आपलं जे असतं, ते आपलं असतं,
आपलं जे नसतं,ते आपलं नसतं !
हसतं डोळे पुसुन, आतुन फळासारखं पीकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !

आलेला मोहोर,कधी जळुन जातो,
फुलांचा बहर, कधी गळुन जातो !
पुन्हा प्रवास सुरु केला
जरी चालुन थकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !

कधी आपलं गावसुद्धा, आपलं नसतं,
कधी आपलं नावसुद्धा,आपलं नसतं !
अशा परक्या प्रदेशात
वाट नाही चुकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !

पिंज-यात कोंडुन, पाखरं आपली होत नाहीत,
हात बांधुन, हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा
हरुन सुध्दा जींकलो;
हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो !

झाड मुकं दिसलं तरी, गात असतं,
न दिसणा-या पावसात,मन न्हात असतं !
काळोखावर चांदण्याची
वेल होऊन झुकलो;
 हे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो ! 


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top