धर्म माझा वेगळा…

विज्ञान, धर्म यांच्या भिंतींवरी धडकलो,
आस्तिक नास्तिकांच्या वादात मी अडकलो…

ते पंथ, जाती यांचे झगडे जुने पुराणे
माझ्याच हाय आले नशिबी लढे पहाणे,
वेद, स्मृती, कथांची कोळिष्टके मनात
का मी उगीच जपला हा धर्म बासनात?

विज्ञान थोर म्हणुनी जरी फुंकल्या पिपाण्या
बुरखेच घातलेले लोकांनी या शहाण्या,
हुंकारले कितीकदा ‘वसुंधरा हिताय’
पण नाश टाळण्याचे न सांगती उपाय…

विध्वंस, भोग, तृष्णा, आशा, कधी निराशा
दोन्हीकडे बघितला एकच जुना तमाशा,
तेव्हा कळून आले, मी एकटा प्रवासी
जगणेच भाग आहे जपण्यास या जीवासी…

निसर्ग देव माझा, अन मी पुत्र मानवाचा
आनंद हाच पंथ, आहे पार करावयाचा,
हे सत्य सांगणारा तो धर्म आज कळला
जीवनप्रमेय सुटले विज्ञानद्वेष गळला…

आता मी शांत आहे, बंदिस्त या जगात
घनगर्द सावलीत आनंदगीत गात,
माझ्या सभोवताली एकच ऋतू वसंत
जगतोय आत्ममग्न, यावे मरणही तृप्त शांत……

Post a Comment Blogger

 
Top