ब्रेकींग न्युज








पैशाशिवाय काहीच नसतं. पण पैसा आला म्हणजे सगळं मिळतंच, असही काही नसतं. माणूस जितका वर चढत जातो तितके त्याचे प्रश्न वाढत जातात आणि त्याला तडजोड करणं अवघड होत जातं. पैशाशिवाय त्याला होणारा मनस्ताप आणि त्रास, खुप पैसे आल्यानंतर खरं तर कमी व्हायला हवा.

पण असं होत नाही.
नाहीतर एसी मर्सिडिज बसुन घरी चाललेला भावेश इतका अस्वस्थ दिसलाच नसता. खच्चुन भरलेल्या बसमधुन, एकमेकांच्या पायावर उभं राहीलेली, ती घामेजलेली लोकं जितकी वैतागलेली असतात, तितकाच तो ही चिडचिडला होता.

एसी शरीर थंड करु शकते, मन नाही. रस्त्यावर मध्येच येणा-या लोकांना विनाकारण शिव्या देत तो घरी पोहचला तेंव्हा तो खुप थकला होता. मानसिक थकवा हा शाररीक थकव्यापेक्षा जास्त त्रासदायक असतो. त्यावर औषधही घेता येत नाही.
भावेश घरी पोहचला तेंव्हा रात्रीचे सुमारे ११.३० झाले होते आणि नेत्रा, त्याची बायको, जेवण वगैरे आटपुन मस्तपैकी टिव्ही बघत बसली होती. कुठल्याही सिरियलपेक्षा जास्तच मनोरंजन करेल असा कार्यक्रम तिनी लावला होता. ती बातम्या बघत होती. कुठल्यातरी न्युज Channel वर ब्रेकींग न्युज लागली होती. बिहार जवळच्या एका खेड्यात एका बाईला ती मागच्या जन्मीची नागीण आहे असं वाटतय, अशी ती न्युज होती. ती बाई तिच्या मागच्या जन्मातल्या सगळ्या खाणाखुणा सांगत होती आणि रिपोर्टर जगातल आठवं आश्चर्य मिळाल्यासारखं दिवसभर तिच्या मागेमागे हिडुंन ती माहिती गोळा करत होता. मग ओघाओघानी तिच्या नव-याचा इंटरव्ह्यु... सासुनी दिलेल्या शिव्या... गावक-यांच्या प्रतिक्रिया... ह्याच बरोबर कुठल्यातरी हिंदी पिक्चरमधले नाग-नागीणीचे सीन्स आणि मागे सतत पुंगी वाजत असल्याच म्युझीक... अशी खुप कष्ट घेऊन ही न्युज बनवली होती.

इतक्या उशीरा आल्यानंतर भावेश जेउनच यायचा त्यामुळे नेत्रा निवांत टिव्ही बघत बसली होती. पण आज भावेश इतकाच वैतागला होता की तिनी ते Channel बदलणंच पसंत केलं. तसही एकच न्युज इतक्या वेळेला लावली जाते की ती दुस-या दिवशी सुद्धा तिचं न्युज बघु शकत होती. भावेशसाठी तिनी Channel बदलंल पण त्याचा फारसा ऊपयोग झाला नाही कारण दुस-या ठिकाणीही एक ब्रेकींग न्युजच लागली होती. कुठेतरी पाच पायाचा कुत्रा सापडला होता आणि तो कुत्रा दैवी आहे अशी ती बातमी होती. नेत्रानी मग ३-४ Channels बदलुन पाहिली पण तिथं सास-बहु च्या सिरियल्स लागल्या होत्या आणि ते पहाणं ह्या पेक्षाही भयानक होतं. मध्येच कुठेतरी पुन्हा एक ब्रेकींग न्युज झळकुन गेली. ह्यावेळेसची न्युज परग्रहावरच्या मनुष्यवस्तीविषयी होती.

"मुर्ख असतात लोकं... काय वाट्टेल ते दाखवलं तरी बघत बसतात." भावेश म्हणाला.

भावेश कधीच सिरियल्स, सिनेमा ह्या असल्या फंदात नसायचा पण त्याला न्युजचा काहिच प्रोब्लेम नव्हता. खरं तर तो स्वत:च एक न्युज Channel चा मालक होता. भावेशच्या बोलण्यावर नेत्रा मात्र काहीच बोलली नाही. भावेश आता कसलाही संवाद साधायच्या पलिकडे आहे हे तिला माहित होतं. ह्या क्षणी त्याच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नव्हता. शांतपणे तिनी टिव्ही बंद केला आणि ती झोपायला निघाली.

"तु पण ह्या असल्या बातम्या बघतेस म्हणजे कमाल आहे" तो पुढे म्हणाला.

नेत्रा वळली आणि म्हणाली, "तुला हे कुणी सांगितलं की मी बातम्या बघत होते ? न्युज Channel मी बातम्यांसाठी नाही तर एंटरटेनमेंट्साठी लावलं होतं. कुठल्याही सिरियल किंवा पिक्चरपेक्षा जास्त मनोरंजन करतात ती. तसही बातम्या देणारी Channels आता राहिलीत कुठे ?"

" माइंड ईट ! " भावेश म्हणाला. "तु एका न्युज Channel च्या CMD शी बोलतीयेस."

नेत्रानी खाली ठेवलेला रिमोट उचलला आणि त्यावर भावेशचं Channel लावलं. त्यावर कुठल्यातरी चौकात एका ट्रफिक पोलीसनी ५० रु. ची लाच घेतल्याची न्युज होती.

ती म्हणाली, " तु ह्याला न्युज म्हणतोयेस का ? असलीच तरी ती सकाळपासुन ४० वेळा दाखवली आहे. तुला खरंच वाटतं भावेश की लोक बातम्यांसाठी बातम्या बघतात ? अशी माणसं तुला १०% पण मिळणार नाहीत. इथं पाच दिवस पाणी येणार नाहीये ह्या बातमीपेक्षा पाच पायाचा कुत्रा ही बातमी जास्त बघितली जाते, कारण दिवसभर थकल्यानंतर पुन्हा फक्त प्रोब्लेम्स बघण्यात कुणालाही इंटरेस्ट नसतो. लोक मुर्खं आहेत म्हणुनच आपलं Channel चालु आहे. तुला बातम्या दाखवायच्यात तर दाखव, पण तुझ्या ह्या बातम्यात मला तरी कुठे बातमी दिसत नाहीये आणि त्यात एंटरटेनमेंट सुद्धा नाहीये !
पण हे सगळं मी तुला का सांगतीये ? तुला हे जास्त माहितीये...... ! भावेश, काय झालय....?"

ह्यावर भावेश काहीच बोलला नाही. तो एक पक्का बिझनेसमेन होता आणि त्यालाही लोकांच्या प्रोब्लेम्सचं काही सोयरसुतंक नव्ह्तं. नेत्रा जे काही बोलली ते सगळं खरंच होतं. गेल्या काही दिवसात त्याच्या Channel चा TRP बराच खाली गेला होता. कारण त्यात कुठेही बातमी नव्हती आणि एंटरटेनमेंट सुद्धा !

तो काहीच बोलत नाहीये हे बघुन ती म्हणाली, "मला कळतय रे, सद्धया खुप लोड आहे तुला. कामाचा ताण खुप वाढलाय आणि त्यात ही भरमसाठ न्युज Channels . पण मला खात्री आहे तु नक्की बाहेर पडशील ह्यातुन. तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे माझा... If things are not happening then you will make it happen ! "

आपण उगीचंच चिडचिड करतोय हे भावेशला जाणवलं. "Thanks." तो म्हणाला.

नेत्रा झोपायला गेली पण भावेश जागाच होता. खुप थकुनही त्याला झोप येत नव्हती. नेत्राचं ’you will make it happen ’ हे वाक्य त्याच्या कानात घुमत राहीलं आणि पुढं काय करायचं हे त्यानी ठरवुनही टाकलं. सगळं काम संपवुन तो उठला तेंव्हा रात्रीचे २.३० वाजले होते. घड्याळाकडे पाहुनही त्यानी आपला मोबाईल उचलला आणि त्याच्या चारही News Reporter ना एक SMS केला.
"उद्या रविवार असुनही आपण भेटतोय. Office वर सकाळी १० वाजता. No excuses."

ह्यानंतर कुणी न येण्याचं धाडस करु शकणारंच नव्हतं. भावेशला अजुनही झोप येत नव्ह्ती, पण निदान तो शांत होता. त्याला खात्री होती जे काही त्यानी ठरवलय त्यानंतर त्याला ब-याच ब्रेकींग न्युज मिळणार होत्या....!




सकाळी ०९.३० लाच चारही जण... म्हणजे अनन्या, स्वप्नील, सुमंत आणि कबीर... सगळेच Conference Room मध्ये आपापल्या जागेवर ब-याच तणावात बसले होते. एक तर ते का जमलेत हे कोणालाही माहित नव्हतं आणि त्यात प्रत्येकाच्या समोर २ पाकीटं ठेवली होती, त्यात काय असेल ह्याचा अंदाज लावता येत नव्हता. अर्थात ते उघडुन बघायची हिंमत कोणातच नव्ह्ती. विशेषत: कालच्या SMS नंतर...!

भावेश बरोबर १० च्या ठोक्याला Office मध्ये आला. वातावरण तंग होतच. उगाचंच वातावरण निर्मिती न करत बसता, भावेश सरळ मुद्दयावर आला.
" अनन्या, ते पहिलं पाकीट उघड आणि बघ काय आहे त्यात. "

अनन्यानी ते पाकीट उघडलं आणि सुन्नच झाली कारण त्यात तिचंच रेझिग्नेशन लेटर होतं. त्यावर फक्त कुठलिही तारीख टाकली नव्ह्ती. हे ऐकताच, कबीर सोडून, सगळ्यांनी लगेच आपापली पाकीटं उघडली आणि स्वत:चंच रेझिग्नेशन लेटर पाहुन सगळेच थंड झाले. कबीर शांतपणे मोबाईलशी चाळा करत बसला होता. तो Channel चा स्टार रिपोर्टर होता आणि त्याला खात्री होती की ह्या मागे नक्कीच काहीतरी वेगळा हेतु असणार.

कबीरचा हा थंडपणा भावेशला अगदिच आवडला नव्हता. त्याच्या हातातुन मोबाईल काढुन घेऊन कच-यात टाकावा असं भावेशला वाटलं, पण आपल्याला काहीच वाटलं नाहीये असं दाखवत तो म्हणाला, "आता ते दुसरं पाकीट उघडा." सगळ्यांनी पाकीट उघडलं. त्यात पैसे होते.

"२०,००० आहेत. तुम्हाला मी कामावरुन कमी करत नाहीये. खरं तर ह्या वेळेला सगळ्यात जास्त गरज आहे Channel ला तुमची. पण गेले काही दिवस आपलं Channel तोट्यात चाललय आणि ह्याच कारण आहे तुम्ही आणत असलेल्या टाकाऊ बातम्या. आपला TRP खुप खाली गेलाय आणि कोणीही आपलं Channel लावत नाहीये. बातम्या शोधुन आणणं तुमचं काम आहे. शोधा... नसेल मिळत तर घडवा. मला माझं Channel पुन्हा एक नंबर वर पहायचय. हे पैसे वापरा, त्याचं काहीही करा पण मला ब्रेकींग न्युज आणुन द्या. मी पुन्हा सांगतो... काहीही करा.
तुमच्या ब्रेकींग न्युज नी Channel ला फायदा झाला तर इन्क्रिमेंट, प्रमोशन आणि बोनस सगळंच त्या प्रमाणात मिळेल. पण जमत नसेल तर हा तुमचा शेवटचा पगार समजा. माझ्या टेबल वर उद्यापासुन रोज तुमच्या पैकी कोणाचा ना कोणाचा ब्रेकींग न्युज चा व्हिडीओ असेल किंवा तुमचं रेझिग्नेशन. तुम्ही निघु शकता...! "


सगळे आपापली पाकीटं घेउन बाहेर पडले आणि भावेश एकटाच उरला. त्याला माहित होतं की स्वत:ची कातडी वाचवायला आणि पोट भरायला माणुस कोणत्याही थराला जाऊ शकतो. आता त्याला ब्रेकींग न्युज ची चिंता नव्ह्ती. त्याला खात्री होती की रोज सकाळी त्याच्या टेबलवर एक तरी ब्रेकींग न्युज असणार आहे.


भावेशचा अंदाज फारसा चुक नव्हता. कारण अनन्या सारखी एक सिन्सीयर मुलगी सुदधा न्युज कशी बनवता येईल ह्याचाच विचार करत होती. तिला माहीत होतं की ब्रेकींग न्युज अशी एका आठवड्यात मिळ्णं अवघड आहे, पण तयार करणं नाही.

