एक होता राजा,त्याला एक असाध्य विकार जडला.काही केल्या त्यावर इलाज होईना. म्हणून एखाद्या अनुभवी आणि वयोवृद्ध वैद्याला दाखवावे असे ठरले.
असा एक वैद्य शेजारच्या राज्यात होता.त्याला बोलावलं.तो आला,त्यानं राजाची नाडी तपासली आणि सांगितलं की, ‘हा आजार मोठा असाध्य वाटतो पण त्यावरचा इलाज फार सोपा आहे.राजाच्या नजरेला लाल रंग जेवढा दिसेल तेवढा त्याचा आजार बरा होईल.’ मग काय सगळेच कामाला लागले.
राजाने महाराणीला आज्ञा दिली. रोज माझ्यासमोर येताना लालच साड्या नेसायच्या.राणीने तसे केले आणि राजाची प्रकृती सुधारायला लागली.मग राजाने दररोज दगबारात येणार्यांनाही लालच कपडे परिधान करायला सांगितले. राजाची आज्ञा शिरसावंद्य मानून सारे दरबारी लाल वेषात यायला लागले.अजून प्रकृतीत सुधारणा झाली.
आता अजून लाल रंग कोठे दिसेल यावर दरबारात चर्चा झाली.राजधानीतल्या सगळ्या घरांना लाल रंग दिला पाहिजे. मग राजा दररोज गावातून फेरफटका मारून आला की, त्याला सगळीकडे लालच लाल दिसायला लागेल आणि त्याची प्रकृती एकदम ठणठणीत होईल असे सर्वांना वाटले.तसा आदेश निघाला.लोकांनी आपल्या घरांना लालच रंग द्यावा असे फर्मान निघाले.
काही लोकांनी स्वत:च्या पैशात घरांना लाल रंग दिला पण काही लोक तक्रार करायला लागले. त्यांनी पिवळ्या,निळ्या आणि हिरव्या रंगांनी घरे रंगवली होती. ते म्हणायला लागले. ‘आम्ही काय म्हणून पहिले नुकतेच दिलेले रंग खरवडून काढून लाल रंग द्यावा ? राजाला हवे असेल तर त्यांनी आम्हाला लाल रंग देण्याचे पैसे द्यावेत,’ अशी मागणी त्यांनी केली.त्यांची तक्रार खरीच होती.
राजाने हेही मान्य केले.राजा घराला रंग द्यायला पैसे देतोय असे बघून सगळ्यांनीच पैशाची मागणी करायला सुरूवात केली. राजाने आपली तब्येत सुधारतीय म्हणून सर्वांनाच पैसे वाटले. सर्वांची घरे लाल झाली.राजा खडखडीत बरा झाला.त्याची प्रकृती सुधारली पण राजाच्या तिजोरीचे तब्येत फार खालावली.
आपली प्रकृती सुधारावी म्हणून आपण केलेल्या या मूर्खपणाचा पश्चात्ताप करीत राजा एके दिवशी बसला असताना त्याला राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर कसला तरी कोलाहल ऐकायला आला.एक लहान मुलगा द्वारपालाशी हुज्जत घालत होता. राजा राजवाड्यात असताना असा गोंधळ म्हणजे राजाचा फारच मोठा अपमान पण द्वारपालाचा फारच नाईलाज होता.
तो आठ दहा वर्षाचा मुलगा वाद घालत होता.आपल्याला
राजाला भेटायचेच आहे असे म्हणायला लागला.त्यावर द्वारपालाने त्याला विचारले.तुझे राजाकडे काय काम आहे ? त्यावर तर कहरच झाला.तो मुलगा म्हणायला लागला,"मला राजाला भेटायचे आहे,काय मूर्खपणा चाललाय हे विचारायचे आहे."
तो द्वारपाल हादरला.तो म्हणाला, तू राजाला असे काही बोलणार असशील तर राजा तिथेच तुझे मुंडके उडवील.पण मुलगा पुन्हा पुन्हा तेच म्हणत राहिला.काय करावे हे द्वारपालाला सुचेना. एवढ्यात राजाचेच कुतुहल जागे झाले आणि त्यांनी दारवानाला आत बोलावून घेतले आणि चौकशी केली. काय प्रकार आहे? कसली गडबड चालली आहे?
दारवानाला सांगणे भागच पडले. त्यावर राजाने त्या मुलाला आत सोडायला सांगितले.तो आत आला.आणि राजाने त्याला काही विचारायच्या आधीच म्हणाला, काय वेडेपणा चालवला आहे ? त्यावर राजाने विचारले,कसला वेडेपणा म्हणतोस ? त्यावर ते बालक म्हणाले.
राजे साहेब तुम्हाला वैद्य काय म्हणाला होता ?तुमच्या डोळ्यांना लाल रंग दिसला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सगळ्या जगाला रंगवून पैसा घालवून बसलात. त्याऐेवजी हा लाल चष्मा घातला असतात तर दोन आण्यात सगळेच जग लाल दिसले असते. असे म्हणून त्या मुलाने जत्रेत खरेदी केलेला लाल गॉगल राज्याच्या डोळ्यावर चढवला.आणि विचारले,आता दिसतेय की नाही सगळे लाल ? मग?मला हेच सांगायचे होते.
राजाचे डोळे केवळ लालच झाले नाहीत तर उघडले सुद्धा.
-: तात्पर्य :-
जग कसेही असो पण ते चांगले असावे असे आपल्याला वाटत असेल तर जगाला बदलायला जाऊ नये.आपला जगाकडे बघण्याचा चष्मा बदलावा.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.