(महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेल्या लेख मालेतील लेखांचे संकलन इथे पोस्ट करत आहे.)
ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात. नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो.
आदर्श नवरा दाखवा ,
हजार रुपये मिळवा
खरोखरच आपल्या बायकोच्या पसंतीला उतरणे हे बाहेर काढलेली टूथपेस्ट आत घालून दाखविण्याइतके कठीण काम. सदेह वैकुंठाला गेलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा एकदा वैतागून म्हणाले होते...
तीर्थ करूं जाता म्हणती कावळा , न करिता त्याला म्हणती बावळा
फार खाय त्याला म्हणती अघोरी , राक्षस हा असे खादाड भारी
थोडे खाय त्याची करिती टवाळी , अन्न कैसे पाप्याच्या कपाळी
तुका म्हणे किती राखावी मर्जी , संसाराचे त्रास घेता.
बायका नाट्य-समीक्षकांसारख्या असतात. विनोदी नाटक काढले , तर म्हणतात , ' अर्थहीन धांगडधिंगा. ' गंभीर नाटक काढले , तर म्हणतात , ' रिकाम्या नाट्यगृहातील अयशस्वी निर्माता. ' ऐतिहासिक नाटक काढले , तरी टीका , सामाजिक नाटक काढले , तरी टिंगलीचा सूर. म्हणून म्हणतात , ज्याला रस्ता माहीत असतो , पण ड्रायव्हिंग करता येत नाही , त्याला टीकाकार म्हणतात.
नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो. रसिक नवरा प्रेमाने बायकोला म्हणतो , '' तुझा चेहरा कसा चंदासारखा सुंदर दिसतोय. '' तर लगेच ती म्हणते , '' काय हो हा तुमचा नेहमीचा टोमणे मारण्याचा त्रास! सरळ का नाही सांगत की , माझ्या चेहऱ्यावर डाग आहे म्हणून ?''
हनिमूनहून परतलेली स्मिता आईला सांगत होती , '' हा म्हणजे न अगदी येडचॅपच आहे. जाताना गाडीत अगदी वेगळा , घोगरा आवाज काढून माझा हात हातात घेऊन म्हणाला , ' स्मितू , अखेर आपण दोघे एकरूप झालो. ' अग , मला एवढी भूक लागली होती आणि हा अगदी बोअर करत होता. शेवटी मी त्याला सांगितले , ' जेवणाची ताटे दोघांची वेगवेगळी सांगा हं! ''
ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या- त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात.
एकदा माझा कार्यक्रम संपल्यावर एक बाई तावातावाने आत येऊन म्हणाल्या , '' अहो मेष राशीचे पुरुष तडफदार असतात , असे मी वाचले आहे. पण माझा नवरा तर अगदीच मेषपात्र आहे. ''
आणखी एक तक्रार त्रासदायक नवऱ्यांबद्दल बायका नेहमी करतात , '' आमचं हे येडं श्रावणबाळ आहे. बायको घरी आली , तरी आईचा पदर काही सोडत नाही. कोणत्याही वेळी आई अशी हाक मारतो. ''
एक नवरा तर जेवायला बसला की , पोळी हातात पकडून विमनस्कपणे सूक्ष्मात बघत गायचा , '' आई तुझी आठवण येते ''. शेवटी ती बाई एके दिवशी वैतागून म्हणाली , '' आईच्या हातच्या पोळ्या एवढ्या प्रिय असतील ना , तर जा आईकडेच हा कटोरा घेऊन. ''
हळवा नवरा बायकांना विलक्षण तापदायक वाटतो. लग्नानंतर काही महिन्यांतच कविताला दिवस गेले. मधून मधून उलट्या होऊ लागल्या आणि ती इतकी आनंदित झालेली असताना तिचा नवरा मात्र डोळ्यांत पाणी आणून म्हणाला , '' काऊ , किती ग त्रास होतोय तुला! खरंच ग , स्त्रीचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी. '' आणि तिच्या मांडीवर झोपून हुंदके देत म्हणाला , '' देवा , देवा माझ्या काऊचे कष्ट मला दे. तिला सोडव. ''
माझ्या पतीपीडित भगिनींनो आणि मातांनो , काऊची अवस्था त्या वेळी किती केविलवाणी झाली असेल , याची कल्पना फक्त तुम्हालाच करता येईल.
नवऱ्याचा अतिसभ्य सुसंस्कृतपणाही बायकांना तापदायक ठरतो. मध्यमवय उलटून गेलेल्या वर्षाताई थोडे थट्टेने , थोडे वैफल्याने , थोडे वैतागून सांगत होत्या , '' माझे मिस्टर म्हणजे कातिर्कस्वामीच. आठवड्यातले चार दिवस उपास. पुन्हा एकादशी , संकष्टी वेगळीच. सोमवारी शिवलीलामृत , गुरुवारी गुरुलीलामृत , शनिवारी शनिमाहात्म्य. तास न् तास पारायणे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थोडा एकान्त मिळाला म्हणून मी हळूच त्यांच्या छातीवर मस्तक टेकले , तर दूर होऊन म्हणाले , ' अगं , आज माझी एकादशी आहे. ' आम्ही हनिमूनला जायचे ठरवले , तर म्हणाले , ' आपण सोलापूरला जाऊ. तेथून गाणगापूर , तुळजापूर , पंढरपूर सगळेच जवळजवळ आहे. ' प्रवासातही ते हनुमान चालिसा , शिवस्तुती , दासबोध वाचतच होते. हॉटेलवर पोहोचल्यावर हे लगेचच आंघोळीला गेले. मी चेंज करीत होते , तेवढ्यात यांनी बाथरूमचे दार उघडले आणि ' सॉरी , सॉरी ' म्हणत पुन्हा बंद केले. नंतर आतूनच विचारले , ' झाले का ग तुझे ?''
तशी वर्षाताईंना तीन मुले आहेत , पण सांगताना त्या म्हणतात , '' मला चार मुले आहेत. हा सगळ्यांत मोठा. ''
आळशी नवरेही बायकांना फार त्रासदायक वाटतात. बरेचसे नवरे रोज दाढी करत नाहीत. केली तर जमिनीवर आरसा ठेवून , मांडी घालून अर्धा-अर्धा तास दाढी करीत बसतात. साबणाचा फेस लावलेल्या भयानक चेहऱ्याने मध्येच पेपर वाचतात. मधूनच गाल खरडतात. तो साबणाचा फेस वाटीतच बुडवून ठेवतात. नंतर ती वाटी तशीच ठेवून सरळ आंघोळीला जातात.
सारख्या जांभया देणे , जांभया देत बोलणे , प्रचंड मोठी ढेकर देणे ,घोरनारे, सारखे आडवे होऊन झोपणे असे वागणारे नवरे काय भयंकर पीडाकारक असतात , ते समजण्यासाठी त्यांच्या बायकांच्या जन्मालाच जावे लागेल. कोणताही पीडाहारी झंडू बाम त्यांच्या डोकेदुखीला उपयोगी ठरत नाही.
एक नवरा सारखा झोपून राहायचा. त्याचा तापट मुलगा सारखा आरडाओरडा करायचा. एकदा त्याची झोपमोड झाली म्हणून तो रागावला , तर बायको म्हणाली , '' झोपलेल्या बैलापेक्षा भुंकणारा कुत्रा थोडा तरी कामाचा असतो. ''
नवऱ्यांचा , बायकी चौकशा करण्याचा स्वभाव तर बायकांचा रक्तदाब हमखास वाढवतो. एक इसम , बायकोच्या मैत्रिणी आल्या की , सरळ त्यांच्या कोंडाळ्यात जाऊन बसायचा. भयंकर नाजुक-नाजुक बोलायचा. एकदा बायकोच्या मैत्रिणीला म्हणाला , '' वहिनी , साडी नवी वाटतं ?'' ती म्हणाली , '' छे हो , जुनीच आहे. '' परत तो म्हणतो , '' नाही , अंगावर कधी दिसली नाही , म्हणून विचारले हो सहज. '' तेव्हापासून ती बाई अंगभर पदर घेऊ लागली.
