तू येशील का? येशील का?
होऊन एक कळी,
अन मी फुलताना,
माझ्यासंगे फूलशील का?
येशील का? येशील का?

एकटा तो झोका, एकटा तो मी,
एकटे आमुचे हिंदोळे
अन मी झुलताना
माझ्यासंगे झूलशील का?
येशील का? येशील का?

मेघ बरसतील कृष्ण, शमेल माती उष्ण
धुळकट धरती, सुगंध उधळील
अन मी भिजताना,
माझ्यासंगे भिजशील का?
येशील का? येशील का?

जनात कधी लढताना, मनात मी झुंजताना,
चुकेल जेव्हा एखादा, काळजाचा ठोका
अन मिठीत तुझी स्पंदने देऊन,
मला तू जगवशील का?
येशील का? येशील का?

दाटून येतील जेव्हा, आठवणी जुन्या
उघड्या पडतील तेव्हा, जखमा पुन्हा
अन त्या जखमांवर,
हलके फुंकर घालशील का?
येशील का? येशील का?

श्वासामागून श्वास, अक्षय यज्ञाचा ध्यास
ध्यास हा एकट्याचाच कधीपर्यंत?
अन यज्ञात माझ्या ह्या,
समिधा होऊन जळशील का?
येशील का? येशील का?

मी न तुला पाहिले, तू कोण कुणाची दुहिता,
मी एक मुक्त कलंदर, कोरतो नवी पायवाट,
अन दोन पावली पायवाट,
चार पावली करशील का?
येशील का? येशील का?

Post a Comment Blogger

 
Top