माझ्या विनंतीचा करुन धिक्कार..
कुणा भाग्यवंताचा करशील तू स्वीकार..
त्याच्या सोबतच्या एखाद्या धुंद क्षणाने..
एकांतातल्या तुझ्या झुरण्याने...
माझी आठवण पुसून निघते का?
सखे.. कितीही पुसायचा प्रयत्न केला तरी...
बघ.. माझी आठवण येते का..?

त्याच्या मुखावरच्या स्मिताने.. तुझी पहाट खुलत राहील..
तुझ्या डोळ्याच्या आतुरतेत.. तो आपले प्रेमच पाहील..
राजा-राणीचा हा संसार.. असाच पुढे बहरत जाईल..
सुखाच्या वर्षावात चिंब भिजूनही..
तुझे मन कोरडे राहते का?
अशाच एका कातर वेळी..
बघ.. माझी आठवण येते का..?

वार्धक्याच्या पाऊलखुणांनी.. जेव्हा तू थकून जाशील..
पतीच्या थरथरत्या हाताला धरुन.. स्वतःला सावरु पाहशील..
त्याची साथ तरी तुला.. आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरते का?
आधारासाठी धडपडशील तेव्हा..
बघ.. माझी आठवण येते का..?

आजी झाल्यावर नातवांना.. राजा-राणीच्या गोष्टी सांगशील..
कधी राजपुत्र, परी आणि राक्षसाची.. सुध्दा सांगशील..
गोष्ट सांगता सांगता.. तुझे चित्त भूतकाळात हरवते का?
राक्षसाचे वर्णन रंगवताना तरी..
बघ.. माझी आठवण येते का..?

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top