मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top