शहरी, धकाधकीच्या जीवनात आपण ज्या गोष्टी गमावतो, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. 'काही मिळो न मिळो पण रात्री शांत झोप लागली पाहीजे' असा आपला अॅटीट्यूड असतांनाही सगळ्यात दुर्मिळ होते ती झोपच…मग दुसऱ्या दिवशी निरुत्साह, दिवसभर जांभया, अंगात कणकण, डोळे जळजळणे यासारख्या गोष्टी हटकून वाट्याला येतात. मग त्यादिवशी लगेच आपण उपायही चालु करतो – कडक चहा किंवा कडक कॉफी – किंवा कडक चहा आणि नंतर कडक कॉफी, 'रेड बूल'सारखी एनर्जी ड्रिंक्स इनकमींग-फ्री या न्यायाने दिवसभर आपल्या पोटाची वाट धरतात.

या सगळ्यांत आपल्याला एक गोष्ट लक्षातच येत नाही की 'आदल्या दिवशी आपली झोप नीट झालीच नव्हती!', त्यावर काही उपाय नको का करायला? कारण 'झोप नीट व्हावी' यासाठी काही प्रयत्नच आपण केले नाहीत तर - 'नाही रे, मला खरेच चही-कॉफी हा कॉम्बो जाम आवडतो!' – असं काहीसं बाष्फळ बोलायची पाळी आपल्यावर येते. खरे म्हणजे झोप नीट येण्यासाठी फार काही करावे लागत नाही आणि 'फक्त मनोनिग्रह असला म्हणजे बास्!' – असे मी म्हणणार नाही कारण '…फक्त मनावर कंट्रोल हवा' असं म्हटल्यावर चेहरे किती पडू शकतात हे मला ठाऊक आहे…शांत झोपेसाठी फक्त 5 टीप्स -

1. सवय जागेची: चांगल्या झोपेसाठी, झोपेशी संबंधीत बहुतेक गोष्टींची सवय असणे हा एक मस्त उपाय आहे. झोपेशी संबंधीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जिथे झोपतो ती जागा. टिव्ही बघत बघत सोफ्यावर झोपणे, गप्पा मारत मारत दिवाणखाण्यातच 'पडणे' यासारखे प्रकार चांगल्या झोपेला अत्यंत घातक. तुमचा बेड, तुमच्या बेडवर तुमची जागा रोज एकच ठेवणे ही गोष्ट अवघड आहे का? चांगली झोप ही एक सवय असते आणि त्या सवयीची सुरुवात जागेच्या सवयीने करा.

याशिवाय झोपाची जागा, तिथला प्रकाश, खेळती हवा याही गोष्टी शांत झोपेसाठी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. हवा-प्रकाश त्यातल्या त्यात शक्य तेवढा नैसर्गिक ठेवा.

2. सवय वेळेची: लॉंग टर्ममध्ये कदाचित हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाचे एक स्वतःचे असे बायॉलॉजीकल घड्याळ असते. आज मनाच्या मुसक्या बांधून रात्री दहाला, उद्या सारेगम बघून मग अकराला असे तुम्ही केलेत तर तुमचे बायॉलॉजीकल घड्याळ पार बिघडून जाईल. झोपेची एक वेळ पाळणे ही आजच्या लाईफस्टाईलमध्ये सोपी गोष्ट नाही. पण ती अशक्यही नाही. वेळेचा काहीतरी सुवर्णमध्य गाठणे नक्कीच शक्य आहे. रात्री अकरा ही त्यादृष्टीने मस्त वेळ आहे. जेवणे आटोपलेली असतात, टिव्हीचा प्राईम टाईम संपलेला असतो, पार्टीतून सटकण्यासाठीही ही वेळ खूपच बावळू नाही इ. अकराचे तुम्ही दहा-साडेदहा किंवा अगदी साडेअकराही करू शकता – ठरवलेली वेळ पाळणे महत्त्वाचे.

3. 'मला झोप आली नाही, मी झोपणार नाही!': तुम्ही टीप नं. 2 पाळत असाल तर हे वाक्य स्वतःला ऐकवायची गरज तुम्हाला पडणारच नाही. पण बेडवर झोपण्यासाठी अंग टाकल्यावर 15 मिनीटांत झोप लागली नाही तर तडक उठून झोपेचा विचार तुर्त मनातून काढून टाका. झोप आली की त्यासाठी कसलाही पुरावा लागत नाही. याच टीपचा सख्खा भाऊ म्हणजे - 'मला झोप आली आहे, मी आत्ता, ताबडतोब झोपणार'. हे करण-अर्जुन पाळाच पाळा.

4. 'दाबून जेवण, भरपूर पाणी झोपेच्या आधी नको रे बाप्पा!': पोटात अन्न-पाणी गेले की अन्नपचनाच्या नैसर्गिक प्रक्रिया चालू होतात आणि रात्रभर सलग झोपेसाठी या प्रक्रियांना काही वेळ द्यावाच लागतो. झोपेआधी किमान दोन तास जेवण किंवा भरपूर पाणी टाळा.

याचप्रमाणे, व्यायाम करून लगेच झोपू नका.

5. 'सेकंड हाफ – नो कॅफीन': 'काय करणार? ऑफीसमध्ये सतत चहा होतो' ही एक कॉमन तक्रार असते. यात काही प्रमाणात तथ्य असले तरी एक सोपा नियम करा - 'सेकंड हाफ – नो कॅफीन'. साधारणपणे दुपारच्या जेवणानंतर चहा-कॉफी घेऊ नका. याचा रात्रीच्या झोपेवर होणारा परिणाम संशोधनाने सिद्ध झाला आहे.

Post a Comment Blogger

 
Top