उडवायची मजा खरे तर याच मोसमात. रबीचा हंगाम हातात आल्याचा आनंदोतस्व साजरा करायला मग पतंगाचा पर्याय आहे की नाही मस्त?




लहान मुलांना सर्व प्रकारच्या पारंपारिक फळांची आवड लागावी तसेच रखरखीत उन्हाळा येण्यापूर्वी या सगळ्या फळांना खाऊन सर्वांची तब्येत चांगली व्हावी म्हणून लहान मुलांचे बोर नहाणाची प्रथा अस्तित्वात आणली. बोर नहाणात मुलांना मौज येते व ती ही फळे आनंदाने लपेटायला लागतात. त्याच बरोबर भाज्याही सर्वांनी खाव्यात हा ही संदेश द्यायचा होता. तर 'मला आमुक भाजी नाही आवडत' असे नखरे करणार्‍यांना सुद्धा नैवेद्याच्या-प्रसादाच्या नादाने का होईना पण डझनभर वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून खायला लावण्यासाठी मिश्र भाजीचा दंडकही आणला गेला.

सुगडे (मातीचे नवे कोरे माठ/मडके) आणून त्यात शेतात असलेल्या ओंब्या, टहाळ, बोरे, चिंचा, वगैरे टाकून त्याची पुजा करायची. काही दिवसांनी या सुगड्यांत पाणी भरुन ठेवायचे. म्हणजे उन्हाळ्यापर्यंत या सुगड्यांचे पाझरणे थोडे कमी होऊन ती दैनंदिन वापरासाठी उपयोगात येतात. त्यात संक्रांतीच्या दिवशी रानमेवा व पिकांचे नमुने एक संकेत म्हणून भरुन ठेवायचे की देवा या सुगड्यांना उतरंडीमध्ये असेच भरलेले राहू दे. तसेच या सुगड्यांमध्ये भाज्या, विड्याची पाणे, साठवल्यास बरेच जास्त काळ टिकत. कदाचित तो संदेशही असावा.

आवा लुटण्याचा हा असाच एक अफलातून प्रकार. ताट, चमचे, वाट्या, बांगड्या अशा छोट्या-छोट्या भेटवस्तू हळदी-कुंकवासोबत सुवासिनी एकमेकिंना देतात. या सगळ्या कामाच्या नवनवीन वस्तू अनपेक्षित पणे घरात वापरायला मिळाल्याने त्यांना दररोजच्या कामात थोडा बदल व उत्साह जाणवत असावा. तसेच हातात आलेल्या पैशाने घरातल्या वापरासाठी नवीन वस्तू याव्यात. व्यापार उदीमही वाढावा. असाही दृष्टीकोन असवा असे वाटते. जाणकार अधिक माहिती देतीलच.

असा हा मकर संक्रांतीचा विषेश सांस्कृतिक सण तुम्हा सर्वांना आनंदाचा जावो.

Post a Comment Blogger

 
Top