पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रातीपासून रथसप्तमी पर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण करणार, त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात. मग, या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्या मधे बसवून बाळाचं औक्षण केलं जातं. नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे, हलवा, बोरं, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुटे पैसे, चॉकलेट गोळ्या इ. एकत्र करून घातलं जातं. जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचं असतं. घरी आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू दिलं जातं. बोरन्हाण घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही, असा एक समज आहे यामागे आहे.

या दिवशी बाळाला हलव्यापासून बनवलेले मुकूट, बासरी, बाजूबंद, गळ्यातला हार, कंबरपट्टा इ. दागिने घातले जातात. आपल्याकडे एरवी काळा रंग निषिद्ध असला, तरी या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात.

थंडीच्या या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. संक्रातीला सुगड भरताना किंवा बोरन्हाणासाठी उसाचे करवे, बोरं, भुईमुगाच्या शेंगा, तीळ आदींचा उपयोग केला जातो. याचं कारण म्हणजे त्या त्या ऋतूत येणाऱ्या पिकपाण्याचा उपयोग आपण पूर्वापार करत आलो आहोत. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा, असा व्यापक विचारही त्यामागे दिसून येतो.

बोरन्हणाच्या निमित्ताने बोरं, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात. नवीन चवींबरोबरच नव्या लोकांशीही त्यांची ओळख होते. बऱ्याच घरात मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरन्हाण केलं जाते. या निमित्ताने लहानमोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. आज कामाच्या निमित्ताने बाहेर राहणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी ही काळाची गरज बनली आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

Post a Comment Blogger

 
Top