प्रेम ही कल्पना मनाला स्पर्शून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात. माझी व्याख्या वेगळी आहे. एकमेकांना समजून घेतलं, विश्वास ठेवला, विचारांची तडजोड केली, तरच संसार सुखाचा होतो. मी तुझ्यावर प्रेम केलं. तुला समजून घेतलं, तुझ्यावर विश्वासही ठेवला. तुला मी आवडत होते, तर का तुला असं वाटलं, की आपलं प्रेम संपवून टाकू या? केवळ ग्रुपमधल्या मैत्रिणी तुला काहीतरी बोलल्या आणि तू मला सोडण्याचा निर्णय घेतलास. असं का वागलास? काय कारण होतं, माझं प्रेम तोडण्याचं? का मला टाळत होतास? हे सर्व प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत. मी तुला विचारलंही, पण तू मला टोलवाटोलवीची उत्तरं दिलीस. म्हणून यापुढे तुला प्रश्न विचारणार नाही. तू स्वत:हून सांगशील, याची वाट बघेन. प्रेम तोडण्याचं कडू विष मला प्यायला लावलंस. पण तू सुखात राहावंस, एवढीच माझी इच्छा आहे. शैलेश, तुला आठवतात, आपण सोबत घालवलेले दिवस? 14 फेब्रुवारी 2004 ते 26 ऑक्टोबर 2004 हे माझ्यासाठी अनमोल क्षण आहेत आणि यापुढेही असतील. आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत. तुला वाटत असेल, की मी खोटं बोलते. पण यातला शब्दन्शब्द खरा आहे. माझ्या आयुष्यात तुला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे तुला माहीत नाही. माझं प्रेम खरं आहे रे तुझ्यावर. मला तुझी मैत्री गमवायची नाही. प्रेमाआधी जी मैत्री होती, ती मला हवी आहे. मनातलं सर्व काही तुला सांगितलं असतं, पण कदाचित तू ऐकलंही नसतंस. एकाच ग्रुपमध्ये राहून तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही ना! म्हणून माझ्या मनातला भावना तुला पत्राने कळवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व मी तुझ्यासाठीच केलं. मी तुझ्यातला प्रियकर गमावला. तुझ्यातला मित्र गमवायचा नाही. तू सांगशील, ते मान्य करेन, पण माझ्याशी मैत्री तोडू नको. ही मैत्री निर्मळ, निखळ असेल. प्रेमाचा एकही विषय मी काढणार नाही. तू सुखात राहा, हीच प्रार्थना मी रोज करते आणि करत राहेन. तुला कधीच विसरू शकत नाही. ज्याला आपण विसरतो, त्याची आठवण येते. तू नेहमी माझ्या मनात राहतोस. तुझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. म्हणून तर प्रेम संपवून टाकलं, तरी तुझी मैत्री नाही संपवली. तुला माझ्या या भावना कळल्या, तर मी सर्व काही जिकलं. माझं प्रेम आजही तूच आहेस, उद्याही तूच राहशील, तू माझ्यासोबत राहा किंवा नको राहू, आयुष्यभर तुझ्या आठवणी माझ्यासोबत राहतील. प्रेम करते तुझ्यावर, तिरस्कार करू नकोस, आयुष्यात माझ्याशी कधीही बोलणं सोडू नकोस. सर्व सहन करेन मी, पण तुझा अबोला नाही. सदैव सुखात राहा, आयुष्यात पुढे जात असताना एकदा तरी मागे वळून पाहा. उभी असेल तिथे फक्त तुझी मैत्रीण, मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.-

तुझी मैत्रीण,

सोनी

Post a Comment Blogger

 
Top