तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
रोज जरी भांडली तरी तुम्हाला आवडते ना हो?
ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जाता
चकाचक हॉटेलात डीलक्स रूम घेता
नाश्त्यापासून डिनर पर्यंत हाण-हाण हाणता
तरीसुद्धा पोट काही भरत नाही ना हो?
तिच्या स्वयंपाकाची चव येतच नाही ना हो?
काही दिवसांसाठी जेव्हा ती माहेरी जाते
जमेल तेव्हढी तुमची व्यवस्था लावून ठेवते
चार वेळा फोन करून हालहवाल विचारते
रिकाम्या घरात काही केल्या करमत नाही ना हो?
ऑफिस संपल्यावरती घरी जाववत नाही ना हो?
समारंभाला जाण्यासाठी ती भरपूर नटते
तुम्ही तयार होऊन बसता, ती तासभर लावते
पुन्हा पुन्हा विचारते, "मी कशी दिसते?"
कशीसुद्धा असली तरी, सुंदर दिसते ना हो?
तुम्ही "सुंदर" म्हटल्यावरती, गोड लाजते ना हो?
अनेक महिने-दिवसांनंतर तुम्ही मित्रांना भेटता
जुने दिवस आठवून आठवून गप्पांमध्ये रमता
थोड्याच वेळासाठी तुम्ही बायकोला विसरता
तितक्यात येतो फोन आणि तुम्ही पळता ना हो?
मित्र तुम्हाला बायकोचा गुलाम म्हणतात ना हो?
तुमचं पहिलं प्रेम तुम्ही बायकोत पाहता का हो?
तिच्या दोन डोळ्यांमध्ये आरसा दिसतो का हो?
तिचा हात हातात घेताच निवांत होता का हो?
"तिच्याशिवाय तुम्ही नाहीच" असं समजता का हो..??
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?
आभार - लेखक / कवी : रणजीत पराडकर
Post a Comment Blogger Facebook