भगवान श्रीगणेशांना नमस्कार असो.
ॐ हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऎकावे. यजन करणार्‍या आम्हांस डोळ्यांनी कल्याणच दिसावे. सुदृढ अवयवांनी व शरीरांनी युक्त असलेल्या आम्ही स्तवन करीत करीत देवांनी दिलेलें जे आयुष्य असेल तें घालवावे. ॥१॥
ॐ ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऎकिवांत आहे तो इंद्र आमचें कल्याण करो. सर्वद्न्य व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. ज्याची गती अकुंठित आहे असा तार्क्ष्य (गरूड) आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो. ॥२॥
ॐ तें (श्रीगजाननरूपी तेज) माझें रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. (पुनश्च सांगतों) तें माझें रक्षण करो व पठण करणाराचे रक्षण करो. ॥३॥
ॐ त्रिवार शांति असो.
श्रीगणेश अथर्वशीर्षाचा अर्थ:
ॐ गणांचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो. तूंच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. तूंच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूंच केवळ (विश्वाचे) धारण करणारा आहेस. तूंच केवळ संहार करणारा आहेस. तूंच खरोखर हें सर्व ब्रम्ह आहेस. तूं प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस. ॥१॥
मी ऋत आणि सत्य (या परमत्म्याच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून वरील सर्व) म्हणत आहें. ॥२॥
तूं माझें रक्षण कर. वक्त्याचे (तुझें गुणवर्णन करणार्यारचें) रक्षण कर. श्रोत्याचें रक्षण कर. (शिष्यास उपासना) देणार्यासचे (गुरूचें) रक्षण कर. (ती उपासना) धारण करणार्यायचे (शिष्याचे) रक्षण कर. ज्ञानदात्या (गुरूंचें) रक्षण कर. शिष्याचें रक्षण कर. मागच्या बाजूनें रक्षण कर. समोरून रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझें रक्षण कर. रक्षण कर. ॥३॥
तूं ब्रम्ह आहेस. तूं चैतन्यमय आहेस. तूं आनन्दरूप आहेस. ज्याहून दुसरें कांहींच तत्व नाहीं असें सत्, चित् व आनंद (या रूपांनी प्रतीत होणारें एकच) तत्व तूं आहेंस. तूं प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस. तूं (नाना प्रकारें नटलेल्या विश्वाचें ज्ञान आहेस. तू (सर्वसाक्षीभूत एकत्वाचें) विशिष्ट असें ज्ञान आहेस. ॥४॥ हें सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतें. हें सर्व जग तुझ्यामुळें स्थिर राहतें. हें सर्व जग तुझ्या ठिकाणींच परत येऊन मिळतें. तूं पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश आहेस. तूं (परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ही) वाणीची चार रूपें आहेस. ॥५॥
तूं (सत्व, रजस् व तमस्) या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तूं (स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारणदेह) या देहत्रयांच्या पलीकडचा (महाकारण) आहेस. तूं (जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था) या तीन अवस्थांच्या पलीकडचा (तुर्यावस्थारूप) आहेस. तूं (भूत, वर्तमान व भविष्यत्) या तिन्ही कालांच्या पलीकडचा आहेस. (मनुष्यशरीरांतील) मूलाधारचक्रांत तूं नेहमी स्थित आहेस. तूं (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति या) तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझें नित्य ध्यान करितात. तूं ब्रम्हदेव, तूंच विष्णु, तूंच रूद्र, तूंच इंद्र, तूंच अग्नि, तूंच वायु, तूंच सुर्य, तूंच चंद्र, तूंच ब्रह्म, तूंच भू:, तूंच भुव:, तूंच स्व: व तूंच ॐकार आहेस. ॥६॥
'गण' शब्दाचा आदिवर्ण 'ग्' याचा प्रथम उच्चार करून वर्णांतील प्रथमवर्ण 'अ' याचा उच्चार केला. त्याचे समोर अनुस्वार अर्ध्चंद्राकार शोभणार्याा ॐकारानें युक्त (असा उच्चार केला कीं) हें तुझ्या बीजमन्त्राचे (ग्ँ) रूप होय. गकार हें पुर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अन्त्यरूप व (प्रणवरूप) बिंदु (हें पुर्वीच्या तिन्हींना व्यापणारें) उत्तररूप होय. या (सर्वां) चे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचें एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि. (अशा रीतीनें बीजमन्त्र सिद्ध होणें) हीच ती गणेशविद्या. (या मंत्राचा) गणक ऋषी आहे. (या मंत्राचा) निच्ऋद्गायत्री हा छन्द (म्हणण्याचा प्रकार) आहे. गणपति देवता आहे. 'ॐ गं गणपतये नम:।' (हा तो अष्टाक्षरी मन्त्र होय.) ॥७॥
आम्ही एकदन्ताला जाणतों. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतों. त्यासाठी एकदन्त आम्हांस प्रेरणा करो. ॥8॥ (या भागास गणेशगायत्री असे म्हणतात.) ॥८॥
एक दांत असलेला, चार हात असलेला, (उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणाक्रमानें त्याच बाजूच्या खालच्या हातापर्यंत) अनुक्रमें पाश, अंकुश, दांत व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचें चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या (रक्तचंदनाच्या) गन्धानें ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचें उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचें कारण असणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधींच प्रगट झालेला, प्रकृतिपुरूषापलीकडचा देव, असें जो नित्य ध्यान करतो तो योगी, (किंबहुना) योग्यांत श्रेष्ठ होय. ॥९॥
व्रतांचा समूह म्हणजेच तपश्चर्या. तिच्या अधिपतीस नमस्कार असो. गणांच्या नायकार नमस्कार असो. सर्व अधिपतींतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा श्रीवरदमुर्तीला नमस्कार असो. ॥१०॥
या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल. ॥११॥
या अथर्वशीर्षानें जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्त्म वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे. (याचा जप करणार्याीला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें. ॥१३॥
आठ ब्राम्हणांना योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसंनिध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो. असें हें उपनिषद् आहे. ॥१४॥

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top