बहुचर्चित फ्लिपकार्ट डॉट कॉम या शॉपिंग वेबसाइट ने आपली मोबाइल एप सुद्धा सुरु केली आहे. 

विशेष म्हणजे तुम्हाला मोबाईल एप वर खरेदी केल्यास 10 ते 20 टक्के सूट सुद्धा मिळणार आहे जी सूट तुम्हाला कॉम्पुटर वरुन वेबसाइट वर खरेदी केल्यावर मिळत नाही. 

ही एप्लीकेशन एंड्राइड, विंडोज किंवा आय ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाइल वर पुढील लिंक वरुन इनस्टॉल करु शकता -> http://fkrt.it/S!keWbNN

लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ... तुला माझ्याबद्दल काय वाटतं ? तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... ! प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ... पण मग लग्न झालं ... संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ... आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ... त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती .. हातात लाटणं ... समोर तापलेला तवा ... त्यानं संभाव्य धोका ओळखला .. आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे .. संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...' असं म्हणून तो कामावर सटकला ... ! तो घरातून बाहेर पडला खरा ... पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. ! अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ... कठीण असतं हो ... नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं .. तो विचार करत होता .. काय सांगावं .. ? मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ... नको .. फार फिल्मी वाटतं .. तू खूप छान आहेस ... असं म्हणावं ... नको ... तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे .. समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ... तर ती नक्की म्हणेल ... राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ... त्याला काहीच सुचेना ... बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ... लाईन लागेल नवऱ्यांची ... त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते .. सूर्य मावळला ... घरी जायची वेळ झाली .. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ... याची त्याला खात्री होती ... घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ... त्यानं बेल वाजवली .. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही .. त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ... मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ... तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ... बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ... त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ... तिनं तोंडभर हसून विचारलं .. काही सुचलं ... ? 
त्यानं नकारार्थी मान हलवली ... तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... मलाही नाही सुचलं ... ! तो पुन्हा गोंधळला ... इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ? आणि ती बोलतच होती ... काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ... तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? सात दिवस विचार केला .. पण मला काही सांगताच येईना ... मग भीति वाटली ... माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ? अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ... मला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ... वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत .. पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ... म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ... जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ... आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ... कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... असं म्हणून तिनं एक कांदा भजी. त्याला भरवली ... शपथ सांगतो ... त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता ..:)

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

'जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले.
का बरे? तो म्हणाला.
'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'.
कशासाठी?
'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'.
'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला', 
'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'.
'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',. 
'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'?
'तू ना, खूपच भावनिक होतेस',
'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली.
'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'.

३ दिवसानंतर

'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले.
'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',.

'मग जाऊन आली का नातवाकडे'?
'हो जाऊन आली, मस्त ५०० रुपये खर्च केले २ दिवसात'.

'म्हणजे काय केल नेमकं'?

'नातवासाठी बाजारातून १५० रुपयाचा ड्रेस घेतला अन ४० रुपयाची बाहुली, मुलीला छानपैकी ५० रुपयाचे पेढे घेतले, ५० रुपयाचा मंदिरात नैवद्य दिला, 60 रुपये रिक्षाभाडे, २५ रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, ५० रुपयाचा जावईबापूसाठी बेल्ट अन उरलेले ७५ रुपये नातवाच्या हातात दिले'. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला.

 


'५०० रुपयात इतके काही', तो आश्चर्याने म्हणाला अन विचार करू लागला.

त्याच्या डोळ्यासमोर ८ तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहू लागला. एक एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला.


पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवद्य, चौथा रिक्षाभाडे, पाचवा बाहुलीचा, सहावा मुलीच्या बांगड्याचा, सातवा तुकडा जावईबापूचा बेल्ट अन आठवा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे.

पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला, एका तुकड्या मागे दुसरा तुकडा, अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण.....

एका पिझ्झ्याची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झ्याचे ८ तुकडे त्याला काही शिकवून गेले होते, जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'
वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!.

कुठलंही काम, प्रॉजेक्‍ट, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्‍लाएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.


दोन तत्त्वं :

"एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका."
"दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात " :)

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवीएकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.....त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला......
"ये तुला प्रत्यक्ष दाखवतो...." देव म्हणाला...
त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं....त्याने पहिला दरवाजा ढकलला.....एका मोठ्या खोलीत प्रवेश केला....एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती....टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.....त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाचा तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.....पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.....त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.....त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.......कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता.....त्यांच्या यातनांना अंत नव्हता.....भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते....
 


"हा नरक आहे..."देव म्हणाला....
"चल आता स्वर्ग पाहू...."ते दुस-या दारातून आत आले....ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती....तेच टेबल तेच खिरीचं भांडं.....भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.....पण ही सगळी माणसे तृप्त...समाधानी व आनंदी दिसत होती......आपापसात हसत आनंदाने राहत होती.....
"मला कळत नाहीये....." संत म्हणाला,"सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का...??
"सोपं आहे..."देव म्हणाला
"या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत....हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो....."


गोष्ट संपली.........


जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील......स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे.....
यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते....खोली,खीर,टेबल आणि चमचा.......सगळ्यांना समान संधी मिळते....
सर्वांना मदत करा......मग बघा आपल्या जीवनातील अंतरंग कसे खुलतात ते...... :)


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी