आधी काही कारणाने घेईन घेईन म्हणता म्हणता घ्यायच्या राहून गेलेल्या भेटवस्तू विकत घ्यायला मी क्रिसमसच्या आदल्या दिवशी सुपर मार्केटमध्ये गेले. तिथल्या तौबा गर्दीला बघता माझी स्वतःशीच कुरकुर सुरू झाली,"आता इथेच जाणार सगळा वेळ.. कित्ती ठिकाणी जायचं बाकी आहे अजून ! क्रिसमसची गर्दी वाढतेच आहे दरवर्षी. किती बरं होईल या सगळ्यातूनच सुटका झाली तर.." असं कुरकुरतच मी खेळण्यांच्या विभागाकडे सरकले आणि तिथल्या महागड्या खेळण्यांकडे बघून किंमतींच्या नावाने बोटं मोडायला सुरूवात केली. इतक्या महागड्या खेळण्यांशी मुलं खेळत तरी असतील का? असा प्रश्न आगंतुकाप्रमाणे मनात डोकावून गेला.

खेळणी बघत असतानाच छोटा, साधारण ५ वर्षाचा एक मुलगा बाहुली छातीशी कवटाळत असलेला मला दिसला. बाहुलीचे केस कुरवाळत हताशपणे तो त्या बाहुलीकडे बघत होता. कुणासाठी बरं त्याला ही बाहुली घ्यायची असेल? अशी मला उत्सुकता वाटली. तोवर तो मुलगा वळून त्याच्यामागे उभ्या असलेल्या एका वयस्कर स्त्रीला म्हणाला,"ग्रॅनी, खरंच आपल्याकडे नाही का गं ह्या बाहुलीसाठी पुरेसे पैसे?"

"तुला माहितेय ना बाळा,तुझ्याकडे नाहीत तेवढे पैसे." एवढे बोलून त्या स्त्रीने त्या मुलाला तिथेच थांबायला सांगून दुसरीकडच्या वस्तू बघायला सुरूवात केली. तरीसुद्धा तो लहानगा ती बाहुली हातात धरूनच उभा होता.

शेवटी मी त्याच्याकडे जाऊन त्याला विचारलंच की ही बाहुली त्याला कोणासाठी घ्यायची आहे. "ही बाहुली माझ्या बहिणीला खूपच आवडली होती आणि तिला ती ख्रिसमससाठी हवी होती. कित्ती खात्री होती तिची की सांताक्लॉज तिला हीच बाहुली देईल म्हणून !"

"देईल की मग आणून सांताक्लॉज तिला ती बाहुली. तू का काळजी करतो आहेस?"

 .
तो दुःखी स्वरात बोलला,"नाही. ती आत्ता जिथे आहे तिथे सांता नाही जाऊ शकत. मला ही बाहुली माझ्या मम्मीला द्यावी लागणार आहे, मग ती देईल माझ्या बहिणीला जेव्हा ती तिच्याकडे जाईल." त्याचे डोळे पाणावले होते हे बोलताना. "माझी बहिण देवाकडे गेली आहे. पप्पा म्हणतात की मम्मीपण लवकरच जाणार आहे देवाकडे, म्हणून मला वाटलं की ही बाहुली मी मम्मीकडे देईन म्हणजे ती ही बाहुली माझ्या बहिणीला देईल."

काळजात चर्र झालं माझ्या. मान वर करून माझ्याकडे बघत तो मुलगा म्हणाला,"मी सांगितलं आहे पप्पांना, मम्मीला इतक्यात जाऊ नका देऊ म्हणून. तिला वाट बघायला सांगितलं आहे, मी इथून परत जाईपर्यंत." त्याने हळूच त्याच्या खिशातून त्याचा स्वतःचा एक सुंदर फोटो काढला ज्यात तो खूपच गोड हसत होता ,"मम्मीला मी हा फोटोही तिच्याबरोबर न्यायला सांगितला आहे म्हणजे ती मला विसरणार नाही. मला माझी मम्मी खूप खूप आवडते आणि ती मला सोडून कुठ्ठे कुठ्ठे जाऊ नये असं मला खूप वाटतं पण पप्पा म्हणाले की तिला जावंच लागेल, माझ्या बहिणीची काळजी घ्यायला." डबडबल्या डोळ्यांनी तो परत त्या बाहुलीकडे बघायला लागला. मी पटकन माझ्या पर्समधून काही नोटा काढल्या आणि त्या लहानग्याला म्हणाले,"आपण तुझ्याकडचे पैसे परत मोजून बघुया का? काय सांगावं पुरतील इतके झाले असले तर?" आशेने मान डोलवत तो तयार झाला. मी त्याला कळणार नाही अशा बेताने माझ्याकडच्या नोटा त्याच्या पैशात मिसळवून टाकल्या आणि आम्ही मोजायला सुरूवात केली ! बाहुलीकरता पुरेसे पैसे तर झालेच आणि तरीही थोडीशी रक्कम उरली. अत्यंत आनंदित होत तो म्हणाला,"ओह गॉड तू कित्ती चांगला आहेस, मला आत्ता हवे होते तर पैसेही दिलेस तू." मग तो माझ्याकडे बघून म्हणाला,"कालच मी रात्री झोपताना गॉडला सांगितलं होतं ही बाहुली घ्यायला मला पैसे द्यायला.. म्हणजे मम्मी ती माझ्या बहिणीला देऊ शकेल. त्याने ऐकलं माझं. मला मम्मीसाठी पांढऱ्या रंगाचा गुलाब घेण्यासाठीही पैसे हवे होते, पण इतका हावरटपणाही बरोबर नाही म्हणून मी नव्हते मागितले. पण आता माझ्याकडे दोन्ही गोष्टी घ्यायला पैसे आहेत ! माझ्या मम्मीला पांढरा गुलाब खूप खूप आवडतो." अशाच आमच्या गप्पा चालल्या होत्या तोवर ती वृद्ध स्त्री परत आली आणि मी माझ्या सामानाबरोबर पुढे निघून गेले. काही केल्या त्या मुलाचे विचार माझ्या मनातून जात नव्हते.

   

 दोन दिवसापुर्वीच्या वर्तमानपत्रातली एक दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्यामुळे झालेल्या अपघाताची बातमी आठवली. त्या ट्रकने कारला धडक दिल्याने तो अपघात झाला होता. त्या कारमध्ये एक तरुणी आणि एक छोटी मुलगी होती. अपघातात ती लहान मुलगी तर जागीच गतप्राण झाली होती आणि ती तरुणी अत्यवस्थ होती, असं सांगितलं होतं. त्या तरुणीला जिवंत ठेवण्यासाठीची यंत्रणा चालू ठेवायची की नाही हे फक्त त्या कुटुंबाने ठरवायचं होतं, कारण ती तरुणी कोमामध्ये गेली होती. हा लहानगा त्याच तर कुटुंबातला नाही ना? असा विचार मनात तरळून गेला.

त्या मुलाशी भेटले त्यानंतर दोनच दिवसांनी मी वर्तमानपत्रात त्या तरुणीच्या निधनाबद्दल वाचलं. मी स्वतःला आवरूच शकले नाही आणि पांढऱ्या गुलाबांचा एक गुच्छ घेऊन तिच्या अंतदर्शनाला गेले जिथे तिचा मृतदेह सर्वांना शेवटचे दर्शन घेता यावे म्हणून ठेवला होता.

कॉफिनमधल्या तिच्या हातात त्या लहानग्याच्या फोटोसोबत एक सुंदरसं पांढरं गुलाबाचं फुल होतं आणि ती बाहुली तिच्या हृदयाशी ठेवली होती.


रडतरडतच मी ते ठिकाण सोडलं. या घटनेनी माझं आयुष्य पारच बदलून टाकलं होतं. एकीकडे त्या क्षणी त्या निरागस मुलाचं त्याच्या आई आणि बहिणीवरचं इतकं अलोट प्रेम दुसरीकडे एका क्षणात एका कुटुंबाचं सर्व सुख मातीत मिसळणाऱ्या त्या दारुड्याचा अतोनात राग.. दोन्हीही सहन करणं हे निव्वळ आवाक्याबाहेरचं होतं.

मूळ कथाकार - अज्ञात ( फॉर्वर्डेड मेलमधून आली होती ही कथा. )
स्वैर अनुवाद - वेदश्री जोशी.













Post a Comment Blogger

 
Top