माझ्या आयुष्यात येणारी परी
खरच कशी हो असेल?
माझ्या इवल्याशा साम्राज्याची
खरच का सम्राज्ञी ती शोभेल?

नाकी डोळी रेखीव असेल की
मनानेही तेवढीच सुंदर असेल?
माझ्या इवल्याशा घरट्याला का
आपल मानणारी असेल?

शृंगार करणारी असेल की
कंबरपण कसणारी असेल?
संसाराच्या गाड्याला ती का
अखंड साथ देणारी असेल?

खूप बडबड करणारी असेल का
माझही कधी ऐकून घेणारी असेल?
मी लपविलेल्या अश्रूना का
पदरात पाडून घेणारी असेल?

असे खुळे प्रश्न सध्या
काळ्या आकृतींना विचारतोय
मित्रसुद्धा चेष्टेने विचारतात
"मधेच कोणाशी बोलतोय?"

काय सांगू त्याना मी
तुझीच वाट पाहतोय
जिला कधीच पहिले नाही
तिच्यावर जीवपाड प्रेम करतोय.

Post a Comment Blogger

 
Top