सारखी सिगरेट फुंकणारे किंवा तोंडात तंबाखू विरघळल्यामुळे लाळ सुटलेली असतानाही वर तोंड करून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारे नवरे बायकांना भयानक उपदवी वाटतात. काही नवरे येता-जाता आरशात बघून केस सारखे करतात , पावडर लावतात , वळून-वळून सगळ्या अँगल्सनी आरशात बघतात , हे तर बायकांना चीड आणते.
स्वयंपाकघरात मदत करतो असे सांगून काहीबाही तोंडात टाकत राहणारे नवरेही बायकांना असह्य वाटतात.
बायकोकडे सारखी मेहुणीची चौकशी करणे , सासूबद्दल विचारणा करणे , बायकोच्या मैत्रिणींच्या स्मार्टपणाचे कौतुक करणे , तिच्या वडिलांच्या इन्कमची चौकशी करणे , ' मीपण बिझिनेस करावा असे म्हणतोय ' असे नुसते म्हणत वर्षानुवषेर् पोस्टात नोकरी करीत राहाणे , अशा नवऱ्यांचा बायकांना फार संताप येतो.
कुठल्याही क्षणी लादेन येईल आणि बॉम्बस्फोट करेल अशा चेहऱ्याने वावरणारेही काही नवरे असतात. भयरसाचा अतिरेक झाल्यामुळे हास्यरस लोप पावलेला असतो. असे नवरे क्वचित हसले , तर त्यांच्या बायकांना बंपर लॉटरी लागल्यासारखे वाटते. हे सारखे काळजीत असतात. जरा दुखले , खुपले की , त्यांना भयंकर रोग झाल्याच्या भावना होऊ लागतात. बायको ' डॉक्टरांकडे जाऊ या ' म्हणाली , तर टेस्ट करून घ्यायलाही घाबरतात. अशा नवऱ्यांच्या बायकांना कायमची सदेह साडेसाती असते. असे नवरे बायकोचा कोणी अपमान केला , तरी तिचीच समजूत काढतात , '' जाऊ दे ग , तू लक्षच देऊ नकोस. ''
गुळगुळीत दाढी केलेल्या , गोल बायकी चेहऱ्याचे , काळ्याभोर डोळ्यांचे , हळुवार आवाजात गोड-गोड बोलणारे , नाजुक-नाजुक हसणारे , लाजरे-बुजरे पुरुष तर बायकांच्या डोक्यात जातात. काही पुरुष तर बहिरे असल्यासारखे दिसतात. पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. बायको काही बोलली की , पेपरमधले डोकं वर काढतात , अतिशय निविर्कारपणे तिच्याकडे पाहातात , पुन्हा पेपरमध्ये डोके घालतात.
नवऱ्यांच्या जेवणाचे प्रकारही विचित्र असतात. काही नवरे भुरके मारतात की बोंब मारतात , तेच तिला कळत नाही. मध्येच अ आ इ ई ची बाराखडी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ ढेकर देतात. काही नुसते खातच राहतात. बायकोने सहज विचारले , '' खीर आवडली का हो ?'' तर भडकून म्हणतात , '' भुरके मारतोय , दिसत नाही का ?'' काही नवऱ्यांची बोलण्याची हिंमत नसते. भाजीत मीठ विसरलेले असले , तर मुलाला म्हणतात , '' अरे बंडू बाजारात मीठ महाग झाले आहे का ?'' काही संतापी नवरे पोळीचा तुकडा हातात धरून खेकसतात , '' ही पोळी आहे का चामड्याचा तुकडा ?'' आणि बायकांना संतापजनक वाटणारे नवरे म्हणजे अर्धा-अर्धा तास भात चिवडत बसून मिचिमिची जेवणारे आणि चप् चप् असा आवाज करणारे नवरे...
... बायकांना खूप-खूप आवडणाऱ्या एका तरी परिपूर्ण नवऱ्याची पत्रिका पाहाण्याचा योग माझ्या पत्रिकेत आहे का , याचा सध्या मी अभ्यास करीत आहे.
- शरद उपाध्ये
Home
»
Marathi Jokes - मराठी विनोद
»
मराठी लेख / साहित्य - Marathi lekh / saahitya
» त्रासदायक नवरे : शरद उपाध्ये
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook