धनत्रयोदशी
आश्विन व. त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. या दिवशी वस्त्रालंकाराची खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसूफ करतात व पुनश्च योग्य ठिकाणी ठेवतात, कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात, यथाशक्ती दान करतात.
या दिवशी सायंकाळी तेलाने भरून एक दिवा प्रज्वलित करावा व नंतर त्याची गंधादी उपचारांनी पूजा करून घराच्या दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवतात. हा दिवा रात्रभर जळत राहणे आवश्यक आहे.
प्रदोषव्रत
अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।
रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।
ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'
अशी प्रार्थना करुन भोजन करावे.
सूर्यास्ताचे वेळी स्नान करून लाल जास्वंद, लाल गंध आणि धूपदीप आदी उपचारांनी पूजा करून प्रदोषकाळी एकवेळ जेवावे. जर या दिवशी 'शनिवार' असेल तर अधिक चांगले.
यमदीपदान
आश्विन व. त्रयोदशीला संध्याकाळी मातीच्या दिव्यांत (पणत्यांत) तेल, वात घालून प्रज्वलित करावेत. त्यांची गंधादी उपचारांनी पूजा करावी. मग दक्षिणेकडे तोंड करून -
'मृत्युना दंडपाशाभ्यां कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सुर्यज: प्रीयतां मम ।'
असा मंत्र म्हणून हे दिवादान दिल्यास यम प्रसन्न होतो. ही प्रदोषव्यापिनी त्रयोदशी शुभ असून ही मात्र दोन दिवस असेल अगर दोन्ही दिवस नसेल तर तिसर्या दिवशी करावी.
धन्वन्तरी जन्मोत्सव
आश्विन व. त्रयोदशी या दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वन्तरी याचा उत्सव वैद्यकाची प्रगती होण्याकरिता वैद्य लोक करतात. हा देवांचा वैद्य व विष्णूचा एक अवतार मानतात.
दुर्वासाने इंद्रास शाप देऊन वैभवहीन केले. तेव्हा ते पुनरपी मिळविण्याच्या हेतूने देव-दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले. त्यातून चौदा रत्ने निघाली. त्यांत सुधर्मात्मा व आयुर्वेदमय दंडकमंडलूसहित असा धन्वन्तरी हातात अमृतकलश घेऊन बाहेर पडला. हा विष्णुचा अवतार असून सर्व वेदांत निष्णात व मंत्रतंत्रातही विशारद होता. याला आदिदेव, अमरवर, अमृतयोनी, सुधापाणी, अब्ज इ, अन्य नावेही आहेत.
याच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झाले. ते जरामृत्युरहित बनले. त्यामुळे त्याला देवांचे वैद्यराजपद लाभले. भागवत पुराणात विष्णूच्या चोवीस अवतारांत धन्वन्तरीचा समावेश केला आहे. विष्णुच्या अवताराची प्रतिष्ठा लाभल्यामुळे वैष्णवमूर्ती-समुदायात धन्वन्तरीच्या मूर्तीला स्थान मिळाले. याच्या प्राप्तीसाठी ईशान्य दिशेकडे मुख करून सायं-प्रार्थना करावी. धन्वन्तरीने चिकित्सेचे ज्ञान भास्करापासून प्राप्त केले आणि भास्कराच्या आयुर्वेद्संहितेच्या आधारे 'चिकित्सा तत्त्वविज्ञान' नामक ग्रंथ रचला. तेव्हापासून आयुर्वेदाचा प्रसार सुरू झाला -
फल - आरोग्य व दीर्घायुष्य.
संकलन :- अशोककाका कुलकर्णी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.