महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.
नैसर्गिक : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक : या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल.
गुढी उभारण्याची पद्धत:
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.
गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.
पद्धत :
अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्त होते.
इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्तीत ईश्वराकडून येणार्या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.
अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !
आंब्याच्या पानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.
कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व
खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.
१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्वराची संकल्प शक्ती कार्यरत असणे
४. शक्तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्ती प्रवेश करू शकतात. त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी
आ. गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे , हीच आपल्याचरणी प्रार्थना !
आभार - बालसंस्कार.कॉम
Post a Comment Blogger Facebook