एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता…
या डोंगरावर वेगवेगळया फळांच्या फळबागा होत्या.
सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या.
भाज्यांचे मळे होते.
मुलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती.
बागेत थुईथुई उडणांरं कारंजं होतं.
या बागेतून त्या बागेत जायला लाल नागमोडी रस्ते होते.
डोंगराच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल होतं.
या डोंगरावर झुळझुळणारे झरे होते.
तुडुंब भरलेल्या विहिरी होत्या.
एक छोटसं पण काठोकाठ भरलेलं तळ होतं.
तळयात सुळसुळणारे मासे होते.
आणि
फक्त पावसाळयातच कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा होता.
सगळया गावाचं या डोंगरावर फार प्रेम होतं.
गावात आलेले पाहुणे मुद्दामहून हा डोंगर पाहायला जायचे.
पाहुणे जंगलात फिरायचे.
रानमेवा खायचे.
विहिरीत पोहायचे.
फळबागेत फळं खाऊन झाडांखाली निवांत झोपायचे.
झ-यातले गोड गार पाणी पिऊन ताजेतवाने व्हायचे.
डोंगर उतरतांना सोबत फळं फुलं घेऊन यायचे.
मुलं बागेत खेळायची.
कारंज्यात भिजायची.
मजा करायची.
सगळे कौतूकाने म्हणत , अजबच डोंगर आहे!
पण…
हा डोंगर मात्र मनातून नाराजच होता. बैचेन होता.
डोंगराला वाटे,
छोटी छोटी झाडं मोठी झाली की त्याचं जंगल होतं. त्यांच्या फळबागा होतात.
लहान लहान झरे मोठे झाले, एकत्र आले की त्यांची नदी होतं.
पाणी ऊंच उडू लागलं तर त्याचं कारंजं होतं.
पायवाट मोठी झाली की त्याचा मोठा रस्ता होतो.
पण…
आपण कधीच मोठं होतं नाही!
आपली कधीच वाढ होत नाही.
आपण सगळयांना मदत करायची. सगळयांना ऊर्जा पुरवायची.
सगळया सगळयांना आनंदी करायचं.
पण तरीही…
आपली होते झीजच!
मी अशाने हळू हळू खचूनच जाईन.
..माझी कुणालाच काळजी नाही.
हे असं का?
डोंगर आपल्याच विचारात गढून गेला.
डोंगरावरच्या झाडांना, झ-यांना व रस्त्यांना डोंगराच्या मनातलं कळलं.
डोंगरावरची झाडं हसली.
झाडं सळसळली.
झाडं म्हणाली,
अरे डोंगरा, असं काय करतोस?
तुझ्यामुळेच तर आम्ही आहोत. आम्ही आमच्या मुळांनी तुला असं घट्ट धरून ठेवलंय की
तुझी झीज होणारच नाही !
आणि रे डोंगरा, आम्हाला आहे रे तुझी काळजी.
कडक उन्हाळयात जेव्हा ऊन तापू लागतं, तेव्हा आम्ही आमची सारी पानं तुझ्यावर
अंथरतो आणि आम्ही मात्र…
निष्पर्ण होऊन उन्हात तापत राहतो.. अतिशय आनंदाने!
तुझ्या पोटातलं थोडस पाणी पितो आम्ही, पण तशीच सावली ही देतो तुला.
हे ऐकून डोंगराचं मन भरून आले.
डोंगरावरचा झळा जरा खळाळला.
दगडाजवळ बुडबुडला.
झरा डोंगराला म्हणाला,
“अरे डोंगरा, तुझ्याच अंगाखांद्यावरून आम्ही वाहतो, बागडतो.
आम्हाला आहेच की तुझी काळजी”.
रे डोंगरा, आम्ही म्हणजे, तू पाणी पिऊन तृप्त झाल्यावर टाकलेल्या चुळा.
भर उन्हाळयात तुला गारवा वाटावा, म्हणून तर त्यावेळी आम्ही तुझ्या पोटात असतो.
आणि पावसाळयात, तुझ्यावरचा सगळा कचरा, गाळ वाहून नेतो.
तुला चांगलं स्वच्छ करतो.
आणि पुढच्या उन्हाळयासाठी…
तुझ्यावरच्या विहिरी भरून ठेवतो.
तळं भरून ठेवतो.
हे ऐकून डोंगराचे डोळे पाणावले.
डोंगरावरचा रस्ता उधळला.
डोंगराला बिलगला.
रस्ता डोंगराला म्हणाला,
“अरे डोंगरा, असं काय करतोस?
अरे आम्ही, तुझ्यावरच चालतो, तुझ्यातूनच वळतो, त्यातुनच वाट काढतो..
आणि वाटसरूंना वाट दाखवितो.
मग ते फळं खाऊन, पाणी पिऊन समाधानी होतात.
फुलांचा वास घेऊन ताजेतवाने होतात, तेव्हा,
ते सारे तुझंच कौतुक करतात ना?
तुलाच आर्शिवाद देतातन ना?
आम्हीच काय?
पण हा सारा गाव सुध्दा तुझ्यावरच प्रेम करतो ना, रे डोंगरा?”
हे ऐकून डोंगराला थोडासाच आनंद झाला!
भल्यामोठया डोंगराचा इवलासा आनंद झाडांना, झ-यांना व रस्त्यांना समजला,
कसं कुणास ठाऊक, पण गावातल्या मुलांना पण कळला!
मुले नाचत नाचत डोंगरावर गेली.
बागे खेळली.
मातीत लोळली.
विहिरीत पोहली.
आणि मग..
फुलबागेतली फुलं घेऊन मुलांनी तो अख्खा डोंगर फुलांनी सजवला!
हे पाहायला सारा गाव जमा झाला.
तेव्हा डोंगराला मनापासून, अगदी मनातल्या मातीपासून खूप आनंद झाला!
सगळे म्हणाले अजबच आहे हा फूल डोंगर!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook