'पुणेरी पाट्या' संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर ?
1. आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये - हुकूमावरून)
3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
5. टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
6. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: १९ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज)
8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
11. विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत.
12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.