दुपारची वेळ साधारणात दीड वाजले असावेत. ऊन नुसतं भणभणत होत. एखादं भयानक स्वप्न किंवा भयानक दृश्य पाहून घाम फुटावा तसा अंगातून घाम फुटत होता. अगदी अंगाच्या लाह्या झाल्या होत्या. तसाच अंगानं भिजलेल्या घामानं वर तळपत्या सूर्यानं माझ्या शर्टाचं ओलं बारदान झाल होतं. अन तशातच अंगाचा घाम पुसतच रस्त्याने लगबगीने चाललो होतो. शेवटी त्या उन्हाच्या झळा असह्य झाल्यामुळे कुठंतरी जरा बसावं या जाणीवेने आजूबाजूला पाहात मी पुढे चालत होतो. इतक्यांत एक दुकानाच्या कोपऱ्यात एक कठडा दिसला. तो ही खास बसण्याकरताच बनविला असावा तसा वाटत होता. म्हणूनच मग मी त्यावर जाऊन बसलो, हातातील फाईल बाजूला ठेवत मी त्या दुकानाच्या बंद शटरकडे पाहिले तर त्यावर रविवार बंद असं लिहिलं होतं. परंतु आज तर बुधवार, मग आज दुकान बंद असे? असा विचार करतच मी दुकानाच्या वरच्या बाजूला लटकाविलेल्या पाटीकडे पाहिलं तर तिच्यावर लिहिलं होतं हंसराज स्टोर्स, वेळ ७ ते १ व ३ ते ९ तेव्हा कुठे मला दुकान बंद का ? या प्रश्नाचे उत्तर सापडले. तसा माझा लहानपणापासूनच असा स्वभाव की कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर कोणत्याही मार्गाने ते शोधून काढायचेच, तेव्हाच कुठे चैन पडायचा अन्यथा जेवणाचेही भान राहात नसे.
आधीच साईटवर वैतागलो म्हणून जेवण करून फेरफटका मारण्याच्या उद्देशाने व ज्या भागात साईट होती त्या विभागाचा आढावा घेण्याच्या उद्देशान मी फिरत होतो. त्यामुळे बसल्या बसल्याच मनात इकडचे तिकडचे विचार घोळू लागले. मी बसलो होता त्याच्या बाजूलाच कुणीतरी खाली अंगावर ओढून झोपले होतं. भिकारी समजून मीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. परंतु त्याच्या कपड्यावरून तरी तो भिकारी नसल्याचे जाणवत होतं. पुन्हा मनात विचार आला. कदाचितत्या दुकानातील नोकर किंवा कामगार असावा. अशाच मनात विचार असलाचा व सर्व काही शांत वातावरण पाहता इथ पुढील काही क्षणात काही अघटीत घडेल यांची यत्किंचींतही कल्पना मला नव्हती. त्यामुळे मीही माझ्याचं तंदरीत होतो. त्यात जेवणात भात खाल्ल्यामुळे तर डोळ्यावर अगदी झापड येत होती. त्यातच बाजूलाच झाड असल्यामुळे थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. आणि मी विचार करता करताच डोळे शांतपणे मिटून त्या सतब्ध शांततेचा आनंद घेत होतो.
इतक्यात दोघे तेथे आले व माझ्या बाजूलाच उभे राहून एकमेकांशी बोलू लागले. अरे अजून वेळ आहे, चल तीनच्या शोला जाऊया, तसा दुसरा उद्गारला , कुठे? कोणत्या चित्रपटाला ? तिकीट भेटेल का? पहिल्याने मग उत्तर दिले, फेम ऍडलॅबला चल पाहू भेटेला जा कोणता तो! मग गाडी घेऊया का? तसा दुसरा म्हणाला, कशाला उगाच यार, असे त्या दोघांमध्ये संवाद चालू असतानाच एक धिप्पाड पुरुष त्या ठिकाणी आला. अंगात सफेत शर्ट, खाकी पँन्ट, लाल बुट व डोळ्यावर गॉगल.. आणि आल्या आल्याच त्याने त्या पहिल्या व्यक्तीला विचारले, काय रे ? कशाला गह्री आला होतो ? आलो होतो काम होतं माझं, का तुला काय करायचयं? असं उद्धटपणे म्हणत तो पहिली व्यक्ती गुर्मीत आला होता. तशी त्या धिप्पाड पुरुषाने त्याच्या एक जोरात कानशिलातच लावली. तसा पाच मिनिटापूर्वी त्याच्या सोबत चित्रपट पाहायला जाणारा दुसरा व्यक्ती चार पूट लांब सरला व उलट प्रश्न विचारायच्या आतच दुसरी एक थोबाडीत लगावून तो धिप्पाड पुरुष म्हणाला, काय लल्लू समजला काय? साल्या हिंमत कशी काय झाली माझ्या बहिणीकडे पाहण्याची ? तसा तो धाडकन येऊन माझ्या जवळच पडला तसा माझ्या काळजाचा ठोका वाढला व माझे काळीज धाड धाड करू लागले. मी माझी फाईल उचलण्याची घाई करीत खाली वाकलॊ तसा त्या दोघांच्या झटापटीत ती पहिली व्यक्ती पुन्हा येऊन खाली झोपलेल्या त्या माणसाच्याच अंगावर पडला, तसा तो किंचाळला. हे इतक्या क्षणार्धात घडले की, मी फाईल उचलताच बाजूला सरलो व लगबगीनं बाजूला जमलेल्या बघ्यामध्ये उभा राहिलो. झोपलेली ती व्यक्ती माझ्याच बाजूला येऊन उभी राहिली. परंतु चादर तिथेच राहिल्यामुळे तो कावरा बावरा झाला होता. मी आजूबाजूस नजर फिरवली असता, माझ्या लक्षाटा आले की, मार खाणाऱ्याचा मित्र ही तिथून गायब झाला होता. मला त्याचेच वाईट वाटले. कारण आम्ही नव्हे परंतु त्याच्या मित्रने तरी अशा वेळी त्याला साथ द्यायला हवी होती.
