एकदा एक सावली, माणसावर रागावली.
सावली म्हणाली, ''मी आता चालली.''
पण.. सावलीला काही जाताच येईना.
सावलीला काही पळताच येईना.
कारण...
सावलीचे पाय, माणसाच्या पायात.
माणसाचे पाय, सावलीच्या पायावर.

सावली माणसाशी गप्पा मारु लागली.

सावली : सोड ना रे मला आता. सतत मी तुमच्या पायाशी पडलेली असते. किंवा कुठे ना कुठे पडत तरी असते.
ताट मानेने काही मला चालता येत नाही.

माणूस : अगं, आमची मान म्हणजेच तुझी मान!
तुझी का आहे वेगळी मान?

सावली : हे बघ, उगाच दुसरंच काहीबाही बोलू नकोस.
प्रश्न फक्त मानेचा नाही.
प्रश्न मानाचा आहे!
कळलं ना..?

माणूस : हं...समजलं.

सावली: मंग मला काही किंमतच नाही का रे?
कुणाचिही सावली काळीच पडते.
त्यामुळे माझ्याकडे पाहून काही ठरवताच येत नाही.
काही अंदाज करता येत नाही.
मी ही अशी!
(असं बोलतांना सावली अधिकच काळी पडली.)

माणूस : अगं, म्हणजे तुला काही कल्पनाच नाही तर....
तू आमच्यापेक्षाच काय पण सगळयापेक्षा खूप खूप मोठी आहेस.
तू जिथं पोहचतेस आणि तू जे काम करतेस, ते जगात कुणालाही शक्य नाही.
आणि...तुझ्यावरून केलेल्या अंदाजामुळे तर सारं जगच बदलून गेलं.

Post a Comment Blogger

 
Top