मी आता ठरवले आहे, शांतपणे दंगा करायचा
खूप मोठ्यंदा हळूच हसायचे, आणि गप्प बसून जोरात गायचे

गाउन दमल्यावर मी झोपायला गेलो, थोडावेळ पडून राहिलो
शेवटी झोप येत नाही म्हणून, वैतागून झोपी गेलो

नंतर तिथे मला,एक नसलेला माणूस दिसला
माझ्या जवळ येऊन मला, तो लांबूनच म्हणाला

"मी तुला इथे दिसलो असा नसलेला
हे प्लीज़ तू सांगू नकोस कोणाला"

मी म्हणालो, मी हे कुणाला का सांगू नको ?
तो म्हणाला, मी नियम मोडला म्हणून कटकट नको ! (नोट:- नसलेला असल्याचा नियम)

मी म्हणालो, प्रत्येक नियमाला असतात अपवाद,
तो म्हणाला, ह्या नियमालाही आहे अपवाद !
(नोट:- विचार करा "प्रत्येक नियमाला असतात अपवाद" चा अपवाद पॅरडॉक्स आहे))

म्हणालो ठीक आहे, मी कोणाला नाही सांगणार
सांगितले तर फक्त मी सगळ्यांना सांगणार

म्हणाला सगळ्यांना सांगितले तर ठीक आहे
पण कुणाला सांगितले तर मात्र प्रॉब्लेम आहे

मी म्हणालो, तू असा कसा आहेस नसलेला
तो म्हणाला, सांगतो तुला कसा आहे मी असा नसलेला

"जो माणूस असतो तो असतो तिथे असलेला,
जो माणूस नसतो तो नसतो तिथे असलेला

म्हणूनच जेव्हा मी नसतो इथे असलेला
तेव्हा, मी असतो इथे नसलेला ! "

तो म्हणाला पुढे, "समजावले हे मी तुला
करतो हात पुढे, पैसे दे तू आता मला"

मी म्हणालो, मी कधी म्हणालो की "मी तुला पैसे देईन" ?
तो म्हणाला, खोटारडा आत्ताच म्हणालस की "मी तुला पैसे देईन !" (नोट:- वरचे वाक्य बघा, खरच म्हणाला !)

मी म्हणालो, खोटरड्यांचे मात्र एक आपले बरे असते
त्यांचे खोटे वाक्य देखील खरे असते

माझ्यावर विश्वास ठेव, खरे सांगतो खोटे नाही
हे वाक्य खोटे आहे हे खरे आहे खोटे नाही

ऐकून आमचे हे विचित्र बोलणे, फिरले माझे मस्तक
जाग आली तेव्हा माझ्या हातात होते, "MBA लॉजिक" चे पुस्तक

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top