पत्रकारीतेची मुल्य बाजुला ठेऊन ती विचार करायला लागली. राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे सगळेच प्रकार इतके गुळगुळीत झाले होते की त्यावर ब्रेकींग न्युज बनणं अवघडंच होतं. हिंदी नटनट्या आणि त्यांच्या विषयी बातम्या देणारी इतकी Channels होती की त्यातही काही दम नव्हता. काहीही न घडता खुप काही घडलय असं दाखवणारी काहीतरी बातमी तिला हवी होती.

आणि अशी एक गोष्ट होती..... अफवा... ! मग तिनी थोडी लांबची एक शाळा निवडली आणि तिथं Bomb ठेवला असल्याचा फोन केला. तिच्या अंदाजानुसार थोडी गडबड उडणार होती, ज्याला मसाला लावुन न्युज करता आली असती.

सुरवात तिला वाटली तशीच झाली पण नंतर जे घडलं ते तिच्या डोक्यातही आलं नव्हतं आणि तिच्या हातातही राहीलं नाही. फोन आल्या आल्या मुख्याध्यापकांनी पोलीसांना बोलावलं आणि Bomb शोधणारं Sqad ही !

खरं तर ते Bomb न मिळाल्यामुळे परत गेले असतेही पण त्याच वेळेला कुठेतरी फटाक्यासारखा मोठा आवाज झाला आणि सगळं चित्रच बदललं. जीवाच्या भितीनं शिक्षकांनीच पळायला सुरवात केली तिथं छोट्यांची काय चुक ? काहीही न कळल्यामुळे मुलं वेड्यासार्खी धावायला लागली. चेंगराचेंगरीत कित्येक मुलं जखमी झाली. ती छोटी मुल पळुन तरी कुठे पळणार होती ? बिचारी रस्त्यावर येऊन थांबली आणि रडायलाच लागली. दरम्यान बाहेरही खुप गोंधळ झाला, कारण रस्त्यावर कोणालाच काही माहित नव्हतं. मग अफवांवर अफवा पसरल्या आणि परिस्थीती सगळ्यांच्याच हाताबाहेर गेली.

मग पालकांचे लोंढेच्या लोंढे शाळेकडे लोटले. आपापलं मुल त्या गराड्यात शोधणं केवळ अशक्यच होतं. मुलांचे अतोनात हाल झाले. ती शाळा ह्या प्रकारात खुप बदनाम झाली. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांवर कारवाई तर अटळंच होती.

हा सगळा प्रकार अनन्याला इच्छा नसताना बघावा आणि Camera त Shoot करावा लागला. स्वत:च्या मुर्खपणामुळे तीला खुप अपराधी वाटंत होतं. ह्या सगळ्याला तीच तर जवाबदार होती. तिचं हे Live Shooting फक्त भावेशच्या Channel वर दिसत होतं कारण इतर कोणी अजुन पोहचलंच नव्हतं. तिची नोकरी वाचली होती पण त्यासाठी खुप लोकांना किंमत मोजावी लागली होती.

पण भावेश खुष होता. त्याला हवं ते मिळालं होतं. आणि अशा अजुन किमान तीन तरी न्युज बाकी होत्या.

आज सगळे जण आपापल्या जागेवर बसुन होते. कालच्या प्रकारानंतर अनन्यातर सुन्नच झाली होती. काहीच न्युज हाताशी नसल्यामुळे सुमंत ब-याच तणावात होता. पण न्युज न मिळुनही कबीर मात्र शांत होता. स्वत:च्या मोबाईलमध्ये तो पुन्हा एकदा हरवुन गेला होता. म्हणायला आरामात होता फक्त स्वप्नील कारण भावेशच्या टेबलवर आज जी ब्रेकींग न्युज होती, ती स्वप्नीलची होती.

भावेशनी व्हिडीओ लावला आणि पहिले कही क्षण कोणालाच काही कळालं नाही. बहुदा कुठेतरी लपवुन ठेवलेला Camera असावा... थोडयाच वेळात लक्षात आलं की ते एक चर्च आहे. ही, पैसा काय काय करु शकतो ह्याची कमाल होती. स्वप्नीलनी चक्क चर्चमधल्या कन्फेशन्स Box मध्येच Camera लपवला होता. खरं तर तिथं येऊन कन्फेशन्स देणा-या लोकांचा हा विश्वासघात होता कारण प्रत्यक्ष चर्चमधले पाद्रीसुद्धा कन्फेशन्स देणा-याचा चेहरा बघु शकत नाहीत. इथ तर अब्रुच टांगणीला लावण्याचा प्रकार होता.

स्वप्नीलच्या ह्या कल्पनेवर भावेश जाम खुष झाला होता. पहिल्यांदा काही साधी, सरळ कन्फेशन्स होती. धंद्यातली फसवाफसवी, सांसारीक कुरबुरी आणि कुरघोड्या, नव-याशी प्रतारणा, बायकोचा छळ, चोरी वगैरेच्याच सगळ्या कबुली.

"तु ह्याला ब्रेकींग न्युज म्हणतोयेस ?" भावेश म्हणाला.
" Wait Boss... & watch this one...........! " हे स्वप्नील इतक्याच स्टाईलमध्ये म्हणाला की सगळेच सावरुन बसले.

आता साधारण चाळीशीचा एक माणूस आत आला. कन्फेशन्स Box जवळ येऊन तो काहीच क्षण उभा राहिला आणि चक्क रडायलाच लागला. म्हणाला, "Forgive me, Father. देवाकडे माझ्यासाठी क्षमा मागा. मी गुन्हेगार आहे. मी पाप केलय. " थोडं सावरल्यावर तो पुढे बोलायला लागला,
" मी एक Doctor आहे. शहरातल्या सगळ्यात मोठ्या आणि खुप नावाजलेल्या Hospital मध्ये मी काम करतो. इतके दिवस मी त्यांना सामील होतो, पण आता नाही सहन होत आहे मला. मी अपराधी आहेच आणि ह्याची शिक्षापण भोगेनच. त्याआधि मला माझे सगळे गुन्हे कबुल करायचेत.
सुरवातीला Hospital मध्ये होणारे Frauds हे फक्त रुग्णांकडुन जास्त पैसे उकळण्यापर्यंतच मर्यादीत होते. पण हळुहळु आमची हाव वाढायला लागली. मग Hospital मधलं आधिच वापरलं गेलेलं आणि खरं तर destroy च करायला हवं असं सामान आम्ही पुन्हा पुन्हा वापरायला लागलो. अनेक लोकांच्या जखमा स्वच्छ करुन खराब झालेले आणि नंतर नष्ट करायचे कापुस आम्ही बाहेर विकायला लागलो. हाच कापुस धुवुन, पुन्हा ब्लिच करुन Hospital ला विकला जायचा. खुप पैसे मिळायचे ह्यात. सलाईनच्या बाटल्या, सिरिंज, औषधं सगळं expiry date उलटुन गेलेलं राजरोसपणे वापरुन आम्ही लाखो करोडो कमावले. हे सगळं करताना ब-याचदा लोकांच्या जीवाशी खेळ होतोय हे पण आम्हाला कळत होतं.

आता तर गेले काही महिने ते खुप भयानक प्रकार करताहेत. आधि पैशासाठी आम्ही जे करायचो त्यात कोणाचा तरी जीव जायचा पण आता पैसे कमावण्यासाठी ते लोकांना मारताहेत. कसलीही साधी तक्रार घेऊन कोणी आलं की पहिल्यांदा त्यांना घाबरवुन खुप Tests करायला सांगीतलं जातं. त्यात बरेच पैसे कमावल्यानंतर आलेल्या Report मध्ये हवे तसे changes केले जातात आणि अजुन घाबरवलं जातं. इतक्या मोठ्या Hospital मधुनच Report आल्यानी कोणी विश्वास न ठेवायचा प्रश्नच येत नाही. मग Treatment साठी म्हणुन admit करुन घेतलं जातं आणि औषधांच्या नावाखाली तो पर्यंत slow poison दिलं जातं जो पर्यंत Critical Condition होत नाही.
एकदा Critical Condition झाली की नातेवाईकांच्या सह्या घेऊन Operation केलं जातं, ज्यात रोगी वाचत नाही किंवा कोमात जातो. तोपर्यंत त्याच्या शरीरातले कित्येक भाग काढुन आधिच विकलेले असतात. ह्यात इतके पैसे आहेत की Postmortem चे Reports manage करणं फारसं अवघड काम नाहीये. रोज असे लोक मरताहेत पण हजारो लोकात काही लोक मेले तर काही फरक पडत नाही. थोडी आरडाओरड झाली तरी पैशानी दाबता येतात प्रकरणं !

मी ह्यातुन बाहेर पडायचं ठरवलय. मी त्यांना नाही थांबवु शकत पण ते ही मला थांबवु शकत नाहीत. मला जगायचा आधिकार नाही. मी...." इतकं बोलुन Doctor निघुन गेले होते. ती व्हिडीओ क्लीप संपली तरी कोणी काही बोलुच शकलं नाही. मग ब-याच वेळानी भावेश म्हणाला,
" Hey.... Good Job, स्वप्नील... Wonderful... & rest you leave it to me !"

पुढे काय करायचें त्याला माहित होतं. त्यानी काही फोन केले आणि संध्याकाळ पर्यंत सगळ शहर पेटलं होतं. Hospital मध्ये खुपच गोंधळ झाला. त्या Doctor नी तर आत्महत्याच केली. काही लोक ह्यात अडकले तर काही पैशाच्या जोरावर पुन्हा सुटले. पण भावेशला त्याचं किंवा लोकांच्या आयुष्याचं काही घेणं देणं नव्ह्तंच. त्याला हवी तशी एक मोठ्ठी ब्रेकींग न्युज मिळाली होती. ....आणि ही न्युज फक्त भावेशच्या Channel वर होती. एका दिवसात त्याचं Channel पुन्हा Top ला आलं होतं.

आणि सुमंत पुढच्या ब्रेकींग न्युजवर काम करत होता.

सुमंतनी सकाळ सकाळीच सगळ्यांना फोन केले आणि आज १०.०० ऎवजी भावेशसकट सगळे ६.३० वाजताच Office वर जमले. कदाचीत सुमंतकडे जो व्हिडीओ होता, तो १० वाजल्यानंतर पहायला खुप उशिर झाला असता.

व्हिडीओ कदाचीत अंधारात घेतला गेला असावा. एक कोणीतरी माणुस, जो नीट ओळखताही येत नव्हता, हातात काहीतरी घेउन चालत होता. अचानक त्या माणसानी हातातली ती वस्तु टाकली आणि तो पळूनही गेला. ती वस्तु म्हणजे हार होता... तो सुद्धा चपलांचा आणि त्या माणसानी तो टाकला होता एका पुतळ्यावर. लोकांच्या भावना दुखवायला पुतळ्याची विटंबना करणं ही गोष्ट पुरेशी होती.

व्हिडीओ इथंच संपला होता. ह्या धक्क्यातुन कोणीच बाहेर पडलं नव्हतं. भावेश पण नाही. तो म्हणाला,
"सुमंत... Are you NUTS ? ह्यात किती मोठी रीस्क होती कळतय तुला ? कोणीही... जर कोणीही तुला पकडलं असतं तर मारुन टाकलं असतं. पण Still... Great.. Great Job...! I appreaciate !!
आता सगळेच Channels ही न्युज दाखवायला सुरवात करतील. पण हा व्हिडीओ फक्त आपल्याकडेच आहे. अजुन थोडा वेळ जाऊ दे मग आपण हा व्हिडीओ बाहेर काढु."

ह्या प्रकरणावरुन, भावेश सोडुन जर कोणी हसत होता तर तो कबीर होता. तो भावेशला म्हणाला, " पण सर, हा व्हिडीओ आपल्याला कसा मिळाला, हा issue झाला तर ? "

आपल्यापर्यंत तो कसाही येऊ शकतो. कोणीही समाजकंटक किवा आपला हितशत्रु हे काम करु शकतो. आणि तसही हे आता इतकं पेटंत जाईल की कोणीही नाही येत विचारायला. ....वा सुमंत ! तु तर पुढच्या आठवड्याचीच ब्रेकींग न्युज दिलीस. हे कसं पेटवायचं ते मी बघतो... ".

आणि खरंच ही बातमी थोडी भडक करुन दाखवण्यात आली. व्हिडीओमधला तो माणुस कोण ह्यावर इतकं राजकारण झालं की वातावरण पेटंतंच गेलं आणि ह्याचा फायदा फक्त भावेशलाच झाला. अनेक Channels नी ही बातमी जरी दाखवली असली तरी तो मुळ व्हिडीओ फक्त भावेश कडे होता.


एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे प्रकरण जास्तच चिघळलं. भावना दुखावला गेलेला तो विशिष्ट वर्ग रस्त्यावर आला आणि पण संयमीत पद्धतीनं निषेध करत होता. पण न जाणो कुठुन एक दगड आला आणि मग त्या मुक-मोर्चाचं दंगलीत रुपांतर झालं. मग लुटालुट, जाळपोळ आणि हाहाकारच माजला. त्यानंतर पोलीसांचा हस्तक्षेप आणि त्यांना अनिच्छेनं करायला लागलेला गोळीबार.. सगळंच दुर्दैवी होतं.

