ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook