रात्र झाली… सगळीकडे निजानीज झाली… आज तर लोडशेडिंगमुळे रात्री अकरा वाजता लाइट येणार होते… राजूचे आईबाबा अन्‌ राजू इनव्हर्टरचा छोटा लाइट लावून झोपून गेले होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातील गॅसच्या ओट्याखालील छिद्रातून चिंटू अन्‌ त्याच्या पाठोपाठ त्याची आई बाहेर आली… चिंट्या उगाच धडपडू नकोस… सगळे जण शांत झोपलेत बघ… आई म्हणाली… अग आई आज या स्वयंपाक घरात कसा ग छान वास येतोय… आज काहीतरी छान छान केलंय वाटतं राजूच्या आईनं… अरे वेड्या उद्या गणेश चतुर्थी आहे ना? गणपती बाप्पासाठी मोदक केलेत रे राजूच्या आईनं… हं आई गं, मला मोदक खूप आवडतात बघ… चिंटू आपली शेपटी हलवून आईला सांगू लागला… मी शोधतो ना ग डबे… हं इगीच आगाऊपणा करू नकोस… चल बिळात… बघ अकरा वाजले… आता लाइट येतील अन्‌ मग राजूची आई उठली तर त्या दिवशीसारखा चिमटा फेकून मारेल बघ… चल चल…

चिंटूच्या आईनं चिंटूच्या शेपटीला धरलं व त्याला ओढतच बिळात नेलं… दुसऱ्या दिवशी पहाटे राजूची आई उठली… तिनं सगळे घर स्वच्छ केलं… मग राजू व राजूचे बाबाही उठले… राजूनं बागेतील फुलं, दूर्वा तोडून आणल्या… २१ दुर्वांची जुडी केली. राजूच्या बाबांनी टेबलावर गणपतीचं मखर बसवलं व सगळीकडे झिरमाळ्या लावून गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी केली… चिंटू बिळाच्या तोंडाशी येऊन सारखा बघत होता व परत बिळात जाऊन आईला रनिंग कॉमेंट्री सांगत होता…

हं चल चल आई, आरतीची वेळ झाली बघ! चिंटूनं आईला आवाज दिला… चिंटूची आई शेपटी झटकून, केस नीट करून, आरशात बघून चिंट्याच्या मागोमाग बिळाच्या बाहेर आली… गणपती बाप्पा हॉलमध्ये टेबलावर बसवला होता… चिंट्या व आई हळूहळू सरकत सरकत कॉटच्या खाली येऊन बसले… तिथून त्यांना बाप्पा छान दिसत होता… आई आई बघ बघ मोदक… बापरे… ताट गच्च भरून… एवढे सगळे बाप्पालाच का ग? चिंटूनं विचारलं… शू ऽऽऽ… गप्प बैस चिंट्या… गडबड केलीस तर आपण इथे लपून बसलोय हे राजूच्या आईला कळेल अन्‌ मग आपली काही धडगत नाही बघ… सॉरी सॉरी आई… हं आता गप्प बसतो हं… आई आरती सुरू झाली, की टाळ्या वाजवू? हं वाजव…; पण जरा हळूहळू हं…. राजूच्या बाबांनी मोदकाचा व पेढ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला… नारळ फोडला व सगळ्यांना प्रसाद वाटला… चिंटू कॉटखालून डोळे फाडून बघत होता… त्याच्या तोंडाला नुसतं पाणी सुटलं होतं; पण तो काहीच हलचाल करू शकत नव्हता… आरती झाल्यावर सगळे जण स्वयंपाकघरात जेवायला गेले… हीच संधी चिंटूनं साधली. त्याची आई अरे म्हणेपर्यंत त्यानं गणपती बाप्पाच्या समोर वाटीत ठेवलेला मोदक पळवला व थेट बिळात धूम ठोकली…

इतक्‍यात राजू बाहेर आला अन्‌ त्यानं पाहिलं बाप्पासमोरील प्रसादाची वाटी रिकामी झाली होती… आई आई बघ बाप्पानं मोदक खाल्ला वाटतं… ते ऐकून त्याची आईही धावतच आली… अन्‌ तिनं गणपती बाप्पाला लोटांगण घातलं… जय गणेशा… तू आमचा प्रसाद ग्रहण केलास… आमच्यावर अशीच कृपा राहू दे… चिंटूच्या आईनं सर्व ऐकलं अन्‌ ती धावतच बिळात गेली… तिनं चिंटूचा कान धरला व जोरात पिरगाळला… उद्यापासून असा प्रसाद उचलायचा नाही हं… तिनं त्याला दटावलं…

