एकदा मला ना
तू माझी वाट पहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय.
कोणी तरी लागतं
आपल्याला वेडू म्हणणारं
वेडू म्हणताना आपल्यातलं
शहाणपण जाणणारं.
पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे.
मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहाणारा
वाळकं पान सुद्धा गळताना
तन्मयतेने पहाणारा.
वाळकं पान गळताना सांगतं
वसंत आता येणार आहे
वसंत ओरडतच येतो
की मी लगेच जाणार आहे.
मरताना वाटलं
आयुष्य नुसतच वाहून गेलं
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना
माझं जगायचंच राहून गेलं.
Post a Comment Blogger Facebook