आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा
केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी
गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या
हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. 



ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.
घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले,
अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.
निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला
खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.
पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात
नाहीत.या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या
दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. स्त्रिया
बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या
मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.



काही ठिकाणी या दिवशी  कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात
तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन
केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त
होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते.
यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. एका अर्थाने दुध-दुपत्यासाठी
होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी
लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

वसुबारस पूजा - अशोककाका कुलकर्णी

आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्सद्वादशी (वसुबारस) म्हणतात. ही प्रदोषव्यापिनी घ्यावी. दोन्ही दिवस जर ही प्रदोषव्यापिनी नसेल, तर दुसर्‍या दिवसाची घ्यावी, कारण संध्याकाळ हा हिचा गौणकाळ असून त्या काळी तिची व्याप्ति आहे. ही जर दोन दिवस प्रदोषव्यापिनी असेल तर पहिल्या दिवसाचीच घ्यावी असे अनेक ग्रंथकारांचे जसे सांगणे आहे, तसेच दुसर्‍या दिवसाची घ्यावी असेही काही ग्रंथकार सांगतात. या तिथीला गोर्‍ह्यासारखाच जिचा रंग आहे अशा सवत्स (गोर्‍ह्यासह) गाईची पूजा करून, तिच्या पायावर तांब्याच्या अर्घ्याने जे अर्घ्य द्यावे, त्याचा मंत्र-

'क्षीरोदार्णवसम्भूते सुरासुरनमस्कृते ।
सर्वदेवमये प्रातर्गृहाणार्घ्य नमोस्तुते ॥

त्यानंतर उडदादिकांचे वदे त्या गाईला चारून,

'सर्वदेवमये देवि सर्वदेवैरलंकृते ॥
मातर्ममाभिलषितं सकलं कुरु नंदिनी ॥'

या मंत्राने तिची प्रार्थना करावी. त्या दिवशी तेलात तळलेले व थाळ्यात (पातेल्यात) शिजवलेले पदार्थ व गाईचे दूध, तूप, दही व ताक हे पदार्थ खाऊ नयेत. त्या दिवशी उडीद मिसळलेले अन्न खाऊन जमिनीवर निजावे आणि ब्रह्मचर्याने राहावे. याच द्वादशीला आरंभ करून पाच दिवस पर्यंतच्या पूर्वरात्री नीराजनविधि करावा असे नारदांनी सांगितले आहे. देव, ब्राह्मण, गाई, घोडे, वडील, थोर, लहान या सर्वांना, आई व इतर बायका यांनी ओवाळावे. अपमृत्यु टाळण्यासाठी त्रयोदशीच्या रात्रीच्या सुरवातीला घराबाहेर यमासाठी दिवा लावावा. याच त्रयोदशीला आरंभ करून तीन रात्रीचे गोत्रिरात्रव्रत करावे असे सांगितले आहे. त्याचा प्रयोग कौस्तुभात दिलेला आहे. (याच त्रयोदशीला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असे म्हणतात.)

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top