१२ जून. पुलं जाऊन नऊ वर्षे झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंच्या आणि सुनीत
ाबाईंच्या लग्नाची ही न्यारी गोष्ट...
............

एका लग्नाची गोष्ट आहे ही... यात वर आहेत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे आणि वधू आहेत सुनीताबाई... मोठ्या थाटामाटात, धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं, असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा जरा... आदर्श कपल असलेल्या पुलं आणि सुनीताबाईंच्या लग्नाची गोष्टच जरा न्यारी आहे...

पुलंची आणि सुनीताबाईंची पहिली भेट झाली ती मुंबईत. ६५-७० वर्षांपूर्वीचा हा काळ. तेव्हा दादर-माटुंगा भागत जुवळे नावाच्या एका गृहस्थांनी ओरिएंट हायकूल नावाची शाळा सुरु केली होती. त्या शाळेत भाई म्हणजे पुलं आणि सुनीताबाई हे दोघेही शिक्षक म्हणून कामाला लागले. तिथेच त्यांची पहिली ओळख झाली. पुलं वरच्या इयत्तेतील मुलांना शिकवायचे, तर सुनीताबाई खालच्या इयत्तेतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तेव्हा पुलंच्या वर्गात शिकायला होते. तर त्यांचे बंधू आणि राज ठाकरेंचे वडिल श्रीकांत ठाकरे यांना सुनीताबाई शिकवायला होत्या. शाळेत काम करत असतानाच दोघांची ओळख वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुलंनीच सुनीताबाईंना मागणी घातली आणि लग्न करण्यासाठी आग्रह धरला.

सुनीताबाईंना पुलं आवडत होते, पण लग्नासारख्या बंधनात अडकायला त्या सुरुवातील तयार नव्हत्या. त्यात दुसरी अडचण होती ती म्हणजे पुलंचं आधी एक लग्न झालेलं होतं. कर्जतच्या दिवाडकरांच्या घरातील मुलीशी पुलंचा विवाह झाला. परंतु दुर्दैवाने लग्नानंतर काही दिवसांतच तापाचं निमित्त झालं आणि ती मुलगी देवाघरी गेली. त्यामुळे अशा बीजवराशी लग्न लावायला सुनीताबाईंच्या घरचे राजी नव्हते. सुनीताबाईंच्या आईने तर लेकीसाठी चांगली स्थळं पाहून ठेवली होती. त्यात सुनीताबाई मूळच्या ठाकूर आणि पुलं ठरले देशपांडे. परजातीतला म्हणून ठाकूर मंडळी नाके मुरडत होती.

शेवटी एकदाची ठाकूर मंडळी राजी झाली. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली. तेव्हा पुलं रत्नागिरीला सुनीताबाईंच्या गावी गेले. पुलंनी आपल्या वतीने बोलणी करण्यासाठी भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा खास नोकर बाळू तेंडुलकर अशा दोघांनाही सोबत नेले. सुनीताबाईंनी पुलंची आई-वडिलांशी ओळख करुन दिली. त्यांनी दोघांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातचं पुलंनी आपल्या नर्मविनोदी बोलण्याने सर्वांना जिंकून घेतलं. सुनीताबाईंच्या आईलाही जावयाच्या मस्क-या स्वभावाचे कौतुक वाटू लागले. आता बोला...

अगदी त्याच बैठकीत रजिस्टर लग्न करायचं ठरलं. त्याकाळी रजिस्टर लग्नासाठीचा छापील फॉर्म आठ आण्याला मिळायचा. इतर कुणावर भुर्दंड नको म्हणून सुनीताबाईंनी तो आधीच आणून ठेवला होता. त्यांचे वडिल हे रत्नागिरीतले नामवंत वकील होते. दुस-या दिवशी कोर्टातून घरी परतताना त्यांनी आपल्या दुस-या वकिल मित्रांना मुलीच्या विवाहाबाबत सांगितले. मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल ? अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा वकिल मित्र तातडीने तयार झाले. फॉर्म वगैरे तयार असेल तर आताच निघूया, असे ते म्हणाले आणि ही वरात घराकडे निघाली.

जिल्हा न्यायालयासमोरच सुनीताबाईंचे घर होते. वडिल घरी आले की, दुपारचा चहा होत असे. वाड्याच्या फाटकाची खिटी वाजली की, वडिल आले हे कळायचे. त्यादिवशीही खिटी वाजल्यानंतर आईने चहाला आधण ठेवले. त्यांच्यासोबत आणखी तीन-चारजण आल्याचे सुनीताबाईंनी आईला सांगितले. आईने आधणात चार-पाच कप पाणी वाढवले. साक्षीदार मंडळी जमली होती. पुढच्या काही मिनिटातच पुलं आणि सुनीताबाईंचे लग्न लागणार होते. घरातील कुणाला याची साधी पूर्वकल्पनाही नव्हती. सुनीताबाई साधी, खादीची सूती साडी नेसल्या होत्या आणि नवरदेव तर चक्क घरी धुतलेल्या साध्या पायजम्यावर. बिनबाह्यांची बनियन घालून चहाची वाट बघत, सर्वांशी गप्पा मारत, सर्वांना हसवत बसले होते.

वडिलांनी आपल्या जावयाची सर्वांना ओळख करुन दिली. सगळ्यांच्या समक्ष पुलं आणि सुनीताबाईंनी फॉर्मवर सह्या केल्या आणि लग्नाचा सोहळा संपला. दरदिवशीच्या दुपारच्या चहाबरोबरच अगदी साधेपणाने पुलंचे लग्न झाले. केवळ छापील फॉर्मवर सह्या करुन ' कु. सुनीता ठाकूर ' या ' सौ. सुनीता देशपांडे ' बनल्या !

Post a Comment Blogger

 
Top