दुसऱ्या दिवशी परत आरतीची वेळ झाली… चिंटूची नुसती गडबड चालली होती… अन्‌ चिंटू पळाला… आज ही त्यानं मोदक पळविला होता… असेच २-३ दिवस गेले… चिंटूला आता तर चोरून मोदक खायची चटकच लागली होती… इकडे त्याच्या आईला काहीच माहिती नव्हतं…

आज अनंत चतुर्दशी… आज गणपती बाप्पा परत जाणार. उद्यापासून आपल्याला मोदक खायला मिळणार नाहीत याचं चिंटूला खूपच वाईट वाटत होतं… आज आपण ४-५ मोदक तरी मिळविले पाहिजेत म्हणजे पुढचे आठ दिवस तरी ते पुरतील असं त्याला वाटलं… त्यानं आईलाही आग्रह केला…. ए आई चल ना ग, उद्या गणपती बाप्पा जाणार आहेत. चल आज आपण आरतीला जाऊया…; पण तू मोदक नाही ना चोरून घेणार? आईनं विचारलं… अं हं…….. मुळीच नाही आपण फक्त आरतीला जाऊया…. चिंटूच्या आईनं परत एकदा आपला जामानिमा नीट केला, आरशात पाहिलं व चिंटूबरोबर बिळाच्या बाहेर आली… दोघंजण हळूहळू बैठकीत कॉटच्या खाली जाऊन बसले… अन्‌ आरती सुरू झाली… आज तर गणपती बाप्पा समोर केळी, पंचखाद्य, मोदक, नारळ पेढे, अबब सगळा एवढा मोठ्ठा प्रसाद ठेवला होता… चिंटूची चुळबूळ सुरू झाली… आईनं डोळे मोठे केले व त्याला गप्प बसवलं…; पण आईची नजर चुकवून चिंटू पळालाच… अन्‌ त्यानं मोदकावर झडप घातली… नेमतं त्याच वेळेस राजूनं पाहिलं… आई आई, ते बघ, उंदीर मामानं मोदक पळविला… मार त्याला,असं म्हणून राजूनं हातातील रिकामी वाटी चिंटूच्या अंगावर फेकली… त्याच्या आवाजानं आई धावतच आली… अरे अरे राजू मारू नकोस उंदीर मामाला…. अरे गणपती बाप्पाचं तर वाहन आहे उंदीर मामा…. सगळा प्रसाद एका ताटात घाल अन्‌ ठेव त्या बिळ्याच्या तोंडाशी…. आज खाऊ दे त्यांना पोटभर प्रसाद….
चिंटूनं राजूच्या आईचं बोलणं ऐकलं अन्‌ शेपटी उंचावून उड्या मारायला लागला… चिंटूची आईही कॉटखालून बाहेर आली अन्‌ दोघं मिळून त्या प्रसादावर तुटून पडले… चिंटू मोदकाचे तुकडे आईला आणून देत होता व आई बिळात जाऊन ठेवून येत होती… दोघांचंही तुडुंब पोट भरलं होतं… चिंटू गणपती बाप्पाला नमस्कार कर आज… बाप्पामुळेच तुझ्यावरचं संकट टळलं… व तुला पोटभर मोदक खायला मिळाले… बाप्पाला माफी माग…

चिंटूनं लगेच कान धरले व बाप्पापुढे लोटांगण घातलं… बाप्पा मला क्षमा कर… मी आता कधीसुद्धा चोरी करणार नाही… मला माफ कर… करणार ना? चिंटूनं डोळे किलकिले करून पाहिले… गणपती बाप्पा त्याच्याकडे बघून हसत होते… अन्‌ चिंटूच्या आईनं त्याची शेपटी धरून त्याला उठवलं… चल राजा, बाप्पानं क्षमा केली बघ… चल चल… बाप्पाच्या मिरवणुकीत तुला नाचायचं आहे ना… चल… आणि चिंटू उड्या मारतच राजूच्या मित्रांबरोबर मिरवणुकीत सामील झाला… बॅंडवर कोंबडी पळाली गाणं सुरू होतं आणि चिंटू त्याच चालीवर गाणं म्हणू लागला….
चिंटू पळाला मोदक खायला…. मोदक खायला…….. हो हो हो……. चिंटू पळाला…..

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top