देवाने पाठवलेल देवदूत माई सिंधुताई सपकाळ - एक अविस्मरणीय भेट !!
लेखक - सचिन हळदणकर
लेखक - सचिन हळदणकर
आदरणीय माई सिंधुताई सपकाळ ज्यांनी अनाथांना स्वताची मुल बनवलं , निराधार महिला बालकांसाठी , त्यांच्या कल्याणासाठी आपल आयुष्य वेचल त्या माई सिंधुताई सपकाळ ज्यांना पाहिलं कि अस वाटत कि देवाने आपल्या देवदुतालाच माईंच्या रुपात इथे पृथ्वीवर पाठवलं असाव ....या देवदूताला भेटावयास आणि त्याच्या या महान कार्यात खारीचा वाटा उचलावा या हेतूने मन माझे कडून एक छोटास पाउल उचललं गेल ..त्याचा अविस्मरणीय अनुभव मि व्यक्त करत आहे..
२३ जून २०१२ ला विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही पुण्याकडे जाण्यास प्रयाण केले आणि पुण्यातील सारसबाग मधील श्री गणेशाचे दर्शन घेवून आमच्या छोट्याश्या उपक्रमाला त्याची साथ लाभावी म्हणून साकडे घातले. दोन महिन्याच्या पाठपुराव्या नंतर आम्हाला माईंची भेट घेण्यास योग्य वेळ आणि बालनिकेतनातील चिमुरड्यांना भेट देण्याची परवानगी मिळाली होती.
आणि तो भाग्यशाली दिवस उजाडला. आम्ही सर्वजण माईना आणि चिमुकल्यांना भेटण्यासाठी सज्ज झालो.
मनात धाकधूक होती कि माईंची भेट होईल कि नाही
आणि आम्ही माईंच्या ऑफिसमध्ये पोचलो ..दरवाज्यावर माईंच्या नावाची पाटी पाहिली. मनात उत्सुकता , आनंद , आदर या सर्व भावनांचे संमिश्रण निर्माण झाले होते.
आता पाउल टाकताच पाहतो तर सर्व खोली पुरस्कारांनी आणि भेट वस्तूंनी भरून गेलेली होती.. लोकांच माईवरच प्रेम आणि त्याचं कर्तुत्वच जणू तो एक एक पुरस्कार सांगत होता. पाहून आम्हा सर्वांचे डोळे दिपून गेले.
काही क्षणातच माईंचे आगमन झाले, " बाळानो माईंची आठवण आली वाटत ! हे त्यांचे पहिले काही शब्द अगदी एका क्षणात आई मुलाच वात्सल्याच नात निर्माण करून जाणारे कानी पडले आणि त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्व , आनंदी हसरा चेहरा , साध्या राहणी असूनसुद्धा त्यांचा तेजस्वीपणा , अस ते मायेच प्रतिक पाहून मन भरून आले
या समाजात जिथे एका ठिकाणी भ्रष्टाचार , घोटाळे चालले आहेत , अजूनही आपल्या देशात अन्न वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांची कित्येक कुटुंबाना कमतरता भासत आहे. समाजात अजूनही बालविवाह आणि स्त्री- भ्रुणहत्या होत आहेत , निरक्षरतेचे प्रमाण हि काही ठिकाणी खूप आहे, बालमजुरी करून घेतली जाते अशा या समाजात आशेचा किरण म्हणून माई सारख्या समाज सेविका सुद्धा आहेत. माईंच्या या समाज सेवेचे जितक कौतुक करू तितक कमीच आहे. अशा या माउलिनी आम्हाला परिचय विचारला आणि आम्ही इतकी सर्व मन माझेची मंडळी मुंबईहून त्यांना भेटावयास आलो आहोत हे पाहून त्या भाव विभोर झाल्या.
आम्हास प्रश्न विचारण्यास माईंनी परवानगी दिली पण माईना खूप काही विचारू अशी मनाची तयारी करून गेलेलो आम्ही त्या माउली समोर निशब्ध झालो होतो..
मग माईना पहिला प्रश्न विचारण्यात आला. " माई तुमचे प्रेरणास्थान कोण आहे ?"
माई म्हणाल्या , " माझे प्रेरणा स्थान कोणी नाही, माझी प्रेरणा म्हणाल तर पोटाची भूक, एक अनुभव सांगते, माझ्या मनात मरणाचे विचार यायचे पण मि एका भिकार्याला पहायचे..मरणाला टेकलेला , मरताना दोन घोट पाण्याची आशा करत विव्हळत पडलेला , त्याला सांगितलं . "बाबा , नुसता पाणी पिऊन मरू नका ना बाबा ..भाकरी खावून पाणी पिऊन मरा..दोन घोट पाणी त्याला पाजल..दोन घास खावू घातले ..आणि ते मेल नाही ना ..खाडकन मनात विचार आला ..आतापर्यंत तू मरणाचा विचार करत होतीस सिंधुताई सपकाळ ..दोन घास खावू घातलं ते भिकारी मेल नाही ना ..मग एक काम कर ना ..मरून संपण्यापेक्षा मरणार्यासाठी जगायला शिक ..संपल तिथून सर्व सुरु झाले .. मरणार्यासाठी जगा आपल मरण क्यांसल होवून जात. सगळ्यात मोठी प्रेरणा हि आहे ..पोटाची भूक जगण आपल्याला शिकवते बाळा ...शब्दांचे घोडे फार काळ चालत नाहीत ,उपदेश फार काळ चालत नाहीत ..उपदेश करणारे खूप असतात रे , पण दिसत तस नसत ..जो उपदेश करतो तो जगतोच अस नही रे ..बोलन सोप असत ..दुसर्याला उपदेश करण पण जेव्हा अंगार शेकत तेव्हा कळत , जगण काय आहे ..मि विद आउट गुरूचा चेला , मला कुठला गुरु नाही , मला कोणी उपदेश केला नाही, मि कोणाच बोलन धरून चालले नाही ..माझ्या भुकेमुळे मि जगायला लागली, भुकेमुळे सर्व जवळ आले त्यांची माई झाले ..आता तुम्हा सर्वांची माई झाले ..बोला ..!!!
- -
- -
माईंचे ते शब्द अगदी हृदयाला स्पर्श करून जात होते , माई नि आपल्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे अनेक तडाखे सहन केले तरी देखील स्वताच दुख विसरून माई दुसर्यांसाठी उभ्या राहिल्या. अनाथांची आसव फुसली ...आणि आपल्या आसवाना गिळून टाकल अशा त्या त्यागाच्या मूर्तीला तर शतशः नमन करावेसे वाटत होते .
गाण्याने , कवितेने माईना आधार दिला होता, कवितांमुळेच माझ्या वेदना मि विसरू शकले असे माईंच म्हणन असायचं म्हणून
मन माझे च्या सभासदांनी माईना आग्रह करून त्यांची कविता बोलावयाची विनंती केली ..माईंनी आपल्या मधुर आवाजात ति गाण्यास सुरवात केली ..
वाटेवर काटे ..पाय अनवाणी
परी काळजात माझिया
जनाई ची गाणी
वाटेवर काटे ............
पायाखाली वाळ्वंट...पायावरी भगा
परी काळजात माझिया
वाहे चंद्रभागा
वाटेवर काटे ............
मुखी माझ्या ज्ञानेशाचे ..ओवी लडीवार
नामयाची विना माझी ..तुकोबाचे टाळ
वाटेवर काटे ..पाय अनवाणी
परी काळजात माझिया
जनाई ची गाणी
वाटेवर काटे .........
माईंचा आवाज इतका भावपूर्ण आणि मधुर आहे कि आम्ही सर्व शब्दांच्या सुरमय प्रवासात हरवून गेलेलो माईना
मन माझे च्या सभासदांनी मग त्यांच्या आवडत्या कवी श्री सुरेश भटांची कविता बोलण्याची विनंती केली माईंनी आनंदाने होकार देवून कविता बोलण्यास सुरवात केली
आसवानो माझिया
डोळ्यातुनी वाहू नका
अंतरी च्या वेदना
सार्या जगा दावू नका
हासते आयुष्य माझे
पाहुनी माझी दशा
का तुम्ही हासता
हासू नका , हासू नका
आसवानो माझिया
डोळ्यातुनी वाहू नका....
