पावसाळ्यातील पत्रे .....
तुझी आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही, रात्र तर विचारुच नकोस. पावसाळी ऋतू सुरू झालाय पण पाउस पडत नाही. मला जितकी तुझी तितक्याच तिव्रतेने पावसाची आठवण येतेय. मी आसुसलोय तुला पावसात चिंब भिजलेली पहायला, पावसाचे थेंब तुझ्या गालावरून ओघळताना टिपून घ्यायला. वाऱ्याने गारठणारं तुझं शरीर अलगद माझ्या मिठीत शिरून शांत होताना मला पहायचयं. थरथणारे तुझे ओठ माझ्या ओठानी व्यापून टाकायचेत मला! लाजेने आरक्त झालेले तुझे गाल आणि वाफाळणारे तुझे श्वास मला मझ्यात सामावून घ्यायचेत. मला सामावून घेणारे, आणि एका क्षणात सर्व जगाचा विसर पाडायला लावणारे तुझे डोळे पहायला मी आसुसलोय.
आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींनी मला अक्ष्ररशः वेड लावलंय त्यापैकी एक तू आणि दुसरा पाऊस! तुम्हा दोघांचीही उणिव मला मरेपर्यंत सतावत राहील. एकवेळ पावसाचं मी समजून घेउ शकतो पण तुझ्याशिवाय.......

पावसाचं हे वेड मला अगदी लहानपणापासूनच. पण तुझ्याबरोबरचा तो पाउस फार वेगळाच होता. मी अनेक पावसाळे भिजलेलो पण तो पाउस मी मनाने, तनाने आणि तुझ्या प्रेमवॄष्टीने न्हाउन गेलो होतो. पहिल्या प्रेमातला पहिलाच पाउस, मी कधीही विसरू शकत नाही ते क्षण! आणि आठवतं तुला? अशाच एका वर्षासंध्येला आपण रेडीओ क्लबच्या समुद्रावर उभे होतो. पाउस नुकताच पडून गेलेला तरीही त्याची रिमझिम सुरुच होती. तु माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उधाणलेल्या समुद्राला बघण्यात मग्न आणि मी तुझी शांत चर्या न्याहळण्यात मग्न. माझा हात तुझ्या कमरेला वेढा घालून तुझ्या हातात असलेला. प्रत्येक लाटेबरोबर तू तो अजुनच घट्ट धरलेला. गार वाऱ्याची झुळुक तुझ्या मानेवरच्या केसांना माझ्या चेहऱ्यावर आणून अलगद सोडते. मी तुझ्या स्पर्शाने बेधुंद झालेला. हळूहळू काळोख पडू लागतो पण पाय जागेवरून हालत नाहीत. अचानक! एक गार वाऱ्याचा झोत वेगाने अंगावर येतो, तो तुला सहन नाही होत तु लगेचच मला बिलगतेस आणि थरथरणारे तुझे ओठ माझ्या ओठंवर ठेवतेस २, ३.. ४ किंवा ५ सेकंद!!!!! पण तो क्षण कधी संपू नये असं वाटत राहतं! तुझी मिठी, तुझा स्पर्श, तुझा सुगंध माझ्या रोमरोमांत अगदी एखाद्या जालीम विषासारखा भिनत जातो आणि मी त्या विषाने मंत्रमुग्ध होउन तुझ्या मिठीत जगू लागतो.

प्रेमाचे हे सारे क्षण मला आजही वेड लावतात. तु नसतानाही तु असल्याचे भास होतात. तु गेल्यापासून प्रत्येक पाउस मी असाच तुझ्या आठवणींनी भिजतो. एकदा ना मला ह्या पावसांच्या सरींच्या प्रवाहात वाहून जायचयं कुठल्यातरी वळणांवर तु भेटशील या आशेवर!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top