रिस्क . Funny marathi kavita
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेंव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
आजोबा फोटोतून बघत असतात,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥१॥
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो,
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
आजोबा मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥२॥
मी: जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती: छे! दानत असेल तर मिळेल ना चांगल स्थळ!
मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो,
पटकन पेगचा आस्वाद घेतो,
बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लासपण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥३॥
मी: अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झाल नाही?
ती: नाही काय! आठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे….
मी: (आठवून जीभ चावतो) अच्छा! अच्छा!…
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग भरतो,
आजोबा मोठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून आजोबांचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको ग्यासवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥४॥
मी: (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापूनं टाकेन तूझी…!
ती: उगाच कटकट करू नका… बाहेर जाऊन गप पडा…
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघत हसत असते,
आजोबांचा स्वॆंपाक चालूच असतो,
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥५॥
मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्नं ठरवल म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वॆंपाकघरात जातो, हळूच फळीवर जाऊन बसतो,
ग्यासही फळीवरच होता…
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकांवून बघतो, बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
या घोडीचा त्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात आजोबा कधीच रिस्क घेत नाहीत,
जाधवांचा स्वॆंपाक होईपर्यंत…
मी फोटोतून बायकोकडे बघत हसत असतो…
कारण मी कधीच रिस्क घेत नाही. ॥६॥
I really laughed so much after long time by reading any poem and really loved it
उत्तर द्याहटवाSalute to the Poet