नाते तुझे नि माझे
पाच वर्षांपूर्वी अनेक मुली पाहून शेवटी जय ने चेतनाला आपली बायको म्हणून निवडले होते. चेतना दिसायला खूप सुंदर,मनमोहक,गोरीपान अशी होती. जय आणि चेतना ही जोडी अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा वाटावा अशी होती. आपली निवड अगदी योग्य आहे.असे दोघांनाही वाटत होते.लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस तर जणू दोघे स्वर्ग सुख अनुभवत होते. ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यांच्यात खूप प्रेम होते.कुठेही निघाले तरी दोघे कायम सोबत असत. लोकही त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत. असेच छान आनंदात दिवस जात होते.दोन वर्षे कशी सरली हे कळलेच नाही. आणि सगळेच वाटत पाहत असलेली गोड बातमी कानावर आली. जय आणि चेतना आई-बाबा होणार होते.घरात तर आनंदाला उधाण आले होते.जय चेतानाची अगदी तळ हातावरच्या फोडाप्रमाणे काळजी घेत होता.
असेच दिवस सरत होते.आपल्या होण्याच्या बाळाचे स्वप्न पाहत दोघेही खूप खुश होते.मुलगा असो वा मुलगी ते आपले लाडके पिल्लू असेल असे दोघांनाही वाटत होते. बाळासाठी आपण कुठेही कमी पडायचे नाही,चांगले संस्कार द्यायचे,उज्ज्वल भविष्यासाठी जमेल ती तरतूद करायची. दोघांनीही ठरवले.अखेर तो दिवस आला, प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस जेव्हा ते आई-बाबा बनतात. आपल्यापासून एक नवीन जीव जन्माला आलेला असतो.जय आणि चेतना ही खूप खुश होते.त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.छानशी गोंडस ओवी जन्माला आली होती. तिच्या चेहऱ्यावरील गोड हस्यांसाठी दोघे काहीही करायला तयार होते.ओवी मोठी होत होती. रात्रभर जागून दोघांनीही तिची काळजी घेतली होती. ओवीचे आई पेक्षा वडिलांवर जास्त प्रेम होते. तिला कायम पप्पा जवळ असावे असे वाटत. आणि जयची देखील ती लाडाची लेक होती. तिच्या भविष्यासाठी जय कामात पुरता गुंतून गेला. चेतानाची ओवीची काळजी घेत घेता सर्व विसरून गेली होती. दोघांमध्ये संभाषण खूप कमी व्हायला लागलं. हळू हळू दोघांना एकमेकांच्या काही गोष्टी खटकायला लागल्या. आणि त्यांच्यात छोट्यामोठ्या कुरगोडी सुरू झाल्या. दोघांच्याही नकळत ते एकमेकांपासून लांब चालले होते.
जयने ठरवले आता आपण फक्त कामात लक्ष द्यायचे. तो जास्तीत जास्त वेळ ऑफिस मध्ये घालवायला लागला. तिथेच त्याची ओळख नुकतीच जॉईन झालेल्या मोहिनी सोबत झाली. मोहिनी अगदी साधी, सावळी पण सुंदर होती. मोहिनी अगदी सुस्वभावी होती. कोणावरही मोहिनी घालेल अशीच ती होती. जय ला मोहिनी सोबत वेळ घालवणे आवडू लागले. ती त्याला खूप समजून घेते, त्यांच्या प्रत्येक निर्णयात ही सहमत असते. असे त्याला वाटू लागले. एव्हाना दोघांची मैत्री खूप घट्ट झाली होती. मोहिनीचा सहवास जयला आवडायला लागला होता. एकमेकांचे पर्सनल प्रॉब्लेम दोघे शेअर करायला लागले. मोहिनी कडून जयला समजले की तिलाही एक मुलगी आहे. नवरा सोबत राहत नाही. मुलीची जबाबदारी तिच्यावरच आहे. हे ऐकून जयला ही वाईट वाटले. आपण हिला कशाप्रकारे मदत करावी याचाच विचार त्याच्या मनात चालला होता. इकडे चेतना पुरती एकटी पडली होती. त्यांच्यात खूप दुरावा निर्माण झाला होता. ओवी ची काळजी मात्र जय घेत होता. पण सध्या त्याच्या मनात फक्त मोहिनीचा विचार चालला होता. त्यांच्या मनात विचार आला जर आपण मोहिनीला साथ दिली तर....
तो मोहिनीकडे गेला त्यावेळी त्याने मोहिनी बद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोहिनीकडून त्याला समजले की तिचा नवरा कोणा एका दुसऱ्या बाईसाठी मोहिनी आणि तिच्या मुलीला सोडून गेला होता. हे ऐकून आता मात्र जयच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने विचार केला जे तिच्या नवऱ्याने मोहिनीसोबत केले. तेच तर मी चेतना सोबत नाही ना करत??? त्यावेळी मोहिनीच्या नवऱ्याने जे केले त्यांचा राग त्याला येत होता. आणि आता तो ही हेच करत नाही ना अशी भीती जयला वाटली. हे मोहिनी प्रति जे वाटतंय ते नक्की काय आहे. प्रेम ,काळजी की आकर्षण. आणि त्याच्या लक्षात आले की हे चुकीचे आहे. त्याची पत्नी आणि मुलगी त्यांच्या विषयी त्याची प्रथम जबाबदारी आहे. आपण किती स्वार्थी वागलो असा विचार करून त्याचे मन सुन्न झाले.
जयच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. एक मन म्हणत होते, मोहिनी सोबत राहावे तर एक मन चेतनाकडे आणि ओवी कडे ओढ घेत होते. पण जेव्हा त्याला त्याची चूक समजली तेव्हा मात्र त्याने मनाशी पक्के ठरवले. मोहिणीविषयी जे काही वाटतंय ते तात्पुरतं आहे. आपला संसार आहे आपली प्रेमळ बायको,गोंडस मुलगी त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. शेवटी नाव समुद्रात कितीही फिरली तरी शेवटी तिला बंदरातच यावे लागते. हे जयला अगदीच पटल. जी चूक मोहिनीच्या नवऱ्याने केले ते आपण करायचे नाही. असा निर्धार करून जय मोहिनीला म्हणाला,"मोहिनी, तू माझी खूप जवळची, खूप चांगली मैत्रीण आहेस. तुला आयुष्यात कधीही, कुठलीही मदत लागली तर नक्की सांग. जेवढं शक्य होईल तितके मी नक्कीच तुझ्यासाठी करेन." हे ऐकून मोहिनीला ही आधार वाटला.
मनाशी गाठ बांधून जय घरी यायला निघाला. मनात सारखे हेच विचार येत होते. आपण किती स्वार्थी, निष्काळजीपणे वागलो. आपण असे कसे वागलो?? त्याला अपराधी वाटत होते. जय घरी पोहोचला. रोज कटकट करणारी, कंटाळवाणी वाटणारी बायको त्याला आज खूपच सुंदर,आकर्षक वाटत होती. ओवी ही लाडिकपणे पप्पा पप्पा करत आली. जय खूप दिवसांनी घरी आल्यासारखे वाटत होते. तो खूप खुश होता. जयचे हे बदलेले रूप पाहून चेतनाही थोडी खुलली. चेतनाही विचार करू लागली, "माझ्याकडून ही चुकलंच, मी जय ला कायम गृहीत धरले.जेव्हा त्याला वेळ द्यायला पाहिजे होता ,तेव्हा तो दिला नाही. त्याला समजून घ्यायला मी कमी पडले." आता मात्र मी अशी चूक करणार नाही असा चेतनाने मनाशी निश्चय केला. आज खूप दिवसांनी चेतना जय मध्ये प्रेमळ संवाद झाला. दोघांनी आपापल्या चुकांची कबुली दिली. त्यांच्या जुन्या प्रेमळ आठवणी दोघांना आठवल्या. आज चेतनाशी बोलताना जयला ती खूपच लाघवी वाटत होती. त्याला अगदी लग्नाच्या सुरवातीच्या दिवसातली ती आठवली. आणि तो पुन्हा तिच्या प्रेमात पडला. ओवीच्या चेहऱ्यावर हास्य होते. खूप दिवसापासून जे हरवले होते. ते आज गवसले हो..💓
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.