विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ  treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी असे मानले जाते. राजाच्या विरूद्ध बंड करणाऱ्यांचा पाडाव करून राजाची मर्जी राखणारे ते बंडहारी – भंडारी असाही एक समज आहे. ते ताडीमाडी काढण्याच्या व्यवसायाकडे अठराव्या शतकात वळल्याचे दिसते; तसेच, ते दारू गाळण्याचा व्यवसायही करत असत. भंडारी समाज मूळचा क्षत्रिय. तो राजनिष्ठ व लढवय्या होता. सखाराम हरी गोलतकर यांनी 1925 मध्ये ‘भंडारी ज्ञातीचा इतिहास’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यांची वस्ती कारवार होनावर्ते ते गुजराथच्या किनारपट्टीपर्यंत आहे.
भंडारी जातीची उत्पत्ती पं. महादेवशास्त्री जोशी यांनी पुराण कथेने नोंदली आहे - तिलकासूर नावाचा दैत्य फार माजला होता. म्हणून भगवान शंकराने त्याला घाण्यात टाकले आणि नंदीला घाणा फिरवण्यासाठी सांगितले. नंदीचे कष्ट पाहून शंकराला घाम आला. त्याच्या कपाळावरील घर्मबिंदूतून एक पुरुष निर्माण झाला. तो भंडाऱ्यांचा मूळ पुरुष! तो शंकराची स्तुती करत होता म्हणून शंकराने त्याला भावगुण असे नाव ठेवले. शंकराने त्याच्या लिलेने तेथे एक नारळाचे झाड निर्माण केले आणि त्यावरचे फळ तोडून आणण्याची आज्ञा भावगुणाला केली. ते पाणी पिऊन शंकर तृप्त झाला आणि त्याने भावगुणाला अलकावतीच्या भांडारावर अधिकारी म्हणून नेमले.
भंडारी समाजात कित्ते भंडारी, हेटकरी भंडारी, खळे भंडारी, गावड भंडारी, चौधरी भंडारी, देवकर भंडारी, मोरे भंडारी, शेषवंशीय ऊर्फ शिंदे भंडारी असे प्रमुख भेद आहेत. ते पोटभेद त्यांच्या गावांवरून, व्यवसायावरून व त्यांच्या मूळ उत्पत्ती कथेवरून पडले असावेत. उदाहरणार्थ, खांदेरीजवळच्या ‘खळ’ गावातील खळे भंडारी किंवा मौर्य राजाबरोबर महाराष्ट्रात आलेले ते मोरे भंडारी, कदंब किंवा कीर्ती राजाचे अनुयायी ते कित्ते भंडारी, हाती शस्त्र धरणारे ते हेटकरी भंडारी, गावड हे बंगाल (गौडदेश) मधून आले आहेत, म्हणून ते गावड भंडारी व शेषवंशीय भंडारी हे लोक शेषाचे वंशजसमजले जातात. सहासष्ट क्षत्रिय कुळे पैठणहून उत्तर कोकणात आली. त्यांतील नऊ कुळे शेषवंशीय भंडारी समाजाची आहेत. ही माहिती ‘महिकावतीची बखर’, ‘साष्टीची बखर’ व सखाराम हरी गोलतकर यांच्या ‘भंडारी ज्ञातीचा इतिहास’ या ग्रंथांतून मिळते.
शिरगणतीनुसार जवळ जवळ निम्मे भंडारी रत्नागिरी जिल्ह्यात होते. त्या खालोखाल मुंबई शहर, सावंतवाडी संस्थान, ठाणे जिल्हा, कॅनरा जिल्हा, कुलाबा जिल्हा, जंजिरा संस्थान, सुरत जिल्हा आणि मुंबई उपनगर असा भंडाऱ्यांच्या वास्तव्याचा प्रदेश आहे. मुंबईचा वाढलेला विस्तार आणि तेथे गेल्या साठ-सत्तर वर्षांत झालेली स्थलांतरे लक्षात घेतली तर मुंबईत सर्वांत जास्त भंडारी असावेत.
भंडारी हे मूळच्या मुंबईच्या रहिवाशांपैकी होत, मात्र कोळ्यांचा जसा आवर्जून मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून उल्लेख होतो तसा भंडाऱ्यांचा होत नाही. मुंबईत भंडाऱ्यांची संख्या 1931 च्या शिरगणतीनुसार कोळ्यांच्या सहापट होती. त्यांतील खूपसे दक्षिण कोकणातून स्थलांतरित झालेले होते. ‘जेथे माड तेथे भंडारी’ असे म्हटले जाते. मुंबई इंग्रजांच्या ताब्यात 1668 मध्ये आली. जेरॉल्ड ऑजिअर 1670 ते 1677 या काळात मुंबईचा गव्हर्नर होता. त्याने मुंबईच्या विकासाचा पाया घातला. त्याने सर्व धर्मांच्या लोकांना तेथे विनातक्रार राहता येईल असे धोरण आखले, व्यापारी-कारागिरांना सवलती दिल्या, इस्पितळे काढली, न्यायालये सुरू केली, संरक्षणासाठी ‘बॉम्बे मरीन’ नावाचे आरमार उभारले आणि बंदोबस्तासाठी भंडाऱ्यांच्या मदतीने शिपायांची फलटण उभारली. ती मुंबई पोलिस दलाची सुरुवात होय. मुंबई शहराची उभारणी सुरू झाली तेव्हापासून भंडारी मुंबईत पोलिस दलांत आहेत. भंडारी पोलिसांची फलटण कित्येक वर्षे ‘भंडारी मिलिशिया’ या नावाने ओळखली जाई.
भंडारी समाज दक्षिणेस गोव्यापासून उत्तरेत भडोच शहरापर्यंत वास्तव्य करून आहे.
भंडारी समाज ज्या भागांत वास्तव्यास आहेत त्यांनी त्या भागांतील बोलीभाषा /प्रांतभाषा आत्मसात करून ते त्या भागाशी एकरूप झालेले दिसतात. उदाहरणार्थ, गुजराथमधील देवकर भंडारी गुजराथी बोलीभाषा बोलतात तर गोव्यातील भंडारी गोमंतकांतील बोलीभाषा बोलताना आढळतात. कोकणातील भंडारी कोकणी बोलतात. मालवणी भंडारी लोकांची भाषा तर अनेक हिंदुस्थानी शब्दांच्या अपभ्रष्ट रूपांनी भरलेली आहे. उदाहरणार्थ –
  मराठी                  मालवणी शब्द            हिंदुस्थानी             
   मला                           माका                       मैको        
   तुला                           तुका                        तोको            
   आम्हाला                    अमका                     हमको
   येथे                            हैय                          यहा                                                               
   कोठे                          खये                         कहा
   येथे                           हैसर                         यहापर
  
भंडारी समाजातील पुरुष धोतर, सदरा व सफेद किंवा काळ्या रंगाची टोपी वापरत असत. विशेष समारंभासाठी जाणे असल्यास उपरणेही परिधान करत. आर्थिक संपन्न असलेल्या कुळांतील पुरुष धोतर, डगला, उपरणे व डोक्यावर पगडी घालत असत. स्त्रियांचा पेहराव साधाच असे. त्या काळात स्त्रिया विशिष्ट पद्धतीने लुगडे नेसत, त्याला आडवे लुगडे नेसणे असे म्हणत. ते शेतीच्या व दैनंदिन कष्टाच्या कामासाठी सुटसुटीत पडत असावे. घरंदाज स्त्रिया मात्र उभे नऊवारी लुगडे नेसत. नाकात नथ असे व कानांत मोत्याची कुडी किंवा कर्णफुले घालत.
नव्या काळात सर्रास सर्व स्त्री व पुरुष आधुनिक पद्धतीचा पेहराव करतात. पुरुष शर्ट-पँट परिधान करतात तर स्त्रिया पाचवारी साड्या किंवा पंजाबी / गुजराथी ड्रेस घालू लागल्या आहेत.

भंडारी समाज हा ज्या राजांच्या पदरी सैनिक म्हणून काम करत होता, ती राज्ये नष्ट झाली. त्यानंतर भंडारी समाजाचे लक्ष शेती करणे व ताडी-माडी काढणे या क्षेत्राकडे वळले. भंडारी समाजाच्या शेतकऱ्यांनी अधिक धान्य पिकवा या मोहिमेत सक्रिय भाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ या तालुक्यांत तसेच गोव्याच्या पूर्वेकडील भागांत डोंगरातून अनेक नाले उन्हाळ्यातही वाहत असतात. भंडारी समाजातील शेतकऱ्यांनी ते पाणी त्यांच्या शेतीकडे वळवले व त्या पाण्याचा उपयोग करून उन्हाळ्यात भाताचे पीक लावले. भंडारी समाजातील शेतकरी फलोद्यानाच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. कोकणातील डोंगर व टेकड्या पूर्वी पडित होत्या. जमिनीची धूप झाल्यामुळे खडक उघडे पडले होते. परंतु तथील शेतकऱ्यांनी कल्पकतेने काजूची लागवड केली. उघडे-बोडके डोंगर काजू वृक्षांनी आच्छादल्यामुळे जमिनीची धूप थांबली.
भंडारी समाज कष्टकरी शेतकरी म्हणून ओळखला जातो. त्यांनी त्यांच्या बागेत आंबा, काजू या फलवृक्षाबरोबरच नारळी पोफळीच्या सुंदर बागा समुद्र किनाऱ्यालगत फुलवलेल्या गोव्यात तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांत पाहावयास मिळतात.
भंडारी समाजाने चिकूच्या सुंदर बागा डहाणू, पालघर व तलासरी येथे निर्माण केल्या आहेत. त्या बागांतील चिकू दिल्ली, अहमदाबाद, मुंबई येथील बाजारपेठांत विक्रीसाठी पाठवले जातात. चिकूच्या बागांत आंतरपीक म्हणून लिली या फुलझाडांची लागवड केली जाते. गुजराथ राज्यातील बलसाड, सुरत, भडोच जिल्ह्यांतील भंडारी समाजाचे शेतकरी अन्नधान्याची पिके व कापूस, ऊस, फळझाडे, भाजीपाला ही पिके घेण्यात कुशल आहेत. भारत सरकारच्या योजना आयोगाचे माजी सदस्य जयवंतराव पाटील यांनी भंडारी समाजाने शेती क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा सुंदर आढावा घेतला आहे.
शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी नौदल प्रमुख म्हणून प्रसिद्ध होता. त्यांच्या आरमारात कोकणातील भंडारी युवकांचा भरणा जास्त होता. ते साहसी वृत्तीचे व दर्यावर्दी म्हणून सर्वपरिचित होते. त्यामुळेच की काय, ते पूर्वी जहाज बांधणी व्यवसायात व अलिकडे कस्टम क्लिअरिंग व्यवसायात प्रामुख्याने दिसतात.
भंडारी समाज न्याहरी म्हणून तांदळाच्या पिठाची भाकरी व लोणचे खात असे. मात्र, दुपारी घरी आल्यानंतर माशाचे कालवण व भात असे त्यांचे भोजन घेत असे. होळीसारख्या सणाच्या वेळी प्रामुख्याने पुरणपोळ्या-दूध व गौरी-गणपती उत्सवात नारळाचे पुरण असलेले मोदक केले जातात. काही मंडळीच त्यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात; परंतु गौरीचे पूजन मात्र सर्व घरांतून होताना दिसून येते.
भंडारी समाजाच्या धार्मिक रुढी व रीतिरिवाजांबद्दल वेगवेगळ्या ग्रंथांत वेगवेगळी माहिती मिळते. खळनाथ, कालिकादेवी, सातेरी, नागनाथ, एकविरा देवी ही भंडाऱ्यांची कुलदैवते असली तरी भंडारी मूळ शीव उपासक. काहींच्या मते, भंडारी लोक नागवंशी असून महाभारतानंतरच्या काळात आर्यांच्या अत्याचाराला कंटाळून ते दक्षिणेतून आले, तर काहींच्या मते, ते राजस्थानातून महाराष्ट्रात आले.
कोकणातील भंडारी लोक श्रीगणेशोत्सव व होलिकात्सव मोठ्या श्रद्धेने पार पाडतात. मुंबईचे सर्व चाकरमाने कोकणात श्रीगणपतीच्या व होळीच्या उत्सवांसाठी आवर्जून जातात. बऱ्याच गावांत होळीच्या अग्रपूजेचा मान हा भंडारी समाजातील परंपरेने चालत आलेल्या विशिष्ट कुळांतील व्यक्तीला दिला जातो. स्त्रियांचे वटसावित्री व्रत असो किंवा मकरसंक्रांतीचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम असो, तरुण स्त्रिया ते पूर्वीच्याच पद्धतीने साजरे करताना दिसतात.
भंडारी समाजातील नामवंत व्यक्ती व त्यांचे योगदान
व्यक्ती म्हणून भंडारी समाजातील शेकडो लोक महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मात्र समाज म्हणून कोकणपट्टी आणि मुंबईच्या बाहेर भंडारी अप्रसिद्धच म्हणावे लागतील.
प्रसिद्ध असणाऱ्यांमध्ये मुंबईतील नाना पाटेकर, राजा मयेकर, मच्छिंद्र कांबळी, सतीश पुळेकर, स्नेहल भाटकर आणि रमेश भाटकर हे पितापुत्र, महेश मांजरेकर हे कलावंत भंडारी आहेत. क्रिकेटचे मैदान गाजवणारे विजय मांजरेकर, पद्माकर शिवलकर व रामनाथ पारकर हे भंडारी आहेत. नृत्य क्षेत्रातील पार्वतीकुमार आणि महान चित्रकार मुरलीधर आचरेकर व महान चरित्रकार धनंजय कीर, इंग्रजी अमदानीतील प्रमुख समाजधुरीण रावबहाद्दूर सी.के. बोले, पतित पावन मंदिर उभारणारे व दादरच्या हिंदू स्मशानभूमीसाठी जागा देणारे भागोजी बाळाजी कीर हे भंडारी जातीचेच.
1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात पालघर येथे हुतात्मा झालेल्या पाच स्वातंत्र्य सैनिकांपैकी तीन भंडारी समाजातील आहेत. त्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे देशभक्त सखाराम भिकाजी पाटील हे भंडारी समाजाचेच. ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान भंडारी समाजातील वसई येथील दत्तात्रय राऊत यांना मिळाला होता.
माजी राज्यमंत्री कालिदास कोळंबकर, त्याचप्रमाणे माजी आमदार श्रीकांत सरमळकर, मुंबईचे माजी महापौर व माजी आमदार चंद्रकांत पडवळ, नंडोऱ्याचे कृषिवल सखाराम पाटील, श्रीधर पाटील व तारापूर येथील वि. सी. पाटील, स.मु. ठाकरे हे माजी आमदार होते. रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदी बसणारी सर्वांत तरुण व्यक्ती वसंतराव सुर्वे, राष्ट्रपतींचे मानद वैद्यकीय सल्लागार-खासदार पद्मश्री डॉ. विश्वनाथ हरीभाऊ साळसकर हे सर्व भंडारी समाजातील आहेत. सोलापूरचे प्रख्यात डॉक्टर काशिनाथ बाळकृष्ण चिंदरकर हेही भंडारी आहेत. ठाणे शहराच्या माजी महापौर शारदा राऊत याही भंडारीच. भंडारी समाजाच्या पहिल्या महिला वकील संजीवनी आकलेकर आणि दादर, मुंबई येथील श्रीमती रतन ठाकूर या भंडारी समाजाच्या तरुणीने स्वातंत्र्यपूर्व काळात एम. ए. बी. टी. होऊन आर्यन एज्युकेशन शाळेत 1948 पासून शिक्षिकेची नोकरी केली. त्यांनी लिहिलेला ‘बिंबस्थानाच्या परिसरांत’ हा ग्रंथ अभ्यासपूर्ण आहे. हेटकरी मासिकाचे संपादक डॉ. भालचंद्र आकलेकर, प्रतिकूल परिस्थितीत ‘ठाणे पत्रकार भवन’ बांधणारे व डहाणू येथे ‘स्व. शामरावजी पाटील सभागृह’ बांधण्यास चालना देणारे व कित्येक वर्षे ‘ठाणे जिल्हा पत्रकार संघा’चे अध्यक्ष म्हणून निवडून जाणारे श्री. ब. के. राऊत हे देखील भंडारीच.
शैक्षणिक क्षेत्रही भंडारी ज्ञातीतील मंडळींनी दुर्लक्षित केलेले नाही. इंग्रज सरकारात वरिष्ठ अधिकारी असलेले विनायक ठाकूर हे मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे संस्थापक सदस्य होते. मुंबईत पहिला मराठी छापखाना सुरू करणारे आणि तत्कालिन उच्चवर्णियांच्या नाराजीला न जुमानता पंचांग छापणारे गणपतराव कृष्णाजी यांनी त्यांच्या छापखान्यांत तुकारामाची गाथा छापली. त्यांनीच प्रथम दादोबा पांडुरंगांचे मराठी व्याकरण आणि धर्मशास्त्रापासून अनेक पुस्तके छापली. लोकहितवादींची शतपत्रे ज्या ‘प्रभाकर’ साप्ताहिकात येत त्याचे सुरुवातीचे काही अंक गणपत कृष्णाजींच्या छापखान्यांत छापले गेले. त्यांनी स्वत:ची टाईप फौंड्री काढली होती.
बोरिवलीचे डॉ. हिंदळेकर हेही एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व! त्यांच्या मातोश्री पाऊणशे वर्षांपूर्वी नर्स होत्या. त्यांनी त्यांच्या मुलास कष्टाने एम्. डी. पर्यंतचे शिक्षण देऊन निष्णात डॉक्टर बनवले. त्यांचे बोरीवली, मुंबई येथील ‘सुमती मॅटर्निटी होम’ नावलौकिक मिळवून गोरगरिबांची सेवा अव्याहतपणे करत आहे.
मालवण येथील ‘भंडारी एज्युकेशन सोसायटी’ने ‘भंडारी हायस्कूल’ची स्थापना शंभर वर्षांपूर्वी केली.
भंडारी समाजात लग्नात कोठल्याही तऱ्हेचा हुंडा दिला जात नाही किंवा घेतला जात नाही. विवाह विधी पूर्वपरंपरागत पद्धतीने केले जातात. वराकडील म्हणजे मुलाकडील मंडळी वधुपित्याकडे वाजत गाजत लग्नाला येतात. देवाब्राम्हणांच्या साक्षीने आणि नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडतात.
पूर्वी विवाह समारंभाच्या वेळी मांसाहार दिला जात असे व त्यामुळे साहजिकच बोकडाची हत्या केली जात असे. परंतु ती पद्धत रुढ नाही. त्याऐवजी शाकाहारी भोजन दिले जाते. मात्र बोकडाचे प्रतीक म्हणून कोहळा हे भाजीफळ समारंभपूर्वक कापण्यात येते व कोहळा कापण्याचा मान वराच्या बहिणीच्या यजमानास दिला जातो. तो त्याच्या हाती शस्त्र म्हणून विळा किंवा कोयता घेऊन त्याचे दोन भाग करतो. त्यानंतर त्या कोहळ्याची भाजी उपस्थित वऱ्हाडी मंडळींना भोजनात दिली जाते. तो कार्यक्रम लग्नाच्या एक दिवस आधी केला जातो.
भंडारी समाजात लग्नाच्या विधीचे जे मुख्य साधन छत्री, अबदागिरी, निशाण शिंग, घोडा ही त्यांच्या त्यांच्या कुळाची जी दैवते असतात. ती त्या त्या स्थानी असतात, ती मुद्दाम लग्नाच्या वेळी आणावी लागतात. श्रीफळ आणि हाती  बांधण्याचे हळदीचे लग्नकंकण असल्यावाचून भंडाऱ्याचे लग्न लागत नाही. त्यांचे धर्मविधी त्यांच्या छात्रधर्मास अनुसरून आहेत. त्या चालीरीती रजपूतांच्या समान आहेत.
भंडारी समाजात लग्नविधीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टिळा-विड्याचा मान. सर्वसामान्यपणे विवाह समारंभ हे वधूच्या घरी साजरे होत असत. त्यावेळी वधूकडील व वराकडील सर्व मंडळी विवाह समारंभास आली आहेत किंवा नाही याची जाहीर चौकशी नावानिशी व गाववार केली जात असे. प्रत्येक गावाच्या मानकऱ्याचा क्रम ठरलेला असे. त्यानुसार त्याचे नाव पुकारले जाई व ती व्यक्ती विवाह समारंभास उपस्थित असेल तेथे वधुपिता स्वत: जाऊन तिच्या कपाळी चंदनाचा टिळा लावून, त्यास पानाचा विडा देऊन सन्मानित करत असे.
भंडारी समाज मंडळाने सामुदायिक पद्धतीने विवाह समारंभ घडवून आणण्याचे प्रयत्न केले आहेत. गरीब घराण्यांतील वधू-वरांना त्याचा चांगला फायदा होताना दिसतो.
भंडारी समाजात पूर्वी न्यायदानासाठी गोत मंडळे होती. गोत हा गोत्र या शब्दाचा अपभ्रंश आहे. गोत मंडळे समाजातील विविध प्रकारचे तंटे-भांडणे करणाऱ्यांना अथवा समाजविरोधी काम करणाऱ्यांना न्यायानुसार शिक्षा देण्याचे काम करत असत. जशा प्रकारचा गुन्हा घडला असेल तशा प्रकारची शिक्षा गुन्हेगाराला सर्वसामान्यपणे फर्मावली जात असे. त्यामागे मुख्य उद्देश कदाचित आपल्या ज्ञातीतील झगडे बाहेर जाऊ न देता ते सामंजस्याने समाजधुरीणांनी मिटवावेत असा असावा. त्यामुळे सामाजिक संस्थेचा दरारा समाजावर होता. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजात 1. कल्याण, 2. चेऊल, 3. ठाणे, 4. तारापूर, 5. केळवे माहीम, 6. सोपारे (सोळागाव) व 7. वसई (बारागाव)  या सात स्थळी गोत्र मंडळे होती. प्रत्येक गोताला एक गोतर्णे किंवा गोत्रनियंत्रण करणारा म्हणजे गोत्राचा पुढारी असे. ही पद्धत कालानुरूप बंद झालेली आहे. वसई येथील कै. अनंतराव वामनराव ठाकूर यांनी ‘सामाजिक न्याय मंडळा’ची स्थापना केली. त्या मंडळाच्या मार्फत ज्ञातीतील लोकांचे आपसांतील भांडणतंटे मिटवून, त्यांना सरकार दरबारी कोर्टात न जाता त्यांची भांडणे सामंजस्याने संपवून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. ती एक उल्लेखनीय व स्पृहणीय गोष्ट आहे.
मुंबईहून भालचंद्र आकलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हेटकरी’ हे मासिक दरमहा प्रकाशित केले जाते. वसईचे कमळाकर राऊत हे गेली अनेक वर्षे ‘चैत्रबन’ नावाचे त्रैमासिक प्रकाशित करत होते. त्यामुळे समाजातील विविध व्यक्तींची व संस्थेची माहिती सर्व ज्ञाती बांधवांना कळण्यास फारच मदत होताना दिसते.
साहित्य क्षेत्रातही भंडारी व्यक्तींचे मोठे योगदान दिसून येते. ‘नवाकाळ’चे कार्यकारी संपादक दत्ताराम बारस्कर, केळवे येथील सुधाकर ठाकूर, होड्यावड्याचे धोंडू पेडणेकर, वसईचे हिराजी राऊत व कमळाकर राऊत तसेच, जुन्या काळातील महान चरित्रकार धनंजय कीर... त्यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चरित्रे लिहिली आहेत व त्या चरित्रग्रंथांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
भंडारी समाज हा विविध पोटशाखांत पसरलेला आहे. त्यांनी कालानुरूप एकत्र यावे व समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी/विकास व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली जात आहे. पुढारलेल्या समाजाप्रमाणे भंडारी समाजाने शैक्षणिक /सामाजिक/सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात पुढे यावे या उद्देशाने अलिकडेच अखिल भारतीय भंडारी महासंघाची स्थापना ज्येष्ठ पत्रकार श्री. ब.के. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.
- प्रा. अशोक  रा. ठाकूर
आंतरजालवरून साभार - स्त्रोत : थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

Post a Comment Blogger

 
Top