आज कित्येक दिवसांनी पोथीच्या निमित्ताने मी माझ्या माहेरी राहिले. सर्वांसाठीच हा आश्चर्याचा मोठा धक्का होता. कारण मी मुळीच देवभोळी या प्रकारात मोडत नाही. त्यामुळे मी या साठी वेळ देईन अस कोणालाही नव्हतं वाटलं। आईला तर त्यातूनच जास्त नवल होतं।


पोथी सुरु असताना एके दिवशी मी आपली पायऱ्या वर बसून निरूपण ऐकत होते। नेमकी माझी आई समोर येऊन माझ्या पायाजवळच्या पायरीवर येऊन बसली। मला थोडंस संकोचायला झालं। पण आईने हातानेच खूण करून मला आहे तिथेच बसायला सांगितलं।

आज चुकून आमच्या जागाची अदलाबदल झाली होती। तिच्या जागी मी आणि माझ्या जागी ती होती। एरवी तिच्या पायाजवळ बसलं की ती माझ्या डोक्यावरून हात फिरवायची। त्या हातातली ती ऊब, ती माया, ते प्रेम याची सर जगात कशालाच नाही।
पण त्या दिवशी मात्र सगळंच उलटं झालं। ती माझ्या समोर बसली आणि माझ्या लक्षात आलं, की तिचे केस आता विरळ झालेत फार। तिचे पायही फार दुखतात हल्ली। सहज तिच्या पायांच्या टाचांकडे लक्ष गेलं। टाचा पूर्ण भेगाळल्या होत्या। मी माझ्या पायाकडे पाहिलं। अत्यंत स्वच्छ, कुठेही साधीशी देखील भेग नाही। क्षणभर मला खरंच स्वतःची लाज वाटली। मग मी स्वत:लाच समजावलं ।
असही तिचं स्वतः कडे लक्ष फार कमीच। पण आता तर अजिबातच लक्ष देत नाहीये ती स्वतःकडे हे पुन्हा नव्याने जाणवलं । आणि उगाच मनात एक हुरहुर लागली।

आणि त्या एका क्षणी मनापासून वाटून गेलं की आज मी तिच्या डोक्यावरून हात फिरवायची गरज आहे। तितक्याच मायेने आणि प्रेमाने, जितक्या प्रेमाने तिने कसलीच तक्रार न करता आज पर्यंत आम्हा भावंडांच, वडिलांचं, पै-पाहुण्यांच केलं। अगदी हसत खेळत आणि मनापासून केलं। मला पुन्हा स्वतः ची लाज वाटली, कारण मी कायमच तिला गृहीत धरलं। सर्वच बाबतीत।

आपण सगळेच कित्येकदा आपल्या धावपळीच्या आयुष्यात आईला आणि सोबतच सगळ्या कुटुंबाला फार गृहीत धरतो। आपलं करिअर, आपलं कुटुंब, आपला वेग या सगळ्यात ती कुठेच नसते। तिची आठवणही येत नाही आपल्याला या धावपळीत। पण आपण मात्र तिला गृहीतच धरतो। आणि अचानक ऐके दिवशी आपल्याला खाड्कन जाग येते की आई आता म्हातारी होतेय। तिचे केस पिकायला लागलेत, गुडघ्यांनी तक्रारी सुरु केल्या आहेत। आणि तरी आपण मठ्ठ च कसे राहिलो।
तिला आता आपली गरज आहे। केवळ तिच्या डोक्यावरून हात फिरवण्यासाठी नव्हे, तर तिला मानसिक, भावनिक अशी भक्कम साथ देण्यासाठी। कदाचित हीच योग्य वेळ आहे आईची आई बनण्याची। तिला नव्याने सारं जग दाखवण्याची। आपल्या अमूल्य वेळामधला थोडासा वेळ आपल्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान व्यक्तीसाठी.....💓

आंतरजालावरून साभार / लेखक - कवी



Post a Comment Blogger

 
Top