मनातल्या मनात मी जितक्या वेगाने विचार करीत होतो तितक्याच वेगाने त्यांची हाणामारी चालली होती. अगदी हिंदी सिनेमासारखी. मार खाणारी व्यक्तीसुद्धा आता उलट मारत होती. इतक्यात एक वृद्ध व्यक्ती व कॉलेजकुमारी तरुणी त्या ठिकाणी आले व त्या व्यक्तीला पाहताचक्षणी ती तरुणी ओरडली, हाच तो दादा…हाच! काय रे तूच आला होतास ना ? असे म्हणत म्हणतच ती सॅन्डलने त्याला मारू लागली. तसी ती वृद्ध व्यक्तीही त्यास जमेल तसे हात उगारून मारू लागली. मार खाणारी व्यक्ती आता अक्षरशः एक पडली होती. हे पाहून मग बघ्यांपैकी काही तरुण त्या तरुणीला मदत करण्याच्या हेतूने त्या पहिल्या व्यक्तीस मारू लागले. आता मात्र खाणारा एक व मारणारे अनेक होते.
गर्दी हळूहळू वाढू लागली व ट्रॅफिकही जाम झाली. मग ती तेथे थांबलेल्या बसमधील एक तरुणीकडे पाहू लागले. तिचा चेहरा खूपच लोभसवाणी दिसत होता. परंतु तीही हाणामारीच पाहात होती. तिला मी पाहतोय याकडे तिचं किंचितही लक्ष नव्हतं. त्यामुळे मीही तिला न्याहाळत होतो. इतक्यात ती एवढ्या जोरात किंचाळली की माझ्याबरोबर जमलेल्या अजून काही तरुणांनाही तिने आपल्याकडे वेधून घेतलं. तिने एक भयानक दृश्य पाहिलं होतं. त्यामुळे आमच्या सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. पाहतो तर काय? त्या ठिकाणी खून झाला होता. तोही डोळ्यादेखत. असलं काही पाहण्याचीसवय नसल्याने अंगाचा थरकाप उडाला. पाय लटपट कापू लागले, हातातील धरलेली फाईल हातातून केव्हा निसटली कळलचं नाही. अंगावर रक्ताचे शिंतोडे उडाले. मी पुरता घाबरलो. आता उगीच या फंदात फसणारच आता कुठे करिअरला सुरुवात होतेय तर आपलं कसं होणार? असे अनेक विचार व शंका येऊ लागल्या. त्यातच मी मागे सरलो आणि रस्त्याच्याकडेला लोकांसमवेत उभा राहिलो. मार खाणाऱ्या त्या एकट्या व्यत्कीने स्वतःला सावरत खिशातून सुरा काढून त्या तरुणीच्या पोटावर दोन वार केले होते आणि पाहता पाहताच या धिप्पाड पुरुषावर देखील दोन-चार सपासप वार केले. तसा तो देखील त्या तरुणीच्या बाजूलाच जाऊन पडला आणि त्याचा शर्टवर सरकल्यामुळे त्याने घातलेल्या पोलीसचा पट्ट सर्वांनी पाहिला. तो इन्स्पेक्टर होता आणि तिथे एका इन्स्पेक्टर हल्ला झाला होता.
आता मात्र मी पुरता घाबरलो आणि गर्दीतून बाहेर पडायच्या उद्देशाने मागे फिरलो तसा कठड्यावरुन खालीच पडलो. उठून पाहतो तर निःशब्द शांतता. खाली झोपलेली व्यक्ती आता घोरत होती. कदाचित मगाशी आलेले ते दोन मित्र तीनच्या शोला जाऊन बसले होते. आजूबाजूला कुणीही नव्हते. पावसात भिजल्यासारखा अंगातला शर्ट भिजला होता. काळीज धडधड करत होत. मग मी मनातच खजिल झालो अन स्वतःशीच उद्गारलो, बर झालं. हे स्वप्न होतं ते !!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top