कशी मुलगी पाहिजे?
तसा फारच सोपा वाटणारा प्रश्न आहे.
उत्तर तितकंच अवघड.
हा प्रश्न आम्हाला कोण विचारतं, कधी विचारतं त्यावर आमचं उत्तर अवलंबुन असतं.
म्हणजे आईनी रविवारी दुपारी मस्त आम्रस-पुरीचं जेवण झाल्यावर विचारलं की आमचं उत्तर असतं,
"असंच मे महिन्यात रविवारी दुपारी आम्रस-पुरी जेवायला घालणारी मुलगी पाहिजे."
पण जरा serious उत्तर द्यायचं झालं, तर आईला दाखवायला घरी घेऊन जाण्यासारखी ideal
पोरगी जशी असते - शांत, सोज्वळ ("सोज्वळ" अशा पोरी आणि पोरं आता अस्तित्वातच नसतात),
सगळ्यांशी मिळुन-मिसळुन राहणारी, घरातलं आणि बाहेरचं उत्तमरित्या सांभाळणारी, घरातल्या
थोरल्यांचा मान राखणारी, लहानांचे लाड पुरवणारी, सणासुदीला उत्साहानी पुढाकार घेणारी,
ई. हे सर्वोत्तम उत्तर असतं. थोडक्यात म्हणजे काय, ही मुलगी म्हणजे 'बायको कॅटेगरी'!
जवळच्या नातेवाईकांनी विचारलं की तेव्हा थोड्याफार फरकानी आईला दिलेलं उत्तरातली 'बायको
कॅटेगरी' उपयोगी पडते. हं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या लग्नात गेल्यावर आईच्या
मावशीच्या पुतण्याच्या आत्यच्या नव्वदीच्या पुढच्या सासुनी विचारलं तर जोरात त्यांच्या कानात
जाऊन म्हणायचं,
"घरातल्या देवाची पुजा तिनी मनोभावानी करायला पाहिजे, आणि रविवारी दुपारी जेवण
झाल्यावर आमच्या आजीचे पाय चेपुन द्यायला पाहिजे - अशी मुलगी मला हवी आहे!"
~"मिळेल हो, नक्की मिळेल!" असा आशीर्वाद हमखास मिळतोच!
मित्रांपैकी कुणी विचारलं की उत्तर 'बायको कॅटेगरी' (BC) वरुन 'अप्सरा कॅटेगरी' (AC) मधे
बदलतं. शेवटी लग्न करायचं असतं म्हणुन 'माल कॅटेगरी'तली मुलगी कितीही आवडली तरी लग्न AC
किंवा BC शीच करायचं असतं.
'अप्सरा कॅटेगरी' म्हणजे रोमन हॉलिडे मधली अतिशय ग्रेसफुल आणि रॉयल दिसणारी ऑड्रे हेपबर्न,
किंवा 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' अशा सुंदर खळीतुन प्रेमात पाडणारी प्रिटी झिंटा, किंवा
'पल, पल, हर पल' मधे आपल्याकडे हर पल प्रेमाच्या अपेक्षेने पाहणारी विद्या बालन!
चुकुन जर हे AC-वालं उत्तर आईला दिलं की,
"अरे! जमिनीवर उतर! स्वत:कडे पाहिलं आहेस का कधी आरशात? अरे, त्या फक्त सिनेमात असतात.
खरं आयुष्य खूप वेगळं असतं!"
सगळ्यात अवघड परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा एखादी मैत्रिण असा प्रश्न विचारते.
कशी मुलगी पाहिजे?
तिला पण बिन्दास्त AC-वालं उत्तर देऊन टाकायचं.
मित्राला 'AC' म्हट्लं की पटकन समजतं, पण मैत्रिणीला त्यातले बारकावे पाहिजे असतात.
मग ते बारकावे सांगीतले, की ती तिची कोण एक 'जवळची' मैत्रिण ती तुम्हाला सुचवते.
मग स्वत:हूनच सांगते,
'ती तशी छान आहे, पण अप्सरा नाहीये रे... साधीच आहे...' (म्हणजे तुमचा शोध पुन्हा सुरु)
किंवा
'अरे! अगदी अप्सरा आहे! ऐश्वर्याच!' (अशी शक्यता जवळ-जवळ शून्य असते - तुम्हाला भेटेपर्यंत
सलमान, विवेक नाहीतर अभिषेकचा नंबर आधीच लागलेला असतो)
म्हणजे एवढं सगळं करुन उपयोग काहीच नाही!! :-(((
अप्सरा आणि बायको कॅटेगरी दोन्ही वेगवेगळ्या असतात का?
Can I not have best of both the worlds?
आम्हाला कशी मुलगी पाहिजे?
1) सर्व प्रथम म्हणजे ती हुशार, confident आणि independent पाहिजे - ती कशी ओळखायची?
ह्या करता "हीथ्रो टेस्ट" वापरायची. समज ती मुलगी हीथ्रो एरपोर्टवर एकटीच मागे राहिली.
तर हीथ्रो वरुन तिला एकटं घरी येता आलं पाहिजे. मग आमचं घर लंडन मधे असो, मुंबई मधे असो,
किंवा झुमरीतलैय्या मधे! तिला तिथे एकटं येता आलं पाहिजे! म्हणजे ही टेस्ट करायाला आम्ही तिला
मुद्दामुन एकटं नाही सोडणार, पण मुद्दा हा आहे की ती तेवढी हुशार, confident आणि
independent पाहिजे.
२) दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिला मस्त चहा करता आला पाहिजे. स्वयंपाक जमला, नाही जमला तरी
चालेल. पण रोज सकाळी एक कप, आणि संध्याकाळी घरी परत आलं की एक कप असा तिच्या हातचा
बुंगाट चहा मिळाला, तर स्वर्ग-सुखच लाभलं असं समजायचं. आणि चहा बरोबर तिला मस्त गप्पा
मारता आल्या पाहिजेत!
३) आम्हाला लग्नात हुंड्यात ३ नव्या गाड्या पाहिजेत - एक काळी BMW, एक सिल्वर मर्सिडीज,
आणि एखादी तिच्या आवडीची - ह्या सगळ्या गाड्या Leo Mattel कंपनीच्याच पाहिजेत, आणि
आकार इतका मोठा पाहिजे की त्यातली प्रत्येक गाडी आमच्या तळहातावर मावली पाहिजे! म्हणजे
काय की आमच्या घरच्या शोकेस मधे त्या गाड्या पार्क करता येतील. शोकेस मधे आमच्या
बालपणातल्या इतर गाड्या आहेत, आणि आताच्या जगात पार्किंगच्या जागेचा इतका अभाव आहे,
त्याला आम्ही तरी काय करणार?
४) आवडतं पुस्तक आणि सिनेमाबद्दल विचारलं की तिनी पहिलंच उत्तर 'प्राईड आणि प्रेजुडाईस'
आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सोडुन काहीही सांगितलेलं चालेल. "चंपक / चांदोबा" आणि
"डॉक्टर कोतनीस की अमर कहानी" हे उत्तर पण चालेल! अहो, जशी आमची अप्सरा अस्तित्वात
नाही तसाच तो जेन ऑस्टेनचा "मिस्टर डार्सी" आणि शाहरुखचा "राहुल" फक्त पुस्तकात किंवा
सिनेमा विश्वातच सापडतो हो!
५) तिला आमचं टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल ह्या खेळांबद्दलचं असीम प्रेम चाललं पाहिजे
- तिला पण हे खेळ आवडत असतील, तर उत्तमच! खेळता येत असतील तर absolutely nothing
like it!
६) तिला फ्रेंच येत असेल तर लई भारी, कारण फ्रेंच इतकी romantic भाषा नाही. आमच्या
तुटक्या-फुटक्या फ्रेंचचे शब्द तिला एखाद्या शायरी किंवा प्रेमगीतातले भासले पाहिजेत. अहो शेवटी
म्हणतात ना,
"nothing else, but an honest intent matters".
७) आम्हाला salsa, jive हे नृत्य प्रकार येत नाहीत, पण शिकायची तीव्र इच्छा आहे. तिला
येत असेल, तर आम्हाला शिकवायचं, किंवा आमच्या बरोबर शिकण्याची तयारी पाहिजे. नाहीतर
आमचा भगवान स्टाईल गणपती डान्स चालला पाहिजे.
८) हिंदी सिनेमा बद्दलचं आमचं अफाट वेड तिला पटलं पाहिजे. अमिताभ, राहुल देव बर्मन, रेहमान
, गुल्जार, किशोर हे आमचे दैवत आवडत नसतील तर निदान बघायची/ऐकायची तयारी पाहिजे.
अधुन-मधुन आम्हाला गोविंदा आणि हिमेश पण आवडतो. (आधीच सांगितलेलं बरं!)
९) आमचं आयुष्यभराचा एकमेव मौल्यवान खजिना म्हणजे आम्ही बालपणापासुन जमवलेली पुस्तकं. आमच्या
खोलीतल्या प्रत्येक कपाटात, बॅगेत, पलंगाखाली, डेस्कवर, बॉक्स मधे, माळ्यावर, फरशीवर, नजर
जिथे जाईल तिथे आमचा खजिना पसरलेला आहे. त्या खजिन्याबद्दलचं आमचं प्रेम तिला पण असावं,
नाहीतर "काय ही रद्दी जमा केली आहे" असले विधान आम्ही खपवुन घेणार नाही.
१०) सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही पत्रिका पाहतो. आम्हाला मुलगी फक्त
"हास्य" राशीची पाहिजे. आणि तिचा रक्तगट कोणताही असु दे, पण attitude मात्र 'B+'
पाहिजे.
चला, आजच आमच्या मातोश्रींना ही १० गुणांची यादी आम्ही कळवतो. म्हणजे त्यांना शोधायला
बरं. आणि तुमच्या पैकी कोणाला ह्या "अप्सरा + बायको" कॅटेगरीत मोडणारी एखादी मुलगी
माहिती असेल, तर आम्हाला त्वरीत कळवावे, म्हणजे पुढच्या बोलणीला सुरुवात करता येईल.
तो पर्यंत आम्ही गुल्जार भाईंच्या नविन गाण्यावर झूम बराबर झूम करत बसतो,
धागे तोड लाओ चांदनी से नूर के,
घुंघट ही बना लो रौशनी से नूर के,
शर्म आ गयी तो आघोष में लो,
हो सांसों से उलझी रहें मेरी सांसें,
बोल ना हलके, हलके
बोल ना हलके, हलके...!!!!!!!!!!!!!!
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook