मकर संक्रांत २०२३ 🌹
शके १९४४ , पौष कृ सप्तमी , शनिवार १४ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८:४४ वा. सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे . त्यामुळे या वर्षी संक्रांत रविवार १५ जानेवारी रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे . संक्रांत बालव करणावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे . तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे . केशराचा टिळा लावलेला आहे . वयाने कुमारी असून बसलेली आहे . वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे व पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे . सर्प जाती आहे . भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव राक्षसी असून नाक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त ३० आहेत . दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असून ईशान्येकडे पहात आहे . संक्रांति ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात . संक्रांति पर्वकाळात स्नान , दानधर्म , नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते . पर्व काळात दात घासणे , कठोर बोलणे , वृक्ष , गवत तोडणे , गाई म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत .
संक्रांति पर्व काळात स्त्रीयांनी करावयाची दाने
देश काल कथन करून
" मम् आत्मन: सकल पुराणोक्त फल प्राप्तर्थ्य श्री सवितृ प्रीतीद्वारा सकल पापक्षय पूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुख संपदादि कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय ( अमुक ) दानं करिष्ये "
असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी .
पर्व काळातील करावयाची दाने
नवे भांडे , गाईला घास , अन्न , तीळपात्र , गुळ , सोने , भूमी , गाय , वस्त्र , घोडा , इत्यादी यथाशक्ती दान करावे .
जन्मनक्षत्रा वरून संक्रांतीची शुभाशुभ फले
१) हस्त , चित्रा , स्वाती :- प्रवास .
२) अनुराधा , विशाखा , ज्येष्ठा , मूळ , पूर्वाषाढा , उत्तराषाढा :- सुख , सौख्य .
३) श्रवण , धनिष्ठा , शततारका :- रोग - आजार .
४) पूर्वाभाद्रपदा , उत्तराभाद्रपदा , रेवती , अश्विनी , भरणी , कृतिका :- वस्त्र लाभ .
५) रोहिणी , मृग , आर्द्रा :- नुकसान .
६) पुनर्वसू , पुष्य , आश्लेषा , मघा , पूर्वा , उत्तरा :- उत्तम द्रव्य लाभ .
संक्रांतीचा पर्वकाळ १५ जानेवारी रविवार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे .
या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावणे , तिलमिश्रित उदकाने स्नान , तिलहोम , तिलतर्पण , तिलभक्षण , तिलदान केले असता सर्व पापांचा नाश होतो .
दरवर्षी मकर संक्राती संदर्भात , ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो . अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो . त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
( आभार - दाते पंचांग )
- अशोककाका कुलकर्णी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook