ब्लू रिबन
एक गहिरी कथा कदाचित काहींनी इंटरनेटवर वाचली असण्याची शक्यता आहे, पण कथा इतकी सुंदर आहे की दुसर्‍यांदा वाचली तरी काही हरकत नाही म्हणून दोहरायचा मोह आवरत नाही.


न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर निळ्या रिबनचा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are, makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला. ''वा, माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.'' पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ''तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही निळी रिबन लावा.''

एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्‍या एका तरुणाच्या शर्टावर ''थँक यू, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही निळी रिबन लावतो'' असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका ऑफिसमध्ये ज्युनियर कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल नंबर मिळाला होता. विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ''आम्ही शाळेसाठी एक प्रोजेक्ट करतो आहोत. तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?''

कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्‍या दिवशी त्याने आपल्या बॉसपाशी जाऊन ''थँक यू You made a difference in my life " असे म्हणत निळ्या रिबनचा बो लावला. बॉस अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्‍याने बो लावल्यावर बॉसच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ''माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. थॅक्यू.''

कर्मचार्‍याने त्याला विचारले, ''ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतले प्रोजेक्ट आहे. आयुष्यात बदल करणार्‍या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा निळ्या रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?''
बॉस एकदम म्हणाला, ''हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?'' कर्मचार्‍याने आपल्याकडचा उरलेला बो बॉसला दिला.
बॉस घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर निळ्या रिबनचा बो लावत तो म्हणाला ''मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Who you are, makes a difference in my life "
 
मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ''डॅड , मला वाटायचे की तुला मी अजिबात आवडत नाही. मी तुला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतो. ही बघ, मी तुला व आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस डॅड.'' बॉसने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते आणि बापालाही मुलगा मिळाला होता.

आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते. मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात. आईला ते जन्मजात कसब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते . पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात, पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष मौजमजेत वा कामात मग्न रहातात. 

म्हणतात की, Any man can be a Father but it takes someone special to be a Dad. कोणीही पुरुष बाप सहज बनू शकतो, पण बाबा होणे काहींनाच जमते. चांगला पालक होणे ही प्रवृत्ती आहे. असिधारा व्रत आहे. त्यासाठी शिक्षण, जात, धर्म यांपैकी कशाचीही जरूर नसते. फक्त इच्छा असावी लागते. अँजेलिना जोली या प्रसिद्ध सौंदर्यखनी नटीचा पिता जॉन व्हॉईट हाही प्रख्यात नट आहे, ऑस्कर विजेता अभिनेता आहे. ती त्याला म्हणते, "Dad, you're a great actor but you're a better father."

Happy Fathers Day Friends !! :)

(डॉक्टर  मीना नेरुरकर यांचा  मला आवडलेला  सामना मधील लेख  दिनांक : १७.०६.२०१२)  

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी 





Post a Comment Blogger

 
Top