घाव हे गुलाबी
मोहराया लागले
हाय बाजारात माझा
हुंदका आणू नका
आसवानो माझिया
डोळ्यातुनी वाहू नका
अंतरी च्या वेदना
सार्या जगा दावू नका
--
--
किती मार्मिक शब्द आहेत हे ..आणि माईंचा तो आवाज इतका खरा , भावपूर्ण आणि ते शब्द अगदी माईंच्या अंतरात्म्यातून निघत असल्याप्रमाणे जाणवत होते.
समाजातून मिळालेल्या वेदनांमुळे कोणीही दुसरा व्यक्ती समाजाच्या विरोधात व बदलेच्या भावनेने पेटून उठला असता पण माईंनी याच वेदनांना आपली ताकद बनवलं आणि त्यांनी सहन केलेल्या वेदनांमुळेसुद्धा त्या इतर लोकांच्या वेदना चांगल्या रित्या समजू शकल्या असाव्यात.
मग आम्ही माईंचा शाल आणि श्रीफळ देवून छोटासा सत्कार केला..त्यांना चरणस्पर्श केले
हे सर्व सुरु असताना एक सुंदर अशी निरागस चिमुरडी माईच्या जवळ घोटाळत होती ..त्यांच्यासाठी आणलेल्या फुलांचा गुच्छ , फोटो फ्रेम त्यांना भेट करण्यात आली,
त्यांना प्रत्येक सभासदानी एक एक फुल भेट म्हणून देवून चरणस्पर्श केले आणि माईंचा आशीर्वाद घेतला .
बाल निकेतनाला आमच्याकडून छोटीशी देणगी देण्यात आली ..
आणि मग माईंचा निरोप घेवून आम्ही माजरी , बुद्रुक येथील सन्मती बालनिकेतानाला जाण्यास निघालो ..
सन्मती बालनिकेनाच नुकतच नूतनीकरणाच काम सुरु असल्यामुळे आम्हाला तेथील इमारत दाखवण्यात आली ..तेथील चिमुकल्यांची करण्यात आलेली राहण्याची, शिक्षणाची , खेळण्याची आणि जेवण्याची सोय आम्हाला दाखवण्यात आली
आणि मग आम्ही तेथील चिमुकल्यांबरोबर मस्ती करण्यास ,खेळ खेळण्यास सुरवात केली ..
पुण्यातील आमच्या मित्रांकडून रांगोळी काढण्यात आली
आणि त्यांनी आणलेला केक कापण्यात आला ..
सर्व मुलांनी सहभागी होवून खूप आनद लुटला
अगदी निरागस , हसरे अबोल असे चेहरे ज्यांना माईंचा आधार लाभलेला म्हणून आनद त्यांच्या वाट्याला आलेला ..
आम्ही विनंती करून त्यांना जेवण वाढण्याची परवानगी घेवून त्यांना जेवण वाढण्याच समाधान मिळवलं ..
त्यांच्या बद्दल जाणून घेवून त्यांना वेळ देवून मनाला मिळणार समाधान हे खरोखर अनमोल होत ..
या उपक्रमाला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांचे मि मनापासून आभार मानतो. समाजातील प्रत्येकाने माईंच्या या पसार्याला हातभार लावायला हवा ..ज्यामुळे अनाथांना आई मिळेल आणि हे कुटुंब असच वाढत राहील , फुलत राहील ..माईंची हि कीर्ती अशीच वाढत राहो आणि माईंनी लावलेला लोक कल्याणाचा दिवा सतत असाच चिरंतर तेवत राहो हीच मन माझे परिवारातर्फे श्री चरणी प्रार्थना करतो
...आणि निवेदन करतो कि जमेल तशी आणि तितकी मदत माईना करा ..तुमची मदत करायची इच्छा असेल तर किंवा लेखाबद्दल प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही मला पुढील नंबर वर संपर्क साधू शकता !!
लेखक - सचिन हळदणकर - ९८६९२५७८०८
धन्यवाद !!!
आभार - टीम मन माझे
मन माझे Website : http://mannmajhe.blogspot.com/
मन माझे सेवाभावी संस्था : http://mannmajhetrust.blogspot.com/
Join Our Official Facebook मन माझे पेज: http://www.facebook.com/mannmajhe
Join Our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.