ठाणे अंमलदार नेहमीप्रमाणे वर्दी नोंदवून घेण्याचे काम करीत असतात. हवालदार, वसूलदार मंडळी आदल्या दिवशीचा हिशेब लावत असतात. तेवढय़ात एक चष्माधारी, मिशाळ व्यक्ती ठाण्यात शिरते आणि ठाणे अंमलदाराच्या टेबलासमोर जाऊन उभी राहाते.
‘मला तक्रार नोंदवायची आहे’, चष्मेधारी व्यक्ती सांगते. पुणेकर मंडळी तांबडय़ा दिव्याकडे दुर्लक्ष करीत ज्या सहजतेने आपली दुचाकी पुढे नेतात त्याहीपेक्षा जास्त सहजतेने ठाणे अंमलदार त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतात. दरम्यान, या माणसाला कुठेतरी पाहिले आहे, अशी कुजबूज हवालदार मंडळींमध्ये चालू होते. बराच वेळ डोकं खाजवल्यावर या व्यक्तीला वांद्रय़ाच्याच कलानगर परिसरात पाहिले आहे, यावर तमाम हवालदारांचे एकमत होते.
‘मला तक्रार नोंदवायची आहे.’ ठाणे अंमलदाराच्या दुर्लक्षामुळे ‘चष्मेधारी’चा आवाज चढतो.
‘नोंदवा की, आम्ही त्यासाठीच बसलोय इथं. बोला कसली तक्रार नोंदवायचीय’, ठाणे अंमलदार खास ‘पोलिसी’ आवाज


काढतो.
‘आमच्या लेकीचं अपहरण झालंय’, चष्मेधारी सांगतो.
‘अपहरण, शिरीयस भानगड दिसते आहे’, असं म्हणत ठाणे अंमलदार खुर्चीत अंमळ सावरून बसतो. सकाळी सकाळी अपहरणासारखी तक्रार चालून आलेली. तक्रार करणारा माणूस कपडय़ालत्त्यावरून बरा दिसतो आहे. त्यामुळे हवालदार, वसूलदार अशा सगळ्यांत मिळून ‘अर्धी पेटी’ तरी सुटायला हरकत नाही, असा हिशेब ठाणे अंमलदाराच्या मनात चमकून जातात.
‘अरे, साहेबांसाठी ‘थंडा’ मागव’, खूश झालेले ठाणे अंमलदार आज्ञा देतात.
‘बोला साहेब, काय नाव आहे मुलीचं’, ठा.अं.
‘मराठी’, चष्मेधारी.
पोलीस खात्याला आवश्यक असलेली माहिती ठा.अं. विचारून घेतात.
‘तुमचा कुणावर संशय’, ठा.अं.
‘आमच्या देवऋषानं सांगितलंय, मुलीला शिवाजी पार्क परिसरात नेलं आहे’, चष्मेधारी.
‘अरेच्चा!’ ठा.अं.
‘ज्या बंगल्यात तिला ठेवलंय त्या बंगल्याचं नाव ‘कृ’पासून सुरू होते आणि बंगल्यातलं शेवटचं अक्षर ‘ज’ आहे, असंही सांगितलंय देवऋषानं’, चष्मेधारी. ‘मग जाऊ या शिवाजी पार्कला. बघू या बंगला सापडतोय का’, इतका वेळ कडेला उभा राहून ठा.अं. आणि चष्मेधारी यांच्यातला संवाद ऐकणारा हवालदार तोंड उघडतो.
चष्मेधारी, त्याचे दोनचार सल्लागार आणि हवालदार मंडळी त्वरेने शिवाजी पार्ककडे कूच करतात. वाटेत मुलीच्या ‘प्रिं.’काकांचं घर लागतं. अक्षयतृतीयेच्या राहिलेल्या पुरणपोळ्या खाऊन ‘प्रिं.’काका निवांत झोपलेले असतात. चष्मेधारींचे शाब्दिक ठोकाठोक करणारे सल्लागार ‘प्रिं.’ना उठवतात. दुपारच्या झोपेसारखा ‘कोहिनूर’ सोडावा लागल्यामुळे ‘प्रिं.’ चडफडत उठतात. शिवाजी पार्कमध्ये इकडेतिकडे हिंडल्यावर एका सल्लागाराला ‘कृष्णकुंज’ बंगला दिसतो.
‘साहेब, आपल्याला पाहिजे तो हाच बंगला आहे बहुतेक!’ सल्लागार चष्माधारींच्या कानात कुजबुजतात.
चष्माधारींनाही आपल्याला हवा असलेला बंगला हाच, याची खात्री पटते. ते सल्लागार आणि हवालदारांना घेऊन बंगल्यात घुसतात. कडी ठोठावतात. दरवाजा उघडायला त्यांची कन्या ‘मराठी’च येते.
तिला पाहून चष्माधारी आणि त्यांच्या सल्लागारांचे चेहरे उजळतात.
‘बघा, हवालदार साहेब, मी म्हणत होतो ना, आमची मुलगी इथंच असणार म्हणून! अरे, बघता काय चला तिला घेऊन’, चष्माधारी.
‘खबरदार, अंगाला कुणी हात लावला तर! हवालदारसाहेब, मला कुणी पळवून आणलेलं नाही. मी स्वत:हून ते घर सोडलंय आणि काकाच्या घरी राहायला आलेय.’ खडय़ा आवाजातले मराठीचे बोल ऐकून चष्माधारी व त्याचे सल्लागार वरमतात.
‘पण मुली, असं वडिलांना न सांगता घर सोडून का आलीस? काकाकडं चाललेय असं सांगून तरी यायचंस’, हवालदार.
‘तुम्हाला काय सांगू हवालदारसाहेब, मला ‘फिक्स्ड डिपॉझिट’मध्ये ठेवून नुसतं व्याज खाताहेत हे. आपल्या लेकीला काय हवंय हे कधी विचारतसुद्धा नाहीत. घराबाहेरसुद्धा पडू देत नव्हते मला. हे कमी की काय म्हणून आमच्या शेजारी ‘यूपी’तलं एक कुटुंब आलंय राहायला, त्यांना ‘हिंदी’ नावाची मुलगी आहे. तिचा वाढदिवस ते साजरा करायचे, पण माझ्या वाढदिवसाला एक फुगा नाही की मेणबत्ती नाही. माझ्याकडे हे लक्ष देत नाहीत म्हणून मी काकाकडं राहायला आलेय. हा काका सध्यातरी माझं कौतुक करतोय. बघूया. तोही हय़ांच्यासारखा वागला तर हे घरही सोडावं लागेल मला.’
‘मराठी’चे रोखठोक बोलणे ऐकून चष्माधारी व त्याचे सल्लागार गप्प होतात आणि मुकाटपणे निघून जातात.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top