अबोल प्रेम....
हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?
भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !
भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !
मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?
न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !
भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे
स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे
Post a Comment Blogger Facebook