कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे! …….
गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे!
छोटे मोठे दिवे फुंकरिने मालवुन
कधीतरी सूर्यावर जळायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

खोट्या खोट्या शृंगाराची लाली रंगवुन
कशासाठी सजायचे चापून चोपुन?
वाऱ्यावर उडवत पदर जिण्याचा
गाणे गुलछबु कधी म्हणायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

भांड्यावर भांडे कधि भिडायला हवे
उगाचच सखिवर चिडायला हवे
मुखातुन तिच्यावर पाखडत आग
एकिकडे प्रेमगीत लिहायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

विळीपरी कधि एक चंद्रकोर घ्यावी
हिरविशी स्वप्ने धारेधारेने चिरावी!
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पूर्णबिंब तगायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

मनातल्या माकडाशी हात मिळवुन
आचरावे कधितरी विचारावाचुन!
झाडापास झोंबुनिया हाति येता फळ
सहजपणाने ते ही फेकायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

कधि राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे!
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

ढगळसा कोट, छडी, विजार तोकडी
भटक्‍याची चाल दैवासारखी फेंगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जाण
हसताना पापण्यांनी भिजायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

स्वतःला विकुन काय घेशिल विकत?
खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट!
हपापुन बाजारात मागशिल किती?
स्वतःतच नवे काही शोधायला हवे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा!
आणि तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच अजुन, आहे रियाजावाचून!
गिळलेले आधी सारे पचायला ह वे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

नको बघु पाठीमागे, येईल कळुन
कितीतरी करायचे गेलेले राहुन!
नको करु त्रागा असा उद्याच्या दारात
स्वतःलाही कधि माफ करायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!


- संदिप खरे

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top