दोन विवाहितांमध्ये आपला जोडीदार सोडून दुसऱ्या कुणाबरोबर प्रीतीचं नातं
तयार होणं, हे दोघांमधलं नातं संपुष्टात आल्याचं लक्षण आहे. असं होऊ नये
म्हणून, दोघांकडूनही प्रयत्न होणं गरजेचं आहे. बिकॉझ, रिलेशन इज ऑल अबाऊट
गिव्ह अॅण्ड टेक........
ऑफिसमधून रात्री आठ वाजता अंकुश आणि रिचा निघाले. त्याच्या आग्रहास्तव
कॅफे हाऊसमध्ये गेल्यानंतर, त्या मंद प्रकाशात दोघांनाही शांत वाटलं.
दोघंही एकाच फर्ममध्ये नोकरी करत होते. रिचा त्याच्या प्रोजेक्टमध्ये
त्याची अस्टिटण्ट म्हणून काम करत होती. एकमेकांशी संबंधित असलेल्या
कामानिमित्त त्यांचा सहवास वाढला आणि त्यांची जवळीकही. मैत्रीतून
प्रीतीचं नात निर्माण झालं. कुणालाही वाटेल यात वेगळं ते काय? पण
वेगळेपणा आहे, कारण दोघंही विवाहित आहेत.
दोघांनाही संसार आहे. परंतु आपल्या संसारात ते समरस नाहीत. त्यामुळेच
एकमेकांची सुखदु:खे सांगताना जास्तीत जास्त वेळ ते एकत्र घालवू लागले.
म्हणून दिवसभराची मरगळ झटकण्यासाठी अंकुश रिचाला कॉफी प्यायला घेऊन गेला.
त्यांच्या ऑफिसमधील इतर जण त्यांच्या या वागण्यावर टीका करत, प्रसंगी
टोमणेही मारत. परंतु ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करत. अंकुशच्या मते, अपर्णा
त्याला प्रेमच देत नव्हती. घर कसं सांभाळावं, हे तिला माहिती नव्हतं.
तिच्या हेकेखोर स्वभावामुळे त्याचे आईवडिल त्याच्यापासून दुरावले होते.
कधी प्रेमाने गप्पा मारणं तर तिला जमतच नव्हतं. केवळ तिला त्याच्याबाबत
तक्रारीच असायच्या आणि या सर्वांना कंटाळून तर, अंकुश रिचामध्ये गुंतत
चालला होता.
अंकुश आणि अपर्णाचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाआधी दोन-चार वर्षं
हिडणंफिरणंही झालं होतं. एकमेकांशी संवाद साधाताना माझं तुझ्यावर किती
प्रेम आहे, हे सांगण्यातच वेळ जायचा. लग्न कसं करायचं? हनीमूनला कुठे
जायचं? एकमेकांचं वागणं आणि एकमेकांचे विचार हे संसाराला सुरुवात
केल्यावरच कळले. अन् त्या विचारातून वाद उद्भवायला लागले.
बऱ्याच जोडप्यांच्या बाबतीत असंच घडतं. दोघांची मनं जर जुळली नाहीत तर मन
स्वैर वागतं आणि त्याचवेळी आपली सुखदु:खं समजून घेतली तर, प्रेमाचा
वर्षाव सुरू होतो आणि सुरू होतात एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्स.
पण अशी नाती निर्माण होण्यामागची कारणं काय? पती आणि पत्नी यांच्यापैकी
एकाच्या दोषामुळे एकजण तिसऱ्याकडेच आकषिर्त होतो. कधी त्या दोघांमध्ये
व्यवस्थित संवाद नसेल किंवा पत्नीला संसारात स्वारस्य नसेल, माझी जोडीदार
मला समजून घेत नाही, ही अढी मनात असेल तर, पती-पत्नीच्या नात्याचा नुसता
देखावाच निर्माण होतो. म्हणजे संसारात जर जोडीदाराची योग्य साथ लाभत नसेल
तर पुरुष मनाची निराशा झटकण्यासाठी तर, स्त्री प्रेमाच्या आधारासाठी या
संबंधात ओढले जातात.
केवळ कारणमीमांसा देऊन पती-पत्नीचं नातं संपुष्टात येईल का? या नवीन
नात्याने तुमच्याही मनात अपराधी भावनाच निर्माण होईल आणि खरोखर नात्यातला
हा गुंता जो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहात त्यात, तुम्ही अधिक
अडकून पडाल. म्हणून जोडीदार न जोडता आपल्या वडिलधाऱ्या मंडळींचा, अनुभवी
व्यक्तींचा सल्ला घेतला तर, निश्चित त्यातून मार्ग मिळेल. दोघांचं नातं
टिकवून ठेवण्यासाठी एखाद्या मॅरेज काउन्सिलरची मदत घेणंही फायद्याचं
ठरेल. कारण नवरा-बायकोच्या स्वभावात असलेल्या त्रुटींचा अचूक अभ्यास
करून तुम्हाला तिथे योग्य मार्गदर्शनही मिळेल.
- गौरी कोठारी
(सायकॉलॉजिस्ट अॅण्ड सायकोथेरपिस्ट)
Post a Comment Blogger Facebook