ब्रेक अप... नात्यामध्ये येणारा दुरावा सहन करणं कुणासाठीही सोपं नसतं.
आणि त्यात जर हे तुटणारे नातं बॉयफ्रेण्ड गर्लफ्रेण्ड किंवा पतीपत्नीचं
असेल
तर तो मोठाच धक्का असतो. अर्थात, अशा वेळी 'तिला' रडण्यासाठी खांदा पुढे
करण्याची जबाबदारी मैत्रीण म्हणून तुमची असते.
...............

बॉयफ्रेण्डबरोबर किंवा नवऱ्याबरोबर नातं तुटणं हे खूपच
जीवघेणं असू शकतं. नात्यातला हा दुरावा स्वीकारणं सगळ्यांसाठीच जड जातं.
पण, न टाळता येणारी ही गोष्ट स्वीकारायला तर लागते. अशा वेळी एक मैत्रीण
म्हणून मदतीचा, आधाराचा खांदा आपल्यालाच पुढे करावा लागतो.
स्वत:बरोबरच जवळच्या मैत्रिणीच्या आयुष्याशीही आपण सगळेच रिलेट होत असतो.
तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक चांगल्या-वाईट घटना तिने आपल्याबरोबर शेअर
केलेल्या असतात. त्यामुळे तिच्या आयुष्यातला ब्रेक अप हा तिच्याबरोबरच
आपल्यासाठीही दु:खद ठरतो. अशा वेळी तिला आधार देणं खूप गरजेचं आहे.
मात्र, हा आधार देताना काही गोष्टी तिला नीट समजावून आणि पटवून द्यायला
हव्या. मात्र हे करताना तिच्या पर्सनल आयुष्यात आपण ढवळाढवळ करत नाही ना,
याचं भान राखा.

आधार द्या : आपल्या आयुष्यातील लहानमोठ्या, बऱ्यावाईट सगळ्याच गोष्टी
तिने तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. अर्थातच, अशा वेळीही पहिला फोन ती
तुम्हालाच करणार. फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटून आपलं मन ती तुमच्याकडेच
मोकळं करणार. तेव्हा तिला भेटायलाच हवं. आपल्या मैत्रिणीला आधार देण्याची
जबाबदारी तुमची आहे. अशा वेळी तुम्ही तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या.
प्रथम तिला तिचं बोलणं पूर्ण करू दे. मगच, तुम्ही तिला आधार देण्यासाठी
मत मांडा, सहानुभूती व्यक्त करा.
मन रिझवण्याचा प्रयत्न करा : या वेळी तिची समजूत तर काढायलाच हवी. या
प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही तिला नाटकसिनेमा पाहायला न्या किंवा
तिचं मनोरंजन होईल, असं काहीतरी गंमतीशीर बोलून तिचं मन इतरत्र
गुंतवण्यासाठी प्रयत्नशील व्हा. तिला घरामध्ये कुढत बसू देऊ नका.
सहानुभूती दर्शवा : दुसऱ्यांच्या दु:खात आपणही सहभागी आहोत, हे दाखवून
देण्यासाठी सहानुभूती व्यक्त करायलाच हवी. आपल्याएवढं दु:ख इतर कुणालाच
नाही. आपलं दु:ख कुणी समजून घेऊशकत नाही, असं तुमच्या मैत्रिणीला वाटणं
साहजिक आहे. मात्र, अशा वेळी तिला सहानुभूती दाखवताना तिचं बरोबर आणि
त्याचंच चूक असा पवित्रा घेऊ नका. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर काय ते तिला
समजावून सांगा. तिच्यासोबत तुम्हीही रडत बसू नका. आपल्या आयुष्यात आता
काही राहिलं नाही, असा समज करून आपल्या जीवाचं बरंवाईट काही करण्याचा
तिचा विचार असल्याचं जाणवल्यास अधिक खबरदारीने तिला सत्य परिस्थिती
समजावून सांगायलाच हवी.
मध्ये टांग घालू नका : तिचं आणि त्याचं ब्रेक अप झालं आहे. त्याने
तुम्हाला त्रास दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही त्याला फोन करून ओरडायला
नको. त्याच्याशी आमनासामना करण्याची तुम्हाला गरज नाही. ही वेळ आपल्या
मैत्रिणीला देण्याची आहे, त्याच्याशी भांडायची नाही!
परिस्थिती हाताळा : अचानक समोर आलेल्या नात्यातील दु:खाने ती खचली असणार,
दु:खी झाली असणार. काही जण तर अशा वेळी जीव संपवण्याचाही प्रयत्न करत
असतात. म्हणूनच तिला सावरण्याची महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे, हे
विसरून चालणार नाही. त्यामुळे तिच्या मनाला उभारी देईल अशाच प्रकारे
तिच्याशी संवाद साधा. यामुळेच ती कदाचित बॅक टू नॉर्मल येईल.
स्वत:वर चिडू नका : परिस्थिती सुधारत नाही म्हणून स्वत:वर चिडू नका.
आपल्या मैत्रिणीला आधार देण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रयत्यांची शिकस्त
केली आहे. पण, तरीही ती ऐकत नाही तर तुमचा नाइलाज आहे. आपण तिला आधार
देण्यात कमी पडलो, असं समजून स्वत:वर चिडण्याची गरज नाही. ही वेळच अशी
आहे, की ती कुणाचंही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. पण, याचा अर्थ असा नाही
की तिला समजावणं तुम्ही सोडून द्यावं. तिच्याशी सतत संवाद साधत रहा.
वेळ हा सगळ्या जखमांवरचा रामबाण इलाज आहे. दिवस जातील, तशी ती नॉर्मल होईल.

Post a Comment Blogger

 
Top