प्रेमात पडणं वगैरे सब झूठ असतं, असं मानणारी मी. आजूबाजूला गळ्यात गळे घालून फिरणारी प्रेमी युुगुलं पाहिली, की हा माझा मार्ग नव्हे, असं मानणारी मी. एकाच कंपनीत काम करताना सुरुवातीला तुझ्याशी तुटकपणे, जितक्यास तितकं वागणारी मी... तू कधी माझ्या हृदयाचा ताबा घेतलास, हे मात्र कळलंच नाही मला! ' मैत्रिणीकडे संत्र्याच्या झाडाचं बोन्साय पाहिलं. एवढ्याशा कुंडीतल्या झाडावर केवढी तरी संत्री लागलेली होती. मोठ्या उत्साहात मी तुला सांगितलं. त्यावर एकदम उसळून तू म्हणालास, 'बोन्साय? छे, मला नाही आवडत हे असले प्रकार. माणसाच्या फायद्यासाठी केलेलं क्रौर्य आहे हे. अगं, झाडांनाही मन असतं. मुक्तपणे त्यांना वाढू द्यायचं. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली, तर किती राग येतो आपल्याला! तसाच त्यांनाही येत असेल. पण ती झाडं बिचारी बोलू नाही शकत. जे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, अशांच्या भावना आपण जाणून घेऊ शकत नसू, तर माणूस म्हणायच्या योग्यतेचेच नाही आपण!' छोटीशीच घटना, पण झाडांच्याही भावना समजून घेणारं तुझं तरल संवेदनशील मन मला अगदी खोलवर आवडून गेलं. माझ्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुला सांगितल्याशिवाय मग मला चैनच पडेनासं झालं. एखाद्या दिवशी मूड नसेल, तर काहीतरी जोक्स सांगून तुझं हसवणं, रागावणं, रुसणं हे सारं मला आवडू लागलं. मला म्हणायचास, की डोळ्यांनी बोलायला शिक. प्रत्येक गोष्ट शब्दात सांगता येत नाही. तुला ती कला चांगलीच अवगत आहे. माझ्या डोळ्यांनी मात्र माझ्याही नकळत माझ्या मृदू भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या असाव्यात. तुझ्याबद्दलच्या भावनांचा माझ्याआधी तुला सुगावा लागला. पण त्या वेळेपासून तू स्वत:ला अलिप्तच ठेवायला लागलास. राधेने श्रीकृष्णाला 'निमोर्ही' असं म्हटलं होतं. दुसऱ्याला आपल्या मोहात पाडायचं आणि स्वत: मात्र कमलदलाप्रमाणे अलिप्त राहायचं. तसंच काहीसं मला तुझ्याबाबतीत वाटू लागलंय. मला माहीत आहे, जात-वय यासारख्या समाजाने घातलेल्या बंधनांमुळे आपण नाही एकत्र येऊ शकत. पण प्रेमात काय आणि युद्धात काय, सारं काही क्षम्य असतं, असं म्हणतात, ते खोटंच म्हणावं लागेल. कुठेतरी वाचलंय, की प्रेम हे प्रतिध्वनीसारखं असतं. जितक्या तीव्रतेने तुम्ही एखाद्यावर प्रेम कराल, तितक्याच तीव्रतेने ते तुमच्याकडे परत येईल. पण ज्याअथीर् ते माझ्याकडे परत येत नाहीय, त्याआथीर् मी असं समजेन, की माझ्याकडून तितकं प्रेमच केलं गेलं नसावं... पण... हेही खरं मानायला माझं मन तयार होत नाही. आता असं वाटतं, की उगीचच आपली भेट झाली. उगीचच इतकी ओळख झाली. या जन्मी जर शक्य नसेल, तर निदान पुढच्या जन्मी तरी असं राधा नाही... 'रुक्मिणी' व्हायचंय मला!-
तुझी,
माधुरी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook