आज तुला शेवटची भेटायला आलेय.
तुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींची
आज मी समग्र मूर्ती झालेय.
आज तुला शेवटची भेटायला आलेय.
हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.
तुझ्याशी भेटण्याचं मनात आलं
आणि तडक आलेय निघून.
हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.
या नंतर असे येता येणार नाही.
संसाराची गाडी ओढताना
हे समजून घ्यावे लागेल तुलाही.
या नंतर असे येता येणार नाही.
मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?
दोघेही व्यवहारात रमल्यावर
माझी विचारपूस करशील ना?
मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?
ही माझ्या लग्नाची पत्रिका.
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!
ही माझ्या लग्नाची पत्रिका.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook