आज सकाळी तुला पाहूनी
मन माझे विरघळले आतुनी
ओघळले मोत्यासंम पाणी
तव ओलेत्या केसांमधुनि ...

नेत्रा मधले काजल सुद्धा
हळूच हसले सलज्जतेने
तुझ्या मनातील भावच त्याने
संगितले जणू आत्मीयतेने ...

थवा फुलांचा दारी आला
तुला भेटण्या आतुर झाला
घमघमणारा सुगंधही मग
फुलांसावे त्या फितूर झाला ...

अंबरही मग झुकले खाली
पाहून तुझी ही नेत्रपल्लवी
वटलेल्या खोडास अचानक
फुटली ग नाजूक पालवी ...

तुला पाहूनी रवि-किरणांनी
दिधली होती शीतल छाया
ते ही बिचारे पाघळले ग
पाहून तुझी ही नाजूक काया ...

तुला पाहूनी वाटत होते
या क्षणी तरी कुठे न जावे
तुझ्याच नेत्रा मध्ये हरवून
तुझ्याकडे ग पाहत रहावे ...

नकोच मज़ला दुसरे काही
सखे, तुझी ग साथ हवी
आयुष्याच्या वाटेवरती
तव प्रेमाची हाक हवी...

Post a Comment Blogger

 
Top