मी करत होती प्रेम
तेव्हा भाव खात होतास,
निघून गेल्यावर मात्र आता
आठवणी जपत बसलास.

तुझ्या एका हाकेवर
मी आली असती धावून,
अखेर मीच थकली रे
तुझी वाट पाहून.

तू तर त्यावेळी माझी
पर्वा ही नाही केलीस,
माझ्या मनाची अवस्थाही
कधीच नाही जाणलीस.

माझ्या जबाबदारीचं ओझं
तुला घ्यायचं नव्हतं,
मी तरी रे काय करु मला
लग्नाचं नातं हवं होतं.

माझ्या आयुष्याचा मार्ग
मीच मग निवडला,
मातापित्यांनी शोधलेला मुलगा
जोडीदार म्हणून स्विकारला.

माझ्यावरचं प्रेम बहुतेक
आता तुला जाणवतंय,
पण खुप उशीर झालाय
हेच तुला मला सांगायचंय.

मी नाही जपणार तुझ्या
कुठल्याच आठवणी भविष्यात,
कारण मी खुश आहे आता
माझ्या नविन आयुष्यात.

- संतोषी साळस्कर.


Post a Comment Blogger

 
Top