काल नवरसरंग कविता महास्पर्धेत ’भय रसात’ पहिला नंबर आला म्हणुन,
बायकोनी १००० रुपये दिले.

लहान मुलासारखा खुष झालो आणि हे हजार रुपये कसे खर्च करायचे त्याची यादी केली.
ही यादी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही,
पण समजा हे हजार रुपये मी तुम्हाला दिले, तर तुम्ही काय कराल ?

विचार करा आणि जरुर कळवा....

माझी यादी......


कुसुमाग्रजांचा एक कवितासंग्रह
रु. १५०
३ गजरे आणि थोडी चाफ्याची फुलं
रु. २५
२० चांदोबा (रद्दीवाल्याने ३ रुपायाला एक, असे दिल्याने...)
रु. ६०
सुमारे १०० पोस्ट्कार्ड - हरवलेल्या मित्रांसाठी
रु. ५०
पुणे दर्शन - तिथल्या प्रवेश शुल्कासह
(पुण्यात राहुनही आगाखान पॅलेस बघितलंच नाहीये अजुन )
रु. २००
बॉबीचं पाकीट (तीच ती, लहानपणी बोटात घालुन खायचो ती, पिवळ्या रंगाची )
रु. १०
बर्फाचा गोळा... नव्हे दोन गोळे....
रु. १०
चन्यामन्या बोरं... मग ओघाओघानी चिंचा आणि आवळे
रु. २५
एक बॉलपेन
रु. २०
ओरीगामीचे कागद
रु. ४०
साबणाचे फुगे (३ रुपयाला मिळणारी ही मजा १० रुपयांना कधी झाली कळालचं नाही.)
रु. १०
४ प्लेट पाणीपुरी
रु. ४०
वसंतरावांच्या ’मारवा’ची एक सीडी
रु. १७५
माधुरी दिक्षितचं एक मोठं पोस्टर
(ती नेने होण्यापुर्वीचं....)
रु. ६०
लॉटरीचं एक तिकिट - ११ कोटीचं..
(सगळ्या गरजा भागायला निदान इतके तरी हवेच.... !)
रु. १०
एक छोटा ट्रांझीस्टर - फक्त आकाशवाणी साठी
रु. ७५
काही कोरे कागद आणि तेलकट खडुची पेटी
रु. १५
रोज आशेनं बघणा-या, त्या सिग्नलवरच्या पोरासाठी....
रु. १०
एकुण रु. ९८५


कोण म्हणतं की आज काल हजार रुपायात काही येत नाही ?
खरं तर काय येत नाही हजार रुपयात... ? आणि ह्या पलिकडे घेण्यासारखं तरी काय उरलय... ?
माझ्याकडे तर १५ रुपये अजुन बाकी आहेत......

माझं पाकीट तुमच्या यादीची वाट पाहतय....
खरं तर तुमचंच मन तुमच्या यादीची वाट पाहतय... जमलं तर थोडा वेळ काढाच ह्यासाठी !


लेखक  - धुंद रवी ( सौजन्य आणि आभार )

Post a Comment Blogger

 
Top