दोन भिन्न व्यक्ती, भिन्न वातावरणात वाढलेल्या, त्यांच्या आवडीनिवडी,
सवयीही वेगवेगळ्या; पण दोन-तीन भेटींतच सगळे आयुष्य एकत्र घालवायचा निर्णय घेतात. मग आनंदी व उत्साही वातावरणात, अखंड प्रेमात बुडालेले ते दोन जीव लग्नाच्या बंधनात बांधले जातात. "ऍरेंज्ड्‌ मॅरेज' असो वा "लव्ह मॅरेज'; दोघे ओळखीचे असोत की अनोळखी, जेव्हा ते सतत एकमेकांबरोबर असतात,
तेव्हाच खरी ओळख होते. लग्नानंतर नवीन नाती, नवीन माणसे या सगळ्या नव्या नवलाईत पहिली काही वर्षे भुर्रकन उडून जातात; पण हाच काळ खूप महत्त्वाचा असतो. एकमेकांना समजून घेण्यासाठी. अगदी छोट्या छोट्या सवयींपासून
स्वभावापर्यंत सगळे हळूहळू उलगडत जाते. एकमेकांचे सूर जुळतात. संसाराचा
पाया तयार होतो. एक अतूट नाते तयार होते. समोरची व्यक्ती ही आपली आहे, ती
जशी आहे, तशी (गुण-दोषांसकट) तिला स्वीकारता आले पाहिजे. लग्नानंतर
एक-दोन वर्षे नवलाई टिकून असते. मग दोघांच्याही नकळत बदल घडतात. ही तीच
व्यक्ती आहे का, अशा प्रश्‍न पडावा इतपत बदल घडतात! का परिस्थिती बदलते?
नेमके काय होते कुणास ठाऊक! तिच्याशी बोलण्यास, भेटण्यास कायम तत्पर
असणारा "तो' अचानक बिझी होतो. तिचा फोन येताच, "घरी यायला उशीर होणार
आहे,' किंवा "पाच मिनिटांनी फोन कर' इत्यादी सांगतो. तिच्यासाठी वाट्टेल
तेवढे महागाचे गिफ्ट घ्यायला, तिला सरप्राईज द्यायला आतूर असलेला "तो'
तिच्याबरोबर जाताना आधी पाकीट तपासून पाहतो. "ती'सुद्धा काही कमी नसते.
त्याचासाठी नवनवीन पदार्थ बनवणारी "ती' आता त्यालाच फोन करून सांगते
"येताना पार्सल घेऊन ये' किंवा "पोहे खाशील का?' "घरी कधी येणार?' "कुठे
आहेस?' इत्यादी. नेमके काय झालेले असते? इतका बदल कशामुळे झालेला असतो?
उत्तर सोपे आहे ः जबाबदाऱ्या वाढल्या की प्रायॉरिटीज्‌ही बदलतात. संसार
म्हटले की, "भांडण' आलेच; पण रागात कोणी काही बोलले तर ते सोडून देता आले
पाहिजे. "मी, माझे, माझी माणसे' हे सगळे गळून पडले पाहिजे व आपुलकीची
भावना निर्माण झाली पाहिजे. अर्थातच यात दोघांचाही समप्रमाणात सहभाग असेल
तरच हे शक्‍य आहे.
संसार सुखी करायचा असेल तर "सप्तपदीचे सात मंत्र' दोघांनीही अमलात आणावेत.

1) एकमेकांबद्दल प्रेम, विश्‍वास आदर बाळगा

2) समोरच्याने बदलण्याची अपेक्षा न धरता स्वतःत बदल घडवा

3)ज्या दिवशी भांडण होईल, "त्याच' दिवशी मिटवा (अबोला धरू नका). बोलून
विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.

4) स्वतःसाठी वेळ द्या. (छंद जोपासा. मित्र-मैत्रिणींबरोबर थोडा वेळ
घालवा. स्वतःचे वेगळे विश्‍व निर्माण करा). एकमेकांना मोकळीक द्या; तरच
स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमजेल.

5) एकमेकांना वेळ द्या (दोघेच फिरायला जा. गप्पा मारा.)

6) पटकन "सॉरी' म्हणायला शिका व "इगो' सोडा (पुरुषीपणाचा, स्त्रीत्वाचा,
पैशाचा, पदाचा इत्यादी)

7) प्रेम आहेच; पण ते व्यक्त करणेही खूप गरजेचे असते. छोट्या-मोठ्या
प्रसंगांमधून काळजी, आधार, कौतुक, प्रेम हे भाव व्यक्त होऊ द्या
(उदाहरणार्थ  आय लव्ह यू, तू आज छान दिसतोस, किती दमलीस तू...इत्यादी)

संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती नांदेल. मग दिवसभर कुठेही
असा; संध्याकाळी सगळ्यांनाच घरी परतण्याची ओढ असेल; पण तरीही वाढत्या
जबाबदाऱ्यांचे व कामामुळे येणाऱ्या तणावांचे पडसाद आपल्या व्यक्तींवर
उमटणारच. कधीतरी वाद होणारच; 
पण त्यांचे प्रमाण असेल 
"जेवणातल्या मिठाएवढेच!!!'

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top