ह्या सगळ्याचा आनंद होणारा एकमेव प्राणी होता... भावेश ! इतकं होऊनही त्याची भूक भागली नव्हती. तो कबीरच्या न्युजची वाट बघत होता. पण ह्यासाठी त्याला उद्या सकाळपर्यंत वाट बघावी लागणार होती.

पण कबीर तर केंव्हाचा तयार होता... अगदी आत्तासुद्धा !

ब्रेकींग न्युज ची आज कबीरची पाळी होती आणि ती पहायला भावेश स्वत:च खुप excite झाला होता. त्याला खात्री होती की ती सगळ्यात जबरदस्त असणार आहे. कबीरचं थंड डोकं, त्याचा आत्मविश्वास, त्याची धडाडी सगळच इतकं जबरदस्त होतं की इतर सगळ्यांहुन त्याची न्युज वेगळीच असणारच होती.

आश्चर्य म्हणजे भावेश office मध्ये आला तरी कबीरचा पत्ताच नव्हता. पण कबीर स्वत: आला नसला तरी त्यानी तो ब्रेकींग न्युजचा व्हिडीओ पोहचवायची व्यवस्था केली होती. नुसता व्हिडीओच नाही तर त्यासोबत एक पाकीट पण होतं. भावेशनी पहिल्यांदा पाकीट उघडलं. त्यात कबीरचं एक पत्र होत.

"सर, माझं Resignation Letter सही करुन परत केलय. I hope, मी ते २०,००० रुपये परत करण्याचा संबंध नाहीये. पण तरिही खाल्ल्या मिठाला मी जागणार आहे. एक शेवटची ब्रेकींग न्युज तुमच्या Channel साठी ठेऊन जातोय. जरुर दाखवा. अर्थात तुम्ही ती नाही दाखवली तरी बाकीची Chaneels नक्की दाखवतीलच म्हणा.
Thanks for everything..... आणखिन एक... Cassette ची एक copy कदाचीत एव्हाना पोलीसांकडेही पोहचली असेल. तुम्ही हे सगळं पाहेपर्यंत ते पोहचतीलच तुमच्यापर्यंत..."

भावेशला Resignation, शेवटची ब्रेकींग न्युज... पोलीस.... ह्या धक्क्यातुन सावरायला थोडा वेळच लागला. मग त्यानी ती Video Cassette Play केली आणि तो जागेवरच कोसळला.

त्याच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. कारण समोर टिव्हीवर तो स्वत:लाच बघत होता. तो म्हणत होता...

" अनन्या, ते पहिलं Envelop उघड आणि बघ काय आहे त्यात. ........
.........बातम्या शोधुन आणणं तुमचं काम आहे. शोधा... नसेल मिळत तर घडवा. If things are not happening then Make it happen ! मला माझं Channel पुन्हा एक नंबर वर पहायचय. हे पैसे वापरा, त्याचं काहीही करा पण मला ब्रेकींग न्युज आणुन द्या. I repeat काहीही करा.
.... " Hey.... Good Job, स्वप्नील... Wonderful... & rest you leave it to me !"
......" व्वा... सुमंत... तु तर पुढच्या २ आठवड्यांची ब्रेकींग न्युज दिलीस. हे कसं पेटवायचं मी बघतो... Great.. Great Job... "


थोडक्यात... रविवारच्या Meeeting पासुन अगदी कालपर्यंतच्या सगळ्या Meetings कबीरनी मोबाईलवर Record केल्या होत्या. कबीरचा मोबाईल चाळा भावेशला खुप महागात गेला होता. कबीरनी हे सगळं Record तर केलं होतंच पण ते चक्क दुस-या Channels ला विकलं पण होतं. भावेश सावरायच्या आधि Office वर पोलीस पोहचले होते. म्हणजे त्यांना ती Video Cassette मिळाली होती. भावेश, त्याची टीम आणि त्याचं Channel सगळं संपलं होतं.

आज त्याचं Channel सोडुन सगळ्यांच्या Channel वर दोन शब्द मोठ्ठया अक्षरात झळकत होते....

ब्रेकींग न्युज !


लेखक  - धुंद रवी ( सौजन्य आणि आभार )

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top