जुना फोटो शाळेतला आपला,
बघून लाजरं हसत होतो,
मित्रमैत्रिणी सारखं चिडवतात म्हणून,
बोलायलासुद्धा घाबरत होतो.
कुंचल्यात सदा इंद्रधनु तुझे,
गुणगुणलेल्या गाण्यातून तुलाच फक्त गायचो,
दररोज छातीशी धरून नवी कविता,
शाळेबाहेरच्या बसस्टॉपवर तासन् तास रेंगाळायचो.
शाळेतलं ते फुलपंखी प्रेम(?),
थरथरणाऱ्या हातांनी तुझ्या मनगटावर बांधलं,
एकाच चॉकलेटच्या अर्ध्या-अर्ध्या गोडीसारखं,
"सी प्लस एम्" तळहातावर मेंदीसारखं रंगलं.
साडेतीन वर्षांच्या मोठ्या(?)(!) गॅपनंतर,
आज वागण्याबोलण्यातली मॅच्युरिटी क्षणोक्षण जाणवतेय,
भूतकाळातली ती अल्लड गुलाबी मजा,
आज लाजून लाजून नाही, तर खळखळून हसवतेय.
पहिल्यांदाच तुझ्याबरोबर कॉफी पिताना आज,
काय बोलू नि काय नको असं थोडसं होऊन गेलंय,
बोलते आहेस, हसते आहेस, टाळी देते आहेस तू सुद्धा,
नव्यानं बहरलेल्या मैत्रीनं आपल्या,संकोचाला कधीच पळवून नेलंय.
सोळा ते बावीसच्या या मेटामॉर्फॉसिसची कमाल,
निखळ मैत्रीची अवीट गोडी आज अनुभवतोय,
निरागस तुझं हसणं नि आपल्या गप्पा साठवत साठवत,
समोरची एस्प्रेसो उगाच(?) मिनिटामिनिटाला ढवळतोय.
अशीच तुझ्या हसण्याबोलण्याची पखरण,
गुंफूदे आठवणींच्या माळेत हरेक मोती नवा,
जगण्यासाठी प्रत्येक सेकंदाचा काटा,
अतूट आपल्या मैत्रीचा ताजा श्वास हवा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook